बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेमुळे अभिनेता अर्जुन कपूरला जबर धक्का बसला आहे. अर्जुन आणि सुशांतमध्ये खूप चांगली मैत्री होती. अर्जुनने सुशांतसोबत केलेल्या खासगी चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“तुझ्या आत्महत्येमुळे आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. तू हे टोकाचं पाऊल का उचलंस हा प्रश्न आम्हाला त्रास देतोय. तुझ्या नावाने सुरु असलेला हा तमाशा लवकरच संपेल. वातावरण शांत होईल. त्यानंतर सर्वांना कळेल हा निर्णय तू कुठल्या एका घटनेमुळे घेतला नव्हतास, तर यामागे कदाचित अनेक कारणं होती. माझ्या मित्रा तुझ्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरास प्रार्थना.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून अर्जुनने सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे. अर्जुनने जवळपास १८ महिन्यांपूर्वी सुशांतसोबत केलेल्या चॅटचे हे स्क्रीनशॉट आहेत. सुशांतशी चर्चा करत असताना त्याला आपल्या आईची आठवण येत होती असं अर्जुन म्हणाला.
सुशांतचा थक्क करणारा प्रवास
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.