25 September 2020

News Flash

‘मराठी चित्रपटसृष्टी बदलतेय..’

एकापाठोपाठ एक चांगल्या भूमिका, दिग्दर्शक आणि तितक्याच चांगल्या चित्रपटांतून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांसमोर येत आहे.

सोनाली कुलकर्णी

भक्ती परब

हिंदी – मराठी चित्रपटासृष्टीतील सोनाली कुलकर्णी आणि शरद केळकर हे दोन मराठी कलाकार ‘माधुरी’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या दोन्ही कलाकारांना मराठी चित्रपटसृष्टीचे बदलते रूप महत्त्वाचे वाटत आहे..

एकापाठोपाठ एक चांगल्या भूमिका, दिग्दर्शक आणि तितक्याच चांगल्या चित्रपटांतून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांसमोर येत आहे. आताही ‘माधुरी’ चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिकेत आहे. या विषयी ती म्हणाली, ‘माधुरी’ चित्रपटातील या भूमिकेविषयी मला विचारण्यात आलं तेव्हा फार मजा वाटली. कारण कुठल्याही कलाकारासाठी चांगल्या भूमिका मिळणं आवश्यक असतं. गेल्या दोन वर्षांत खूप चांगल्या भूमिका मला मिळाल्या. ‘कच्चा लिंबू’, ‘गुलाबजाम’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातील भूमिका साकारताना एक कलाकार म्हणून काहीना काही तरी मिळालं. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं, त्याच वेळी मला ‘माधुरी’सारखा चित्रपट मिळाला. स्वप्नाने या भूमिकेसाठी माझा विचार केला त्यासाठी चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांची मी आभारी आहे. ‘अग्गबाई अरेच्चा’सारखा चित्रपट आणि ‘व्हाइट लीली नाइट रायडर’सारखं नाटक यानंतर पहिल्यांदाच मला विनोदी शैली असलेल्या चित्रपटात काम करायला मिळालं आहे. ही गोष्टच इतकी अप्रतिम आहे, की कोणत्याही अभिनेत्रीला ही भूमिका मिळाली असती तर तिने ती हपापल्यासारखीच स्वीकारली असती. या चित्रपटाची प्रस्तुतकर्ती ऊर्मिला मातोंडकरचेही आभार. तिनेही अन्य कोणाचा विचार न करता या भूमिकेसाठी माझी निवड केली याचाही आनंद आहे.

अभिनेता शरद केळकर म्हणाला, चित्रपटात आई आणि मुलीची गोष्ट असून त्या दोघींच्या आयुष्यात काय घडतं, त्यातून हा चित्रपट उलगडत जातो. आपली आई अचानक तरुण मुलीसारखी वागू लागते, हे मुलीला कळतं पण तिच्यासाठी ते सत्य पचवणं अवघड जातं. त्या मुलीचं आईशी असलेलं नातं आणि आईची मनोवस्था चित्रपटात दाखविली आहे. मानसोपचार तज्ज्ञाची भूमिका मी करतोय. रुग्णाला सर्वसामान्य माणसासारखी वागणूक देऊन त्याला सुधारण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत अशी भूमिका साकारलेली नाही.

चित्रपटाच्या विषयाबद्दल सोनालीला विचारले असता तिने सांगितले, चित्रपट मानसशास्त्रीय अंगाने जाणारा असला तरी स्वप्नाने नात्यांच्या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे त्यातला मानसशास्त्रीय मुद्दा तितका दु:खदायक राहत नाही. प्रश्न प्रत्येकालाच असतात, पण त्याकडे कसं बघावं, याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. म्हणूनच मानसशास्त्रीय अनुत्तरित गुंता असं याचं स्वरूप न राहता आपण आपले प्रश्न सोडवू शकतो, त्याकडे पाहण्याची आपली ताकद पाहिजे, असं चित्रपटातून मांडण्यात आलं आहे.

सध्या मराठी चित्रपटांचं वातावरण बघून खूप छान वाटतंय. पुढच्या महिन्यात ‘माऊली’ येतोय. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठीत ‘नटसम्राट’, ‘सैराट’ सारखे चित्रपट हिट होतात. हिंदीत ‘बधाई हो’, ‘बरेली की बर्फी’, ‘अंधाधूंद’ सारखे चित्रपट चांगली कमाई करत आहेत. प्रेक्षक चित्रपटाचा आशय आणि गुणवत्ता बघून प्रतिसाद देत असून चित्रपटसृष्टीसाठी हा चांगला काळ आहे. प्रेक्षकांना कथा आवडल्यामुळे ते चित्रपटगृहात जाऊ न चित्रपट पाहतात ही चांगली गोष्ट असल्याचं शरदने सांगितलं.

गेल्या दोन वर्षांतील आपल्या मराठी चित्रपटांविषयी सोनाली म्हणाली, या वर्षांची सुरुवात ‘गुलाबजाम’ चित्रपटाने झाली आणि शेवट ‘माधुरी’ने होतोय. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटात मला जो काळ मी पाहिला नाही तो रंगवायचा होता तर ‘माधुरी’ चित्रपटात माझ्या आजूबाजूला जी तरुण पिढी पाहते आहे तो काळ रंगवायची संधी मिळाली. ‘माधुरी’ चित्रपटातील वेशभूषा स्वत: ऊर्मिलाने तर ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’मधील वेशभूषा नचिकेत बर्वे याने केली होती. त्या दोघांनीही त्यांचं काम अगदी शंभर टक्के केलं आणि मला भूमिका साकारण्याची ऊ र्जा मिळाली.

प्रेक्षकांनाही येणारा आगामी चित्रपट बघायचाच असं वाटतं किंवा या चित्रपटाची आम्ही वाट पाहतोय, असं प्रेक्षक म्हणतात. समाजमाध्यमांवर मिळणाऱ्या ‘लाइक्स’पेक्षा हा चित्रपट पाहायचा आहे हे त्यांचं मत फार आशादायक आहे. अनेकदा चित्रपटातील गाण्यांना, ट्रेलरला समाजमाध्यमांवर चांगला प्रतिसाद मिळतो, पण प्रत्यक्षात प्रेक्षक चित्रपटगृहाकडे फिरकत नाहीत. पण आता ते चित्र बदलतंय. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून समाधान वाटतं. आता आपण कुठला चित्रपट पाहायचा याची निवड प्रेक्षक करतात हे चांगलं चित्र आहे. काही दिग्दर्शक, अमराठी निर्माते, प्रस्तुतकर्ते आणि गुंतवणूकदारांना मराठी चित्रपटात पैसे गुंतवावेसे वाटतात हे मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी खूप महत्त्वाचं आहे.

-सोनाली कुलकर्णी

मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाइम’चे खेळ मिळतील याची ग्वाही सरकारने दिली होती, पण महाराष्ट्रात इतर भाषिक लोकही तितक्याच मोठय़ा प्रमाणात असल्याने तसेच हिंदी चित्रपट पाहणाऱ्यांचीही संख्या जास्त असल्याने हिंदी चित्रपटांना झुकतं माप मिळतं. हिंदी चित्रपटांना किंवा दाक्षिणात्य चित्रपटांना चित्रपटातील कलाकारांमुळे ते चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची पसंती असते. तसं मराठीत कुणा स्टारला पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत नाहीत. मराठीत ते होण्याची गरज आहे. मराठी चित्रपट आता आशयानेच नाही तर गुणवत्तेतही हिंदी चित्रपटांशी स्पर्धा करू लागला असून चित्रपटगृह मिळण्याचा तिढा हळूहळू सुटेल.

-शरद केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2018 12:41 am

Web Title: article about marathi cinema changes
Next Stories
1 चित्ररंग : दुष्टचक्र
2 वेबवाला : नार्को पुन्हा एकदा
3 बॉक्स ऑफिसवर ‘नाळ’राज
Just Now!
X