मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता हे दोघंही फिटनेसला सर्वाधिक महत्त्व देतात. व्यायाम, योग्य आहार, धावणं या गोष्टींना दोघांचंही प्राधान्य असतं. आतापर्यंत मिलिंद आणि अंकिता या दोघांनीही अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. मात्र नुकत्याच पार पडलेल्या अथेन्स मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव अंकितासाठी खूपच वेगळा होता. तिनं पहिल्यांदाच पूर्ण अथेन्स मॅरेथॉन स्पर्धा पार केली याचा अनुभव तिनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून मांडला आहे.

ही माझ्या आयुष्यातली पहिली आणि पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा होती. यापूर्वी मी कधीही पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले नव्हते. स्पर्धेचा सराव करण्यासाठी वेळ खूपच कमी होता, कोणताही अनुभव नव्हता. पण एक आठवड्याच्या अवधीत मिलिंदनं मला धावण्याचं प्रशिक्षण दिलं, त्यानं दिलेल्या प्रशिक्षणामुळेच ही स्पर्धा मी यशस्वी पार करू शकले असं म्हणत तिनं मिलिंदला यशाचं श्रेय दिलं आहे.

मॅरेथॉनचा जन्म ज्याठिकाणी झाला त्या अथेन्समध्ये धावण्याचा आनंद हा खूप मोठा होता. या स्पर्धेत सहभागी होता यावं यासाठी आम्ही अथेन्समध्ये आणखी काही काळ थांबलो. पण हा सारा अनुभव खूपच सुखद होता असं म्हणत अंकितानं तिला आलेल्या अनुभवाचं वर्णन केलं आहे.