‘अकस’ या आगळ्यावेगळ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा अभिनेता अंशुमन विचारे यांच्या वतीने करण्यात आली आहे. सामान्य व्यक्तींमध्ये दडलेल्या असामान्य कर्तृत्वाचा गौरव करावा या हेतुने हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. ‘अकस पुरस्कार २०१९’ या नावाने हे पुरस्कार दिले जाणार असून अंशुमन विचारे ऍक्टिंग अकॅडमीतर्फे ते देण्यात येणार आहेत.

या पुरस्कारांचे हे पहिले वर्ष असून, यंदा एकूण ६ पुरस्कार दिले जाणार आहेत. समाजातील सामान्य व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येणार असून, त्यासाठी आयोजकांनी समाजाच्या सर्व स्तरांतून निवेदने मागविली आहेत. समाजात श्रेष्ठ व्यक्ती जशा असतात, तसेच सर्वसामान्य माणसेही असतात. त्यांच्याकडून कळत नकळत किंवा ठरवून समाजसेवा घडत असते. त्यांच्या कर्तृत्वाला या पुरस्कारांच्या माध्यमातून सलाम करण्यात येणार आहे. ११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी निवेदने स्वीकारण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी २०१९ आहे. निवेदने लेखी अर्जाद्वारे; तसेच ‘इमेल’द्वारे स्वीकारण्यात येणार आहेत.

आयोजकांना प्राप्त होणाऱ्या निवेदनांतून निवड समिती योग्य त्या व्यक्तींची निवड करणार आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा फेब्रुवारी २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रवेशिका अंशुमन विचारे ऍक्टिंग अकॅडमीच्या कार्यालयातही उपलब्ध आहेत. निवेदने पत्राद्वारे पाठवायची असल्यास खालील पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्ता : अंशुमन विचारे ऍक्टिंग अकॅडमी, पुष्पकधाम सोसायटी, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, बेतुरकर पाडा, कल्याण (पश्चिम) – ४२१३०१.

इमेल : anshumanvichareactingacademy@gmail.com