18 September 2020

News Flash

‘अनवट’ रोमांचक थरारपट, पहिला ४ के चित्रपट

मराठी चित्रपटाच्या दुनियेत थरारपट तसे सातत्याने बनवले जात नाहीत. एक एक पदर उलगडून गुंगवून टाकणारा असा चित्रपट गेल्या बरेच दिवसांत पहायला मिळाला नाही.

| June 16, 2014 07:40 am

मराठी चित्रपटाच्या दुनियेत थरारपट तसे सातत्याने बनवले जात नाहीत. एक एक पदर उलगडून गुंगवून टाकणारा असा चित्रपट गेल्या बरेच दिवसांत पहायला मिळाला नाही. सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूड्स संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊन पूजा शेखर ज्योतीने ही तरुण मुलगी सिनेनिर्मिती क्षेत्रात अनवट या चित्रपटाद्वारे पदार्पण करते आहे.
पी.एस.जे  एंटरटेनमेंट या निर्मितीसंस्थेअंतर्गत पूजाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी १९७५ च्या काळातील कोकण, गोवा, हैद्राबाद येथील पार्श्वभूमीवर आधारित असा हा ‘अनवट’ चित्रपट तयार केला आहे. सशक्त कथेला उत्तम दिग्दर्शनाची साथ मिळाल्यामुळे एक जबरदस्त असा थरारक अनुभव या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील लोकेशन्स ही नयनरम्य अशी आहेत. उत्तम छायाचित्रणामुळे सिनेमातील प्रत्येक दृश्य आपले मन मोहून टाकेल. या चित्रपटाचा जागतिक प्रिमिअर नुकताच गोवा मराठी चित्रपट महोत्सवात पार पडला तसेच सिटीलाईट सिनेमा आयोजित ‘मराठी चित्रपट महोत्सव २०१४’ ची सुरुवात ‘अनवट’ चित्रपटाने करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी झालेल्या स्क्रिनिंगला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि ‘अनवट’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव झाला.
ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी संगीत दिले आहे. ‘तरुण आहे रात्र अजुनी’ आणि ‘ये रे घना ये रे घना’ ही मराठीतील गाजलेली अजरामर भावगीते ‘अनवट’ चित्रपटात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार असून सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, विभावरी आपटे, सपना पाठक यांच्या सुमधुर आवाजात ही भावगीते रेकॉर्ड करण्यात आली आहेत. या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे मराठीत पहिल्यांदाच ४के फॉरमॅट मध्ये दाखविला जाणारा ‘अनवट’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. भारतात २के, ३के असे फॉरमॅट वापरले जातात परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिनेमागृहांमध्ये ४के फॉरमॅट वापरला जातो. आपल्याकडे भारतात त्याबद्दल तितकीशी माहिती लोकांना नाहीये. ‘अनवट’ आंतरराष्ट्रीय पातळीवरील महोत्सवात हा सिनेमा दाखविण्यासाठी कोणती अडचण येऊ नये यासाठी हा नवीन फॉरमॅट वापरला असून इतर फॉरमॅटच्या तुलनेत ४के फॉरमॅटचा आऊटपूट ही रुपेरी पडद्यावर फारच छान दिसतो.

‘अनवट’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांचेच असून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारे ही जोडी या सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये  पाहायला मिळणार आहे. नेहमीच विनोदी भूमिकेने आपल्याला हसविणारा अभिनेता मकरंद अनासपुरे ‘अनवट’ चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहे. असा हा नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांनी सजलेला ‘अनवट’ चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 7:40 am

Web Title: anvat marathi movie in 4k format
टॅग Marathi Movie
Next Stories
1 व्हिडिओ : चित्रपटात सेक्सी दिसणे गरजेचे – सनी लिऑन
2 उगवत्या महिला क्रीडापटूंना बिग बींची अशीही मदत!
3 आर. बल्कींच्या ‘शमिताभ’मधील गाण्यासाठी अमिताभ यांचा आवाज
Just Now!
X