03 June 2020

News Flash

आपला ‘अ‍ॅप’ला कार्यक्रम

माझा आवडता कार्यक्रम मी ‘माझ्याच’ वेळेत पाहणार, हा माज आजचा प्रेक्षक राजा करू शकतो. याला कारण म्हणजे अ‍ॅप प्रक्षेपण.

| August 30, 2015 02:00 am

 

माझा आवडता कार्यक्रम मी ‘माझ्याच’ वेळेत पाहणार, हा माज आजचा प्रेक्षक राजा करू शकतो. याला कारण म्हणजे अ‍ॅप प्रक्षेपण. चित्रपट, परदेशी मालिका यांच्या पाठोपाठ आता भारतीय मालिकांचे दैनंदिन भागही अ‍ॅपवर उपलब्ध झाल्यामुळे आपला आवडता कार्यक्रम आपण पाहिजे त्या वेळेत आणि पाहिजे तितक्या वेळा पाहू शकणार आहोत.
अ‍ॅपचे अर्थकारण
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेले हे अ‍ॅप्स प्रामुख्याने दोन प्रकारे काम करतात. यामध्ये तुम्ही रीतसर पैसे भरून अ‍ॅपचे वर्गणीदार व्हायचे. मग त्यासाठी विविध पॅकेजेस तयार केली जातात. त्या पॅकेजेसनुसार व्हिडीओ किंवा चित्रपट डाऊनलोड करण्याची मुभा तुम्हाला मिळते. इतकेच नव्हे तर अनेक अ‍ॅप्सवर मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत सारे काही मोफत दाखविले जाते. असे अ‍ॅप्स चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये असलेल्या ब्रेक दरम्यान जाहिराती दाखवून त्या माध्यमातून पैसा कमवतात. यामध्ये तुलनेने गुंतवणूक कमी असून आशयासाठी होणाऱ्या करारांवर अधिक खर्च होतो. वाहिन्यांच्या समूहाच्या अ‍ॅप्ससाठी आशयाचा प्रश्न तितकासा महत्त्वाचा ठरत नसून त्यांच्याकडे स्वत:चा आशय उपलब्ध असतो. यामुळे त्यांची आर्थिक घडी त्रयस्थ अ‍ॅप पुरविणाऱ्यांपेक्षा अधिक बळकट असते.
रस्त्यावरून चालताना एखाद्या मालिकेचं गाणं कानावर पडलं की आता इतके वाजले असणार असा अंदाज आपण सहजच बांधतो. म्हणजे आपलं घडय़ाळ लावण्याइतपत प्रभाव या मालिकांचा आपल्या आयुष्यात झाला आहे. अमुक एका वेळेला आपली आवडती मालिका पाहण्यासाठी धावत-धावत घरी पोहचणारा किंवा आज मालिका हुकली म्हणून हळहळणारा मोठा प्रेक्षकवर्ग आपल्या आसपास आहे. यांच्यामुळेच मनोरंजन वाहिन्यांचे सुगीचे दिवस आले आहेत. संध्याकाळी सात ते रात्री अकरापर्यंत टीव्ही समोरून न हटणाऱ्या हटवादी प्रेक्षकाची जागा कालांतराने घडय़ाळाच्या काटय़ावर जगणाऱ्या पिढीनं घेतली. मग रोजच मालिका पाहायला मिळेल असं नाही. आज पाहिली मग थेट आठवडाभराने वेळ मिळाला. मग मालिकेतील रस संपला अशा अनेक गोष्टी घडू लागल्या आणि प्रेक्षक राजा नकळत वाहिन्यांपासून दूर जाऊ लागला. या प्रेक्षकवर्गाला त्याच्या सोयीने मालिका पाहता याव्यात यासाठी वाहिन्यांचे प्रयत्न सुरू झाले. यामध्ये त्यांना सुरुवातीला साथ लाभली ती डीटीएचसारख्या सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या रेकॉर्डिग या पर्यायामुळे. यात लोक आपला आवडीचा कार्यक्रम रेकॉर्ड करून ठेवत आणि तो आपल्या सवडीने पाहात असत. पण, त्याचा तितकासा वापर झाला नाही. मग मालिकांनी विविध शक्कल लढवून प्रेक्षकांना आपल्याकडे खिळवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले. यातून संकेतस्थळांचा जन्म झाला. काहींनी फार पूर्वीच संकेतस्थळं सुरू केली होती, मात्र त्यांनी ती पुनरुज्जीवित केली आणि ती नव्याने लोकांसमोर ठेवली. मालिकांच्या भागाचे रेकॉर्डिगही संकेतस्थळांवर उपलब्ध होऊ लागले. तरीही प्रेक्षकवर्ग म्हणावा तितका त्याचा फायदा घेऊ शकत नव्हता. ‘हे मोबाइलची माझे विश्व’ अशा तरुणाईला आपल्याकडे ओढण्याचे आव्हान मालिकांसमोर उभे ठाकले. यावर तोडगा काढण्यासाठी वाहिन्यांनी आता थेट अ‍ॅपचा वापर सुरू केला आहे. आजमितीस ‘स्टार’, ‘झी’सारख्या मातब्बर वाहिन्यांकडे त्यांचे स्वत:ची अ‍ॅप यंत्रणा असून या माध्यमातून ते लोकांशी जोडले गेले आहेत.खरे तर मनोरंजन अ‍ॅपची सुरुवातही ‘अ‍ॅपल’चे जनक स्टीव्ह जॉब्ज यांनीच केली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आयटय़ून्स आयफोनमध्ये उपलब्ध करून त्यांनी मोबाइल आणि मनोरंजनाची अनोखी सांगड घातली. इथपासून सुरू झालेला हा प्रवास मोबाइलवर चित्रपट पाहण्यापर्यंत येऊन ठेपला होता. शॉर्टफॉरमॅट, फ्री मूव्हीजसारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोबाइलवर चित्रपट पाहणे शक्य झाले आहे. यात काही गोष्टी वर्गणीदार होऊन मिळवता येतात, तर काही गोष्टी मोफतही उपलब्ध आहेत. मात्र, त्यात जाहिरातींचा समावेश असतो. या माध्यमाकडे मोबाइल चाहत्यांचे विशेष लक्ष होतेच. याचाच फायदा घेऊन विविध वाहिन्यांनी आपल्या मालिकांचे अ‍ॅप स्ट्रिमिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप्सही बाजारात आणले आहेत. ‘स्टार इंडिया’ या समूहाने आपल्या ताब्यातील संपूर्ण मनोरंजन वाहिन्यांवरील सगळा आशय ग्राहकांना उपलब्ध व्हावा यासाठी ‘हॉटस्टार अ‍ॅप’ची निर्मिती केली. या अ‍ॅपवर हिंदी स्टार वाहिनीपासून ते मराठी स्टार प्रवाहपर्यंत सर्व वाहिन्यांवरील मालिकांच्या विविध भागांचे व्हिडीओज पाहता येतात. ‘वाहिन्यांवरील मालिकांमधून आम्ही जे दाखवत असतो ते ग्राहकांना त्यांच्या वेळेत सहज पाहता यावे यासाठी हे माध्यम एकदम उपयुक्त असल्याचे स्टार इंडियाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. सध्या सुरू असलेले कार्यक्रम इथपासून ते जुन्या कार्यक्रमांचाही या अ‍ॅपमध्ये समावेश करण्यात आला आहे. चित्रपट आणि नाटकांचाही यात समावेश असल्याचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांच्या सोयीनुसार तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या स्टारच्या प्रवृत्तीप्रमाणे हा बदल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.अशाच प्रकारे झी टीव्हीने ‘डिट्टो टीव्ही’ या अ‍ॅपची मदत घेतली आहे. या अ‍ॅपवरही झी टीव्हीसह देशातील आणि परदेशातील शंभरहून अधिक वाहिन्यांवरील मालिका पाहावयास मिळतात. अ‍ॅपच्या माध्यमातून जगभरातील विविध देशांमधील लोकांपर्यंत पोहचणे अधिक सोपे जाते. ‘डिट्टो टीव्ही’चा विचार करता सध्या या अ‍ॅपच्या माध्यमातून १३० हून अधिक देशांमधील प्रेक्षकांशी आम्ही जोडले गेल्याचे डिट्टो टीव्हीचे व्यवसायप्रमुख मनोज पद्मनाभन यांनी स्पष्ट केले. डिट्टो टीव्ही या अ‍ॅपवरही मालिकांचा पसंतीक्रम समजू शकतो. हिंदी झी वाहिनीवरील ‘डान्स इंडिया डान्स’, ‘कुमकुम भाग्य’सारख्या मालिकांच्या भागांना चांगला प्रतिसाद मिळतो, तर झी वाहिनीच्या जुन्या आणि गाजलेल्या ‘हम पाँच’सारख्या मालिकांनाही डिट्टो टीव्हीच्या माध्यमातून मोठा प्रेक्षक असल्याचे पद्मनाभन यांनी नमूद केले. तर झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘का रे दुरावा’ आणि ‘अस्मिता’ हे कार्यक्रम डिट्टो टीव्ही या अ‍ॅपवर लोकप्रिय आहेत, असेही ते म्हणाले.या दोन्ही अ‍ॅप्सच्या बरोबरीने काही त्रयस्थ अ‍ॅप्सही बाजारात उपलब्ध आहेत व नवीन अ‍ॅप्स येऊ घातले आहेत. यातील एक म्हणजे ‘विंक मूव्हीज’. पाच हजारहून अधिक चित्रपट आणि वीस हजारांच्या सुमारास टीव्ही मालिकांचा साठा या अ‍ॅपमध्ये आहे. हे अ‍ॅप नुकतेच ‘एअरटेल’ने बाजारात दाखल केले आहे. यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तो व्हिडीओ एकदा डाऊनलोड केला की तो आपल्याला पाहिजे तितक्या वेळा आपण पाहू शकतो. यासाठी एअरटेलने ‘इरॉस’, ‘सोनी’, ‘यू टय़ुब’सारख्या कंपन्यांशी करार केला असून तेथून त्यांना आशय उपलब्ध होतो. देशात जसा स्मार्टफोनचा वापर वाढत जाईल तसा यामध्ये व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण वाढत जाईल. यामुळे भविष्यात ग्राहकांना व्हिडीओ आशयाचा लाभ घेता यावा यासाठी हे अ‍ॅप्स नक्कीच उपयुक्त ठरतील, असे मत ‘विंक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक शेठ यांनी व्यक्त केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2015 2:00 am

Web Title: app for watching tv serials
टॅग Bollywood,Tv Serials
Next Stories
1 ‘चार्लिज एंजल्स’मधील लुसीला पुत्ररत्न
2 हृतिककडून सोनमला टँगोचे धडे
3 जीवनप्रवासावरील पुस्तकासाठी महेश भटकडून अनु अग्रवालचे कौतुक
Just Now!
X