अभिनेता संजय दत्तला स्टेज ४ चा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजय दत्तसोबत ‘मुन्नाभाई एम बी बी एस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या दोन चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करणारा सर्कित अर्थात अभिनेता अर्शद वारसी याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजूबाबा कॅन्सरवर मात करण्यात नक्की यशस्वी ठरणार असा विश्वास अर्शदने व्यक्त केला.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत अर्शद म्हणाला, “संजय दत्तने आजपर्यंत अनेक कठीण समस्यांना तोंड दिलं आहे. त्याच्यामध्ये प्रचंड सकारात्मक शक्ती आहे. आयुष्यातील संकटांना घेऊन तो कधी रडत बसला नाही. कॅन्सरवरसुद्धा तो मात करेल. तो योद्धा आहे.”

आणखी वाचा : ‘यापुढे कुठल्याही चुकीला माफी नाही’; अभिज्ञा भावेचा इशारा

अर्शद आणि संजय दत्त आगामी चित्रपटात एकत्र काम करणार होते. सप्टेंबर महिन्यात त्याच्या शूटिंगला सुरुवात होणार होती. पण कॅन्सरमुळे संजूबाबाने कामातून काही वेळ ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. “चित्रपट येतात आणि जातात. पण संजय दत्तसारखे लोक फार क्वचित पाहायला मिळतात. त्याच्यासाठी मी प्रार्थना करेन”, अशा शब्दांत अर्शदने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

छातीत दुखू लागल्याने काही दिवसांपूर्वी संजय दत्तला मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची करोना चाचणीसुद्धा झाली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. दोन दिवसांनंतर संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पण त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं. कॅन्सरवरील उपचारासाठी संजय दत्त परदेशी जाणार असल्याचं कळतंय.