राजेशाही लग्नानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. नुकताच तिने तिच्या आगामी सुई धागा सिनेमाशी संबंधित एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती नक्षीकाम करताना दिसते. सोशल मिडियावर हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की,
कतरन से बुनी कहानी
पैबंद लगा के है सुनानी
– सुई धागा

या सिनेमात अनुष्कासोबत वरुण धवनही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी वरुणने या सिनेमाशी निगडीत शिवणकाम करतानाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना वरुणने लिहिले की,
हाथ-पैर का मेल गुरु,
सुई-धागे का खेल शुरू!

‘दम लगा के हैशा’चा दिग्दर्शक शरत कटारिया ‘सुई धागा- मेड इन इंडिया’चेही दिग्दर्शन करणार आहे. तर मनीष शर्मा सिनेमाची निर्मिती करेल. आपल्या आगामी सिनेमाविषयी वरुण म्हणाला की, गांधीजींपासून ते मोदीजींपर्यंत (नरेंद्र मोदी) आपल्या नेत्यांनी ‘मेड इन इंडिया’ या घोषवाक्याचं नेहमीच समर्थन केलं आहे. ‘सुई धागा’च्या माध्यमातून त्यांचा हा संदेश लाखो लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचा मला अभिमान आहे. शरतने लिहिलेली सिनेमाची कथा मला आवडली. यशराज फिल्म्ससोबत काम करताना मला आनंद होतोय. मी आणि अनुष्का पहिल्यांदाच काम करत आहोत.

एका वेगळ्या कथेवर काम करायला मिळत असल्याने अनुष्काही यासाठी उत्सुक आहे. ‘लोकांशी निगडीत असलेल्या कथांवर काम करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते. सुई धागा प्रत्येक स्तरातील व्यक्तीशी जोडला गेलेला असल्याने नक्कीच प्रेक्षकांना हा सिनेमा खिळवून ठेवेल’, असे अनुष्का म्हणाली.

‘सुई धागा’ या हटके शीर्षकाने नक्कीच प्रेक्षकांच्या मनात सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली असेल यात शंका नाही. ‘सुई धागा- मेड इन इंडिया’च्या चित्रीकरणास सुरुवात होणार असून यावर्षी गांधी जयंतीच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.