वेगवेगळ्या विधानांने वाद ओढावून घेणाऱ्या कंगना रणौतच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून कंगना विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

1 फेब्रुवारी 2021ला झालेल्या सुनावणीत न्यायालयानं कंगनाला समन्स बजावत पुढील म्हणजेच 1 मार्चला होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणाच्या सुनावणीसाठी जावेद अख्तर वेळेपूर्वीच आपल्या वकिलासोबत न्यायालयात हजर झाले होते. मात्र कंगनाने न्यायालयात हजरी न लावल्यानं महानगरदंडाधिकाऱ्यांनी कडक पावलं उचलंत कंगनाविरोधात जामीनात्र वॉरंट जारी केलंय. तर 26 मार्चला पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कंगनाला बजावण्यात आले आहेत. आजच्या सुनावणीसाठी कंगनाच्यावतीने तिच्या वकिलांनी न्यायालयात हजेरी लावली होती.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील अनेकांवर गंभीर आरोप केले होते. बॉलिवूडमधील घराणेशाहीवरुन तिने दिग्गज सेलिब्रिटींवर ताशेरे ओढले. यातच कंगनाने गीतकार जावेद अख्तर यांच्यावरही आरोप केले. ऋतिक रोशन आणि कंगनामध्ये पेटलेल्या वादात ‘जावेदजींनी आपल्याला गप्प बसण्याचा सल्ला दिला होता’ असा आरोप कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर केला. एका मुलाखतीत तिने त्यांच्यावर हे आरोप केले. “रोशन कुटुंबीयांसोबत वाद ओढावून घेतलास तर ते तुला जेलमध्ये टाकतील.” या शब्दात जावेद अख्तर यांनी दबाव टाकला असल्याचं कंगना या मुलाखतीमध्ये म्हणाली होती.

यानंतर कंगनाने केलेले आरोप फेटाळून लावत जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कंगना आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हंटलं आहे. या तक्रारीची चौकशी सुरु असून याप्रकरणी न्यायालयाने सुनावणीसाठी कंगनाला समन्स बजावले होते.