धर्मा प्रोडक्शन्स अंतर्गत नुकताच प्रदर्शित झालेला ”राजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली असून हा चित्रपट १०० कोटींच्या घरात पोहोचला आहे. ‘राजी’मध्ये सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका वठविली असली तरी अमृता खानविलकर या मराठमोळ्या अभिनेत्रीने तिची विशेष छाप सोडली. ‘राजी’मध्ये दमदार भूमिका केल्यानंतर अमृता आता डिजीटल दुनियेत पाय ठेवण्यास सज्ज झाली आहे. मात्र या नव्या दुनियेत तिला नवनवीन अनुभव येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अमृता सध्या ‘हंगामा प्ले’च्या ‘डॅमेज’ ह्या वेबसीरीजच्या माध्यमातून डिजीटल दुनियेत पाऊल ठेवत आहे. ‘राजी’मध्ये मुनिरा ह्या एका पाकिस्तानी गृहिणीच्या साध्या सोज्वळ रूपात दिसलेली अमृता आता ‘डॅमेज’ ह्या वेबसीरिजमधून बोल्ड, ब्युटिफुल आणि सेन्शुअस अशा नव्या अंदाजात दिसणार आहे.
सूत्रांनुसार, डॅमेज वेबसीरिजमध्ये अमृताला लविना नावाच्या एका मुलीची भूमिका साकारत आहे. लविना हे पात्र अत्यंत बिंधास्त, बोल्ड असं असल्यामुळे या पात्राला न्याय देण्यासाठी अमृता परोपरीने प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. हेच प्रयत्न करत असताना एका सीनसाठी अमृताला सिगारेट ओढावी लागली. व्यक्तिगत आयुष्यात सिगरेटला हातही न लावणा-या अमृताला हा सीन करणं कठीण गेलं. सिगरेट पिण्याचा सराव करण्यासाठी अमृताने एकाच दिवशी चक्क ४० वेळा सिगरेट ओढल्या. मात्र, याचा परिणाम तिच्या घश्यावर झाला असून तिचा घसा चांगलाच बसला आहे. यामुळे तिला धड बोलताही येत नसल्याचे डॅमेज वेबसीरिजच्या युनिटकडून सांगण्यात येत आहे.
‘मला सिगरेटच्या वासानेही मळमळतं. माझ्या आसपास कोणी सिगरेट ओढत असेल तर मी लगेच त्या व्यक्तिला रागावते. अशावेळी मनोरूग्ण लविनाची भूमिका रंगवताना मलाच सिगरेट ओढणं भाग होतं. सिगरेट पिणं भूमिकेचा अविभाज्य भाग असल्याने मी तयार झाले खरी, पण मला सिगरेट ओढणं जमेच ना,’ असं अमृताने सांगितलं.
पुढे ती असंही म्हणाली, ‘शुटिंगदरम्यान दिग्दर्शक सारखा ओरडत होता, इनहेल कर.. पण काही ते इनहेल करून सिगरेटचा धूर व्यवस्थित सोडणं मला जमत नव्हतं. दिवसअखेरीला ते जमलं खरं. पण ह्या फंदात एका दिवसात मी ४० सिगरेट प्यायल्या. आणि माझा दूस-या दिवसापासून घसाच बसला. जवळ जवळ दोन आठवडे मला बोलता येत नव्हतं.’