अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आता दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र आजही अभिनेत्री अंकिता लोखंडे त्याच्या आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देत असते. बऱ्याच वेळा ती भावनिक पोस्ट शेअर करत सुशांतप्रतीच्या तिच्या भावना व्यक्त करत असते. अलिकडेच तिने तिच्या पाळीव श्वानासोबत फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यावरुन तिला सुशांतची आठवण येत असल्याचं दिसून येत आहे.
अंकिताने इन्स्टाग्रामवर तिच्या श्वानासोबतचा फोटो शेअर केला असून तिने दिलेलं कॅप्शन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. इतकंच नाही तर आता स्वत:ला सावर असा सल्लाही चाहत्यांनी तिला दिला आहे.
सगळ्यात उत्तम थेरपी म्हणजे तुझे चार पाय आणि मुलायम केसांवर हात फिरवणं, ते फिल करणं, असं कॅप्शन अंकिताने या फोटोला दिलं आहे. अंकिताची ही कॅप्शन वाचल्यानंतर ती अजूनही सुशांतच्या दु:खातून न सावरल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी अंकिताला धीर देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता सतत सोशल मीडियावर व्यक्त होत असून सुशांतला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर सुशांतची कथित प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधातही अंकिताने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सध्या सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.