‘असूर’, ‘रायकर केस’, ‘द गॉन गेम’ यांसारख्या वेब सीरिजनंतर वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता एका अनोख्या विषयाची सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजच्या माध्यमातून बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अपूर्व लाखियाने वेब विश्वात पदार्पण केलं. २३ सप्टेंबर रोजी आठ भागांची ही सीरिज प्रदर्शित झाली असून यामध्ये साकिब सलीम, इक्बाल खान, श्रिया पिळगावकर, वालुस्का डीसूझा, राजेश तेलंग आणि अंकुर भाटिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

क्रॅकडाउनची कथा एका गुप्तपणे कामकाज करणाऱ्या शाखेभोवती फिरणारी आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारा मोठा कट उघडकीस आणण्यासाठी ही शाखा काम करत आहे. या प्रक्रियेत त्यांना सक्षम सहकारी ठरू शकेल अशी एक मुलगी सापडते. पण या मुलीची ओळख गूढ असते.

आणखी वाचा : नेत्रसुखद स्थळांवर चित्रीत झालेल्या या वेब सीरिज पाहिल्यात का?

अपूर्व लाखिया त्यांच्या डिजिटल विश्वातील पदार्पणाविषयी म्हणाले, “मला अॅक्शन थ्रिलर्स करायला नेहमीच आवडतं. अशा सिक्वेन्सेस व लोकेशन्सचा एक भाग असणेही मला खूपच रोमांचक वाटते. चिंतन गांधी आणि सुरेश नायर यांनी लिहिलेलं कथानक जेव्हा मी वाचलं तेव्हाच मी खूप भारावून गेलो होतो. यातील कलाकारही अफलातून आहेत. मी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी प्रथमच दिग्दर्शन करत असलो तरी क्रॅकडाउनसाठी एखाद्या बॉलिवूड ब्लॉकबस्टरसारखीच पद्धत वापरण्यात आली. आम्हाला ही सीरिज करताना जेवढी मजा आली, तेवढीच मजा प्रेक्षकांना ती बघताना येणार आहे याची मला खात्री वाटते.”

या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी श्रिया पिळगावकर म्हणाली, “हा माझा वूट सिलेक्टसोबत दुसरा शो आहे. द गॉन गेममध्ये काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. क्रॅकडाउनमध्ये मी पहिल्यांदाच साहसदृश्ये करताना दिसणार आहे. माझी भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांच्यासोबत काम करणं हा तर निखळ आनंददायी अनुभव होता.”