अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय. सुशांतची कथित गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

अंकिताने इन्स्टाग्रामवर लिहिलंय, ‘सत्याचा विजय होतो’. अंकिताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर काही गंभीर आरोप केले असून पाटणा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते.

आणखी वाचा : रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस करत होते टाळाटाळ- सुशांतचे वकील

सुशांत आणि अंकिता लोखंडे जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि नंतर या ओळखीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.

सुशांतच्या वडिलांनी रियावर केलेले आरोप- 

तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “रिया सुशांतसोबत एकत्र राहत होती. आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी तिने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रं सोबत नेली. यानंतर रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. सुशांतने आपल्या बहिणीला फोन करुन रियापासून धोका असल्याचं सांगितलं होतं. रियाने आपल्याला धमकावलं असून वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचं सुशांतने आपल्या बहिणीला सांगितलं होतं”.

“सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला होती,” असंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.