असीफ बागवान

टाळेबंदीच्या काळात टीव्ही वाहिन्यांवरील मालिकांचे पुनप्र्रक्षेपण पाहून आलेला कंटाळा आणि ओटीटीवर सातत्याने येत असलेला ताजा रंजक कन्टेन्ट यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांत ऑनलाइन मनोरंजनाकडे सर्वसामान्यांचा ओढा अधिक वाढला आहे. नवरंजनाच्या या फलाटांवर सध्या वेबमालिकांच्या माध्यमातून घाऊक मनोरंजनाची हमी मिळते. नवनवीन आणि भडक विषयांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात येणाऱ्या वेबमालिकांची या फलाटांवर दररोज आवक सुरू असते. मात्र, त्यासोबतच या फलाटांवर नेहमीच लोकप्रिय ठरणाऱ्या थरार मालिकांचा फॉम्र्युलाही वापरण्यात येतच असतो. थरारक, गूढरम्य अशा मालिकांमध्ये सूड, द्वेष, प्रेम, आकस या भावनांभोवती फिरणारे कथानक हे सूत्र ओटीटीवरील अनेक मालिकांमध्ये दिसून येतंच. शिवाय अलीकडच्या काळात स्त्री पात्राला केंद्रस्थानी ठेवून गुंफल्या जाणाऱ्या मालिकांनाही चांगला प्रेक्षकवर्ग मिळतो आहे. ‘डिस्ने हॉटस्टार’वर गेल्याच आठवडय़ात प्रदर्शित झालेली ‘आर्या’ ही वेबसीरिज या तिन्ही सूत्रांतून साकारलेली आहे. जवळपास दीड दशकांनंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणारी सुष्मिता सेन या वेबमालिकेच्या शीर्षक भूमिकेत आहे, हे या मालिकेचे आणखी एक वैशिष्टय़.

आर्याच्या कथानकात फारशी गुंतागुंत नाही. ही कथा सरळ आहे. त्यात फ्लॅशबॅक किंवा फास्ट फॉरवर्डचा घोळ नाही; पण तरीही त्यातील थरार, रंजकता तसूभरही कमी होत नाही. उलट या सरळ प्रवासामुळे मालिकेचे कथासूत्र प्रामाणिक वाटते. अर्थात कथानक आणि मालिका मूळ डच मालिकेचा रिमेक आहे. ‘पेनोझा’ नावाच्या मालिकेवर प्रेरित होऊन राम माधवानी आणि संदीप मोदी या द्वयीने ‘आर्या’ची निर्मिती केली आहे. ‘पेनोझा’त अंडरवर्ल्डची दुनिया दिसते, तर ‘आर्या’मध्ये अफू आणि हेरॉइन यांसारख्या अमली पदार्थाच्या तस्करीचं जग आहे. आर्या सरीन (सुष्मिता सेन) ही एक उच्चभ्रू कुटुंबातील गृहिणी आहे. पती तेज (चंद्रचूड सिंग) आणि तीन मुलं यांच्यातच तिचं जग गुरफटलेलं आहे. मुलांना शाळेत नेणं-आणणं, मुलांच्या वाढत्या खर्चाचा ताळमेळ राखणं, घर सांभाळणं असं साचेबद्ध आयुष्य आर्या जगत आहे. तेज हा आर्याच्याच वडिलांचा अफू तस्करीचा उद्योग औषधनिर्मितीच्या उद्योगाच्या आड चालवत आहे. त्यात आर्याचा भाऊ संग्राम आणि त्याचा मित्र जवाहर हेही भागीदार आहेत. आर्याला तेजच्या या उद्योगाबद्दल कल्पना आहे. मात्र, आपल्याला वाटतंय त्याहीपेक्षा जास्त तेज या उद्योगात गुंतलाय हे कळल्यावर ती अस्वस्थ होते. खुद्द तेजलाही हा तस्करीचा व्यवसाय धोकादायक वाटू लागल्यामुळे तो हे सगळं सोडायला तयार होतो. हे सगळं व्यवस्थित पार पडेल, असं वाटत असतानाच तेजवर गोळीबार होतो आणि रुग्णालयात त्याचा मृत्यूही होतो. सुरुवातीच्या दोन भागांतील ही कथा तशी संथपणे पुढे सरकत असते. मात्र, त्यानंतर हे कथानक वेग पकडतं. अफू तस्करीचा उद्योग, त्यात गुंतलेली बडी घराणी, त्यांच्यातील वैर, कथित राजघराण्यांमधील कौटुंबिक हेवेदावे, प्रतिष्ठित कुटुंबांमधील बेगडी श्रीमंती आणि बनावट नात्यांची कहाणी अशी सगळी पार्श्वभूमी या दोन भागांनी तयार केल्यानंतर कथा आपल्या मूळ उद्देशाकडे सरकते आणि आतापर्यंत मागच्या सीटवर असलेली आर्या एकदम अग्रस्थानी येते. तेजच्या मृत्यूचा धक्का पचवत असतानाच तिच्यामागे तेजच्या कर्जदारांचा ससेमिरा सुरू होतो. तेजच्या हत्येचा सूड घेण्याची इच्छा, मारेकऱ्यांचा शोध घेण्याचं आव्हान, कर्जदारांची धास्ती आणि त्यात तिन्ही मुलांच्या व्यवस्थित संगोपनाची जबाबदारी ही सगळी संकटं परतावून लावण्यासाठी आर्या अधिक कणखरपणे उभी राहते. त्यातून एक प्रभावी थरारनाटय़ उभं राहातं.

कोणत्याही वेबमालिकेला यशस्वी करणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे, स्त्री, सूड आणि सस्पेन्स अर्थात गूढ. ‘आर्या’च्या कहाणीत या तिन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांवर योग्य प्रभाव पाडते. या मालिकेच्या रूपात सुष्मिताने पुनरागमनाचा योग्य पर्याय निवडला, असं म्हणायला हवं. कारण संपूर्ण मालिकेचा झोत ज्या व्यक्तिरेखेवर आहे ती व्यक्तिरेखा सुष्मिताने साकारली आहे. त्यात सुरुवातीच्या गृहिणीची धांदल आहे आणि नंतर विधवेचा सूडाग्नीही आहे. तिच्या व्यक्तिरेखेला अनेक कंगोरे आहेत; पण प्रत्येक रूपडय़ाला न्याय देणं तिला जमलेलं दिसत नाही. काही प्रसंगांत तिचं अवघडलेपणच अधिक जाणवत राहतं. हे काही प्रसंग सोडले तर ती आपल्या भूमिकेत फिट्ट बसली आहे. मालिकेतील अन्य पात्रे आपापली भूमिका योग्यपणे निभावून नेतात. त्यात आर्याचे वडील (जयंत कृपलानी), एसीपी खान (विकास कुमार), आर्याचा भाऊ संग्राम (अंकुर भाटिया) आणि दौलत (सिकंदर खेर) यांच्या भूमिका प्रभावी वाटतात. आर्याच्या मुलांची भूमिका करणाऱ्या कलाकारांचा अभिनयही चांगला झाला आहे. एकंदरीत या वेबमालिकेची भट्टी चांगली जमून आली आहे. सध्या टाळेबंदीमुळे टीव्हीवरील मालिका पाहायला मिळत नसतील तर आजचा रविवार हॉटस्टारवरील हा थरार जरूर अनुभवायला हवा.