बॉलिवूडचे तीन खान म्हणजेच सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेबाबत शांत का? असा सवाल भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आता उपस्थित केला आहे. सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येवरुन बरेच वादही झाले. काहींनी सुशांत घराणेशाहीचा बळी आहे असं म्हटलं. तर काहींनी सुशांतवर गटबाजीमुळे ही वेळ आली आहे असं म्हटलं. आता सुब्रमण्यम स्वामींनी याच प्रकरणी बॉलिवूडचे तीन खान गप्प का? असा प्रश्न विचारला आहे. त्यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये खळबळ उडू शकते अशी स्थिती आहे.

दरम्यान सुशांतच्या आत्महत्येबाबत खान मंडळी गप्प का? हा जो प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी विचारला आहे त्याला अभिनेत्री कंगनानेही याच ट्विटमध्ये उत्तर दिलं आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. आमिर, सलमान आणि शाहरुख या तिघांसोबत एकतर बॉलिवूड माफिया आहेत किंवा घराणेशाहीतून आलेली मुलं. या आशयाचं उत्तर कंगनाने दिलं आहे.

१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे या ठिकाणी असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडला एकच हादरा बसला. अनेकांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला. मात्र बॉलिवूडमध्ये सुशांतच्या आत्महत्येनंतर दोन गट पाहण्यास मिळाले. एक गट हळहळला. दुसऱ्या गटाने सुशांत हा घराणेशाहीचा आणि अंतर्गत गटबाजीचा बळी आहे असेही आरोप केले. पोलिसांनी या अँगलनेही तापस करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३२ जणांचे जबाब या प्रकरणी नोंदवले आहेत. यामध्ये सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेवर बॉलिवूडमधले तीन खान गप्प का? असा प्रश्न विचारुन नवा धुरळा उडवून दिला आहे.