काही दिवसांपूर्वी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला होता. त्यानंतर एनसीबीने अर्जुनला समन्स बजावत त्याची चौकशी केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा अंमली पदार्थ विरोधी पथकाने ( एनसीबी) अर्जुनला समन्स बजावले असून मंगळवारी( १६ डिसेंबर) त्याची चौकशी केली जाणार आहे.

अर्जुनला चौकशीचे समन्स बजावल्यानंतर त्याचा मेहुणा अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स याची मात्र सुटका झाली आहे. अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला सोमवारी (१५ डिसेंबर) जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्याला तुरुंगातून सोडण्यात आलं आहे. मात्र, अर्जुनला आज चौकशीसाठी सामोरं जावं लागणार आहे.


दरम्यान, एनसीबीने यापूर्वी अर्जुनची १७ नोव्हेंबरला चौकशी केली होती. तब्बल ६ तास अर्जुनची चौकशी झाली. त्याच्यासोबत त्याची प्रेयसी गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिचीदेखील चौकशी झाली होती. अर्जुनच्या घरात ट्रामाडॉल या औषधी गोळ्या सापडल्या होत्या.या गोळ्यांवर भारतात बंदी असून या गोळ्या टॅब्लेट ड्रग्ज प्रकारात मोडत असल्याचं सांगण्यात येतं.