सध्या देशात करोनाचा व्हायरसने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. करोनाचा फटका चित्रपटसृष्टीला देखील बसत आहे. मालिका तसेच चित्रपटांचे चित्रीकरण अनपेक्षित काळासाठी थांबवण्यात आले आहे. अशातच एका अभिनेत्याने वेळ आल्यावर कमगारांना कर्ज काढून पगार देण्याचे ठरवले आहे.

हा अभिनेत म्हणजे अंग्रजी मिडीयम चित्रपटात काम करणारा दिपक डोब्रियाल. त्याने नुकताच हिंदूस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्यासाठी काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही परिस्थितीत पगार देण्याचे वचन दिले आहे.

‘मला आश्चर्य वाटतं की जर आपल्या सारख्या लोकांना इतका त्रास होत असेल तर गरीब लोकं या परिस्थितीचा सामना कसा करत असतील? माझ्यासाठी जवळपास ६-७ लोकं काम करतात. मी त्यांना वचन दिले आहे की मला कर्ज घ्यावे लागले तरीदेखील चालेल पण मी त्यांना पगार देणार. मला शक्य त्या पद्धतीने मी त्यांची काळजी घेईन’ असे त्यांने म्हटले आहे.

‘मी वर्षातून एकच चित्रपट करतो. त्यामुळे मी त्यांना इतकीच मदत करु शकतो. पण मी त्यांचा पगार योग्य वेळेत देऊन त्यांना मदत करेन’ असे दिपक पुढे म्हणाला आहे.

सध्या दिपक उत्तराखंडमध्ये अडकला आहे. लॉकडाउनपूर्वी तो तेथे चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. पण आता त्याला कुटुंबीयांची आठवण येत असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच नकारात्मक गोष्टींपासून लांब राहण्यासाठी त्याने फेसबुक आणि ट्विटर डिलिट केले असल्याचे सांगितले. ‘मी सोशल मीडियावर अनेकांना नकारात्मक गोष्टी पोस्ट करताना पाहिले आहे. मला वाटते आता फक्त सरकारचे ऐकण्याची वेळ आली आहे’ असे दिपक पुढे म्हणाला.