अभिनेत्री जया बच्चन यांच्या मराठीद्वेष्टय़ा वक्तव्यामुळे निर्माण झालेला दुरावा बाजूला ठेवून ‘महाराष्ट्र चित्रपट सेने’च्या वर्धापन दिनाला महानायक अमिताभ बच्चन उपस्थित राहणार आहेत. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सोमवारी होणाऱ्या या कार्यक्रमात राज ठाकरे व बिग बी एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे या कार्यक्रमाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
पाच वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जया बच्चन यांनी ‘ मैं यूपी की हूँ, मैं हिंदी में ही बोलूंगी’ असे वक्तव्य केल्यानंतर बच्चन कुटुंबीयांवर मनसेने बहिष्काराचे अस्त्र चालवले होते. बच्चन कुटुंबीयांचे चित्रपट व जाहिरातींवर बंदी घालण्याचे आवाहन राज यांनी करताच अनेक चित्रपटगृहांत अमिताभ यांच्या चित्रपटांचे खेळही बंद पाडण्याचे काम मनसेच्या कार्यकर्त्यांनी केले होते. याप्रकरणी अमिताभ बच्चन यांनी माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनलेल्या अमिताभ यांना राज यांनी लक्ष्य केले होते. या साऱ्या पाश्र्वभूमीवर चित्रपट सेनेच्या वर्धापन दिनाला मनसेने अमिताभ यांना आमंत्रित केले व त्यांनीही ‘झाले गेले विसरून’ कटुता न ठेवता या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेच्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमात भारतीय सिनेमाचा शतकी महोत्सव साजरा करण्यात येणार असून चित्रपट व संगीत क्षेत्रातील १० मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर
यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे चित्रपट सेनेच्या सभासदांना विमा वाटप करण्यात येणार आहे. अमिताभ यांच्याबरोबर सचिन पिळगावकर हेही उपस्थित राहणार असून शंकर महादेवन यांच्यासह संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा गाण्याचा कार्यक्रमही या वेळी आयोजित करण्यात आला आहे.