बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वयाच्या ३४व्या वर्षी सुशांतने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्याच्या निधनाने चाहत्यांसोबतच कलाकरांनीही धक्का बसला आहे. जेव्हा सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिला देखील धक्का बसला.

‘इंडिया टूडे’ने सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर एक्स गर्लफ्रेंड अंकिताची प्रतिक्रिया घेण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी तिला सुशांतने आत्महत्या केल्याचे माहितच नव्हते. तिने ‘काय?’ एवढा एकच शब्द बोलून फोन कट केला. अचानक सुशांतच्या निधनाची बातमी ऐकून अंकितालाही धक्काला बसला.

सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. दरम्यान त्या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. जवळपास पाच वर्षे ते एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. २०१३ मध्ये सुशांतने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.