सुहास जोशी

व्यापार आधी की साम्राज्यविस्तार आधी हा गुंता जगाचा इतिहास वाचताना, पाहताना वारंवार पडू शकतो. किंबहुना हे दोन्ही घटक कायमच हातात हात घालून वाटचाल करतात. व्यापारासाठी नवा भूप्रदेश शोधायचा (आजच्या भाषेत मार्केट) आणि मग व्यापाराच्या संरक्षणासाठी सैन्य नेमायचे, किल्ले बांधायचे, तळ उभे करायचे. हे चित्र अगदी सर्रास दिसते. पण जेव्हा व्यापार हाच घटक प्रबळ होतो आणि ज्या भूप्रदेशावर आक्रमण केले जाते तेथील लोकदेखील व्यापारावरील हल्ला या कारणामुळे प्रतिकार करण्यास उभे ठाकतात तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचे युद्ध त्यातून पुकारले जाते. त्याला स्वातंत्र्ययुद्धाची पार्श्वभूमी असली तरी अंतिमत: त्याच्या मुळाशीदेखील व्यापारच असतो. असा एक तुलनेने मोठ्ठा विषय अगदी थोडक्यात मांडायचे काम ‘फ्रंटीयर’ ही वेबसीरिज करते. नेटफ्लिक्स आणि डिस्कव्हरी कॅनडा यांच्या माध्यमातून तयार झालेली ही सीरिज त्यामुळेच स्वातंत्र्यलढय़ाच्या पलीकडे जाणारी आहे.

अठराव्या शतकात इंग्रजांनी उत्तर अमेरिका आणि कॅनडा येथील फरचा व्यापार ताब्यात घेऊ न त्यावर मक्तेदारी निर्माण करायचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या जगभरातील व्यापार आणि साम्राज्यविस्ताराला साजेशी अशीच ही कृती. पण व्यापार आणि सैन्य यातील संतुलन राहिले नाही की मग जशी परिस्थिती निर्माण होते तेच उत्तर कॅनडातील फोर्ट जेम्स येथे होते. या सर्व परिसरातील व्यापारावर हडसन बे कंपनीचे साम्राज्य असते. लॉर्ड बेन्टन हा त्यावर देखरेख ठेवणारा माणूस. पण तो तेथील गव्हर्नरलाच मारून टाकतो, त्याआधी स्वत:चा विश्वासू साथीदार डेक्लन हार्प याच्या कुटुंबाला जाळून टाकतो. गव्हर्नरच्या मृत्यूनंतर फोर्ट जेम्स आणि तेथील फरचा सारा व्यापार बेन्टनच्या ताब्यात येतो. इकडे डेक्लन हार्प सूडाने पेटलेला असतो. दुसरीकडे कैदी म्हणून आणलेल्या मायकल स्मिथ या आयरीश चोराला डेक्लन हार्पला गुंगवून फसवण्यासाठी बेन्टन सोडून देतो. डेक्लनचे वडील आयरीश आणि आई क्री या स्थानिक जमातीची असते. पण मायकल डेक्लनलाच सामील होतो. त्यानंतरची कथा ही जरी डेक्लन हार्पच्या सूडनाटय़ाशी जोडलेली असली तरी ती पूर्णत्वाला जाताना व्यापार हाच महत्त्वाचा घटक असतो.

एकाच वेळी सूडनाटय़, स्वातंत्र्यलढा आणि व्यापारवृद्धी अशा तीन्ही बाबी या सीरिजच्या तीनही सीझनमध्ये दिसून येतात. डेक्लनचे सारे लक्ष बेन्टनला कसे ठार करू याकडे असते, तर मायकल हा एखाद्या कसलेल्या व्यापाऱ्याप्रमाणे सर्व स्थानिक आणि उत्तर अमेरिकेतील फर पुरवठादार आणि प्रक्रिया यंत्रणांना एकत्र आणून हडसन बे कंपनीलाच धक्का देण्याची योजना आखत असतो. त्याच्या या योजनेत देशप्रेम वगैरे भाव तुलनेने कमीच आहे. कारण तो भूप्रदेशच त्याचा नसतो. पण डेक्लनच्याप्रति असलेल्या श्रद्धेमुळे तो हे सारे करत असतो. एकूण कथानकात प्रेम प्रकरणंदेखील आहेतच, पण ती घटनाक्र मात नाटय़ भरून त्याला वेगळे वळण देण्याइतपतच. त्यापलीकडे कथानक हे डेक्लनचे सूडनाटय़ आणि व्यापाराभोवती फिरत राहते.

संपूर्णपणे पिरिअड कलाकृती म्हणता येईल असे हे कथानक प्रचंड मेहनतीने पिरिअड कलाकृती उभी करते हे याचे सर्वात महत्त्वाचे यश आहे. हत्यारं, वाहनसुविधा, संपर्कयंत्रणा, प्रक्रिया उद्योग, हॉटेल्स, वेशभूषा अशा अनेक प्रसंगी प्रत्यक्ष त्या काळात गेल्याचा अनुभव यातून येतो. ही संपूर्ण कथा अठराव्या शतकातील आहे आणि त्या मांडणीत जिवंतपणा ओतण्याचं काम सीरिजकर्त्यांनी केलं आहे.

अतिउत्तरेकडील भूप्रदेशातील कथानक असल्यामुळे अर्थातच तेथील भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव येण्यासाठी मैलोन्मैल पसरलेला हिमाच्छादित प्रदेश, हिमवादळं, त्यातून होणारा प्रवास आणि छोटय़ामोठय़ा लढाया हे सारे चित्रीकरणासाठी तसे कठीण आणि खर्चीक प्रकरण. पण येथे ते अगदी व्यवस्थितपणे सांभाळलेच नाही तर प्रभावीपणे दाखवले आहे. अर्थात काही अतिशोयक्तीचे प्रकार आहेत, पण ते कथानकाच्या ओघात खपून जातात.

एखाद्या भूप्रदेशावरील अतिक्रमण आणि त्यानंतर होणाऱ्या संघर्षांला देशभक्तीची फोडणी देणे हा एक सर्वसाधारण लोकप्रिय प्रकार असतो. पण येथे त्या लोकप्रियतेच्या आहारी न जाता एकूण घटनाक्रमाच्या मुळाशी जात त्यातील सर्व पदर उलगडण्याचा सीरिजकर्त्यांचा प्रयत्न दिसून येतो. त्यासाठी कथानकाने अनेक वेळा वळणे घेतली तरी लोकप्रियतापण टिकवून ठेवली जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फार चऱ्हाट न लावता थोडक्या भागात कथानक पुढे जात असल्याने पाहणे सुकर जाते. २०१६ मध्ये ही सीरिज सुरू झाली होती, त्याचा तिसरा सीझन नुकताच आला असून नक्की पाहावा असा आहे.

फ्रंटियर

सीझन एक, दोन आणि तीन

ऑनलाइन अ‍ॅप : नेटफ्लिक्स