अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर हे प्रकरण चांगलंच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणामध्ये बॉलिवूडप्रमाणेच राजकारणातील काही व्यक्तींनीही त्यांची प्रतिक्रिया नोंदविली आहे. काही दिवसापूर्वीच मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी नाना पाटेकरांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर तनुश्रीच्या मदतीला धावू आला आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’नुसार, अभिनेता नाना पाटेकरांवर गैरवर्तणुकीचा आरोप केल्यानंतर कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटींनी तनुश्रीची पाठराखण केली आहे. यामध्येच आता अर्जुन कपूरनेदेखील याप्रकरणी त्याचं मत व्यक्त केलं आहे.

‘तनुश्री दत्ताप्रमाणेच माझ्या दोन बहीणीदेखील या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे एका महिलेची सुरक्षितता काय असते हे मी चांगलंच जाणतो. देशातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटलं पाहिजे. त्यामुळे त्या सुरक्षित कशा राहतील हे पाहणं आपली जबाबदारी आहे. आज एका महिलेने तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. सत्य परिस्थिती समोर आणायचा ती प्रयत्न करत आहे. जर तिने केलेले आरोप खरे आहेत तर ती नक्कीच ही लढाई जिंकेल. मात्र त्यासाठी तिचं म्हणणं आपण नीट ऐकून घेतलं पाहिजे’, असं अर्जुन म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘महिलांवर होणारे अत्याचार हे केवळ कलाविश्वातच नाही तर अनेक क्षेत्रांमध्येही होत असतात. मात्र महिलांनी पुढाकार घेऊन आपलं मत मांडलं पाहिजं. सध्या या प्रकरणामध्ये आपण तनुश्रीचं मत नीट ऐकून घेतलं पाहिजे. परंतु येथे या प्रकरणाची खरं बाजू ऐकून घेण्यापेक्षा त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्व देण्यात येत आहे’.

दरम्यान, ‘हॉर्न ओके प्लीज’च्या वेळी नाना पाटेकरांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर हे प्रकरण चांगलंच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता याप्रकरणात ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर यांनीदेखील उडी घेतली असून त्यांनीही आता तनुश्रीवर पलटवार केल्याचं दिसून येत आहे..