amitabh01बॉलिवूड ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन सध्या ‘पिकू’ या आगामी चित्रपटाच्या कोलकातामधील चित्रीकरणात व्यस्त आहेत. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केलेले अमिताभ बच्चन शहरातील रस्त्यावरून सायकल चालवताना दृष्टीस पडले. अनेक चित्रपटांतून विविधरंगी व्यक्तिरेखा साकारणारे आणि व्यक्तिरेखेनुरूप आपल्या दिसण्यात बदल करणारे अमिताभ बच्चन या चित्रपटातदेखील एका अनोख्या भूमिकेत दिसणार असल्याची कल्पना चित्रपटात ते साकारत असलेली व्यक्तिरेखा पाहून येतो. त्यांच्या या अगळ्यावेगळ्या लूकमुळे आणि वैविध्यपूर्ण चित्रीकरण स्थळांमुळे त्यांच्या चाहत्यांच्या मनात चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. दक्षिण कोलकातामधील अलिपोर येथील ‘बर्दवान हाऊस’ परिसरात शुटिंग सुरू असताना अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडल्याने शुटिंग काही काळासाठी थांबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
bigbpikuembed ‘बर्दवान हाऊस’ परिसरातील हिरवळीवर एकात-एक घालून ठेवलेल्या खुर्च्यांवर बसून चित्रीकरणादरम्यान मिळालेला निवांतवेळ मोबाईल चाळण्यात घालविणाऱ्या अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी हलक्या बेज रंगाच्या कुर्त्यावर फिकट करड्या रंगाचा हाफ स्वेटर परिधान केला होता. करड्या रंगाची दाढी आणि कानापर्यंत आलेले करड्या रंगाचे केस अशी त्यांची वेशभूषा होती. ‘विकी डोनर’चा दिग्दर्शक शुजित सिरकरचा हा आगामी चित्रपट असून, त्याच्या शुटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी अमिताभ बच्चन रविवारी सकाळी शहरात दाखल झाले. चित्रपटात ते दीपिका पदुकोणच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. शहरातील रस्त्यावर सायकलवरून फेरफटका मारताना खूप साऱ्या आठवणी मनात दाटून आल्याने हा महानायक भावूक झाला. १९६० च्या सुरुवातीला अमिताभ बच्चन शहरातील पूर्व भागात नोकरी शोधण्याच्या निमित्ताने दाखल झाले होते. त्यावेळी एका खासगी कंपनीत ५०० रुपये पगारावर त्यांनी नोकरी केली होती. नंतर ते मुंबईला आले आणि रुपेरी पडद्यावरील शहेनशहा झाले. चित्रपटाचा भाग म्हणून त्यांनी रविवारच्या दुपारी शहरातील रस्त्यावरून सायकलची रपेट केली. ‘पिकू’ हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्याच्या ३० तारखेला प्रदर्शित होत आहे.
amitabh-bachchan-piku-fb1