चीनपासून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगभरात हातपाय पसरले आहेत. अगदी भारतातही त्याने शिरकाव केला आहे. त्यामुळे सध्या देश करोनाचं सावट आहे. आतापर्यंत अनेक जणांना या विषाणूची लागण झाली आहे. तर काहींना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्व स्तरामधून नागरिक चीनवर आगपाखड करत आहेत. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. यात बिग बी अर्थात अभिनेता अमिताभ बच्चनदेखील ट्विट, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचे विचार व्यक्त करत असतात. अलिकडेच त्यांनी एक पोस्ट शेअर करत हा करोना तर पाठ सोडेना असं म्हटलं आहे.

लॉकडाउन सुरु असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. यामध्ये बिग बींचाही समावेश आहे. सध्या ते अनेक पोस्ट शेअर करुन त्यांचे विचार मांडत आहेत. यामध्ये बऱ्याच वेळा त्यांना ट्रोलही व्हावं लागलं. अलिकडेच त्यांनी एक पोस्ट शेअर करत घरात वटवाघुळ आल्याचं सांगितलं आहे.सोबतच हा करोना काही केल्या पाठ सोडेना असंही त्यांनी म्हटलं आहे.

“ब्रेकिंग न्यूज…एक वटवाघुळ आता माझ्या रुममध्ये आलं आहे. जलसाच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. जेथे बसून मी आराम करतो. या भागात मी विटवाघुळ कधीच पाहिलं नव्हतं. आता संपूर्ण रूममध्ये ते एकटंच फिरत आहे. माझ्या घरात…माझ्या रुममध्ये. आमचंच घर मिळालं त्याला. हा करोना तर पाठ सोडेना. उडून उडून येतो हा”, अशी पोस्ट बिग बींनी शेअर केली.

दरम्यान, करोना विषाणूने देशात सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर अजूनही अनेकांनी याची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या देशभरात भीतीचं वातावरण आहे.