आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणे हा एकच ध्यास लागलेल्या आणि अशा वेळी आपल्या कुटुंबीयांसोबत प्रेमाचे दोन शब्द बोलण्याकरिता केवळ काही क्षण असलेल्या एका सामान्य माणसाची कथा म्हणजे ‘काही क्षण प्रेमाचे’. ज्योती प्रकाश फिल्म्स निर्मितीसंस्थेअंतर्गत हरिश्चंद्र गुप्ता निर्मित आणि डॉ. राज माने दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सध्या मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेला सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

प्रेमळ, प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्तीमुळे आपल्या आसपासच्या लोकांबरोबरच कामामध्ये आपल्या कंपनी मालकाचेही मन जिंकणाऱ्या सामान्य माणसाची ही गोष्ट आहे. मात्र त्याची हीच वृत्ती त्याचा घात करते आणि सुरू होतो सुबोधचा खडतर प्रवास.. हा प्रवास नेमका काय असेल? यात त्याला कोणकोणते चांगले अथवा वाईट अनुभव येतात? आणि कोणकोणत्या व्यक्तींसोबत तो काही क्षण प्रेमाचे घालवतो? हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात सुबोध-भार्गवीसोबत विजू खोटे, जयराम नायर, मनोज टाकणे, मैथली वारंग, डॉ. छाया माने, अ‍ॅड. प्रशांत भेलांडे, ज्योती निसाळ, डॉ. विलास उजवणे, नरेश ठाकूर, नरेंद्र भोईर, कमलाकर पाटील, नामदेव पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ऋषी लोकरे, हंसिका माने, काव्या पाटील, शिवम यादव यात बालकलाकार म्हणून दिसणार आहेत. चित्रपटाचे छायांकन जितेंद्र आचरेकर यांनी केले आहे. अशोक पत्की या चित्रपटाचे संगीतकार असून खुद्द सुरेश वाडकर, देवकी पंडित, श्रद्धा वानखेडे, शेफाली यांनी यातील काही गाणी स्वरबद्ध केली आहे, तर प्रवीण दवणे आणि राज माने या गाण्याचे गीतकार आहेत.