जवळपास वर्षभरापूर्वी महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटाच्या निर्मात्यांना ट्विटरच्या माध्यमातून एक विनंती केली होती. थार Thar SUV ला या चित्रपटात वापरण्याची विनंती त्यांनी केली होती आणि त्यानंतर ती गाडी कंपनीच्या संग्रहालयात ठेवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी ‘काला’ची शूटिंग सुरू होती आणि तेव्हा धनुषने ट्विटरच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांना होकार कळवला होता. नुकताच हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आणि चित्रपटात वापरण्यात आलेली थार गाडी धनुषने महिंद्रा कंपनीला परत केली.

‘काला’मध्ये वापरण्यात आलेली ही गाडी सध्या महिंद्राच्या चेन्नईतल्या रिसर्च वॅलीमध्ये ठेवण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी टीममधील कर्मचाऱ्यांचा या गाडीसोबत फोटो आणि व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केला.

आनंद महिंद्रा यांनी अशाप्रकारे विशेष गाडीला महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटो म्युझियममध्ये स्थान देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी केरळमधल्या एका रिक्षाचालकाच्या रिक्षाला या संग्रहालयात स्थान दिलं होतं. कारण त्याने महिंद्रा स्कॉर्पिओसारखा लूक देत त्या रिक्षाला मॉडिफाय केलं होतं. महिंद्रा कंपनीने ती रिक्षा त्या व्यक्तीकडून विकत घेतली आणि त्याबदल्यात नवीकोरी महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक त्याला दिली होती.