News Flash

जिद्दी कलावंत!

प्रबळ आत्मविश्वास आणि रंगभूमीवर असलेल्या प्रेमापोटी आजारपणातच त्यांच्या दारी एक नाटक आणि एक मालिका चालून आली.

(संग्रहित छायाचित्र)

नीलेश अडसूळ

कर्करोगासारख्या गंभीर आजाराला कस्पटासमान मानून त्यावर यशस्वी विजय मिळवणाऱ्या अभिनेते शरद माधव पोंक्षे यांची रंगभूमीवरील ऊर्जा पाहून प्रेक्षकवर्ग सध्या थक्क होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे पाहता हा माणूस काही महिन्यांपूर्वी आजारी होता असे जाणवतही नाही. एकीकडे ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून ते नानासाहेबांची भूमिका साकारत आहेत, तर दुसरीकडे महादेव अग्निहोत्री म्हणून अग्निहोत्रींच्या वाडय़ातही ते लवकरच प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आजारपणातून सावरल्यानंतर एकही दिवस न थांबता हा अवलिया रंगभूमीच्या सेवेत रत झाला, एवढेच नव्हे तर सध्या नाटक आणि मालिका अशा दोन्ही आघाडय़ांवर खिंड लढवत आहेत.

प्रबळ आत्मविश्वास आणि रंगभूमीवर असलेल्या प्रेमापोटी आजारपणातच त्यांच्या दारी एक नाटक आणि एक मालिका चालून आली. त्यावेळी कोणतीही आश्वासनांची सरबत्ती न करता शरद यांनी सत्य परिस्थिती त्यांना सांगितली, परंतु त्यांच्यासाठी त्या नाटकाचे,  मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते थांबले ही कदाचित त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीची पोचपावतीच म्हणावी लागेल. याविषयी शरद पोंक्षे सांगतात, कर्करोगावर उपचार सुरू असतानाच राजेश देशपांडे नाटक तर सतीश राजवाडे मालिका घेऊन माझ्याकडे आले. माझ्यासाठी हे अनपेक्षित आणि तितकेच आशावादी होते, परंतु खोटी ग्वाही देण्याऐवजी मी सत्य काय ते सांगितले. असे असतानाही तुम्ही बरे व्हा मग आपण काम सुरू करू, असा त्या दोघांकडूनही मिळालेला हिरवा कंदील मोठा धीर देऊ न गेला. माझ्या कठीण काळातही माझ्यावर विश्वास ठेवून ते दोघेही माझ्यासाठी थांबले हे त्यांचे ऋण न विसरण्यासारखे आहे, असे सांगतानाच आजारपणाचा स्वत:ला बसलेला धक्का पचवून मला काही झालेच नाही अशाच वृत्तीने मी पुढे जार राहिलो, असे त्यांनी सांगितले. ‘आजही काम करताना मी फक्त कामाचा विचार करतो. जे द्यायचे ते शंभर टक्के द्यायचे अन्यथा द्यायचे नाही. म्हणूनच कदाचित साडेतीन तासांचा प्रयोग लोक डोळ्यांत प्राण आणून पाहतात आणि तितकीच भरभरून दाद देतात’, असेही पोंक्षे यांनी सांगितले.

‘हिमालयाची सावली’ या नाटकाच्या निमित्ताने लोप पावत चाललेला तीन अंकी नाटकाचा प्रवाह दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर आणला. हल्ली दोन अंकी नाटकाला जातानाही लोक हजारदा विचार करतात तिथे तीन अंकी नाटक आणणे तसे आव्हान होते. याविषयी पोंक्षे सांगतात, नाटकाच्या कालमर्यादेबाबत विचार करून पाहिला, परंतु अनेकदा वाचूनही नाटक कुठेच कमी करावे असे वाटले नाही. कारण संहिता कमी करून नाटकातला आत्मा गमावण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणून आव्हान स्वीकारले आणि तीन अंकी प्रयोग पुन्हा रंगभूमीवर सादर केला आणि तो यशस्वीही झाला.

‘कोणत्याही संकटात कौटुंबिक पाठिंबा असल्याशिवाय माणूस पुढे जाऊ च शकत नाही. माझी आई, पत्नी सविता, मुलं आणि माझा मित्र विवेक जोशी ही मंडळी सावलीसारखी सोबत होती म्हणून माझा विजय झाला. शिवाय सर्व स्नेही आणि रसिक मायबापांचे शुभाशीर्वाद सोबत असल्यामुळेच आज मी पुन्हा रंगभूमीवर उभा आहे’, असं ते सांगतात. आजारादरम्यान आलेल्या अनुभवांबद्दलही ते गमतीने सांगतात, ‘आजारादरम्यान वजन बरेच घटले, केस गेले, भुवया काढल्या त्यामुळे सामान्य लोक मला ओळखणार नाहीत याची खात्री होती. या काळात मी नित्याने नाटक पाहायला येत असे. तेव्हा नाटय़गृहात इतकी गर्दी असताना आपल्याला कुणीच ओळखत नाही या गोष्टीची खूप गंमत वाटायची. अशा वेळी खचून जाणे सहज शक्य होते, पण सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने अशा प्रसंगांना हसून सामोरे जाण्याचे बळ मिळाले’, असे ते म्हणतात.

‘हिमालयाची सावली’च्या प्रयोगानंतर भारावलेले प्रेक्षक आणि उपस्थित कलावंत भरभरून प्रतिक्रिया देतात. त्यातला स्मरणीय किस्सा सांगताना ते म्हणाले, १९७२ साली जेव्हा हे नाटक रंगभूमीवर आले तेव्हा रंगकर्मी मोहनदास सुखटणकर हे या नाटकाचा भाग होते. चाळीस वर्षांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आल्याने ते आवर्जून प्रयोगाला आले आणि प्रयोगानंतर ‘मी ७२ सालच्या नाटकाची प्रतिमा मनात घेऊ न नाटकाला आलो, परंतु या प्रयोगानंतर ती साफ पुसली गेली. आज नानासाहेब म्हणजे शरद पोंक्षेच अशी छाप या भूमिकेवर पडली’ असे सुखटणकर म्हणाले. त्यांची ही प्रतिक्रिया कायमची मनावर कोरली गेली, असे पोंक्षे सांगतात.

ज्या नाटकातून शरद पोंक्षे यांनी रंगभूमीवर दणदणीत पुनरागमन केले, त्या नाटकाविषयी पोंक्षे सांगतात, आज अमुक एका व्यक्तीचा आदर्श घेऊ न जगावे असा एकही आदर्श वर्तमानात राहिला नाही. सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत. कदाचित हीच या समाजाची शोकांतिका आहे. परंतु असा आदर्श तुम्हाला ‘हिमालयाची सावली’ या नाटकात नक्कीच पाहायला मिळेल. नि:स्वार्थी भावनेने समाजकारण करणाऱ्या एका सुधारकाची ही कहाणी प्रत्येक राजकारणी आणि कार्यकर्त्यांनी तर आवर्जून पाहावी, असे ते सांगतात. ‘अग्निहोत्र’ या आगामी मालिकेविषयी बोलताना ते म्हणाले, काही लोक आजही ऑनलाइन माध्यमातून जुनी मालिका पाहतात आणि प्रतिक्रिया कळवतात. ११ वर्षांनी मालिका येत असल्याने अनेकजण उत्सुक आहेत.आम्ही आमच्या जबाबदारीने मालिकेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु कुठेही प्रेक्षकांनी जुन्या मालिकेशी याची तुलना करू नये, उलट भरभरून प्रेम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘शिस्त हवीच’

एका वेळी नाटक आणि मालिका करणे हे पोंक्षेंना नवीन नाही, परंतु आता एकावेळी एकच काम करेन असं ते सांगतात आणि याचे कारण प्रकृती नसून मुंबईची प्रकृती बिघडल्याचे ते अधोरेखित करतात. त्यांच्या मते, पूर्वी चित्रीकरण करून मी नाटक करायचो किंवा नाटकाच्या प्रयोगानंतर चित्रीकरण असायचे. एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट थांबली, असे झाले नाही. रात्री कोल्हापुरात चित्रीकरण पूर्ण करून सकाळी मुंबईत प्रयोगाला मी हजर असायचो. परंतु सद्य:स्थिती पाहता तुम्ही नाटक करून मालिकेच्या सेटवर पोहोचणे अशक्य आहे. रस्त्यावरची वाहतूक कोंडी आणि एकंदर चित्र अत्यंत विदारक असल्याने इथे वेळेची शाश्वती देता देत नाही म्हणूनच एका दिवशी एक काम असे धोरण स्वीकारल्याचे ते सांगतात. शिवाय प्रत्येक चूक ही शासनाची नसते, निम्म्याहून अधिक गोष्टींना आपणच जबाबदार असल्याची खंत ते व्यक्त करतात. त्यांच्या मते, भारतातील लोकांना शिस्त लागायला हवी. कारण भ्रष्टाचार आजही तसाच आहे. आपल्याला रांग लावून काम करायची सवय नसल्याने प्रत्येक गोष्टीत वशिलेबाजी आणि लाच दिली-घेतली जाते. असे चित्र असताना राजकीय प्रतिनिधींना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. मंदिरात जातानाही रांगेपासून सुटका होण्यासाठी कुणी ओळखीचे भेटते का हे पाहण्याची आपल्याला सवय जडल्याने प्रत्येक गोष्टीत आपण पर्यायी मार्ग किंवा पळवाटा शोधू लागतो. आपण किती सरळ वागतो याचा प्रत्येकाने विचार करून मगच दुसऱ्याकडे बोट करावे, असा टोलाही पोंक्षे लगावतात.

‘‘राष्ट्रपती राजवट’ असाही पर्याय हवा’

सामाजिक आणि राजकीय स्थितीवर कायम परखडपणे भाष्य करणारे शरद पोंक्षे सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी विषण्ण झालो असल्याची भावना व्यक्त करतात. शिवाय हा लोकशाहीचा प्रभाव असल्याचेही ते सांगतात. आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे, परंतु वास्तवात त्याचा काही उपयोग आहे का?, असा विचार करायला लावणारी ही वेळ आहे. इथला प्रत्येक मतदार एका विशिष्ट विचारधारेचा असल्याने मतदान करताना तो त्याच विचारधारेचा पक्ष निवडतो. परंतु आता इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे उडय़ा मारू लागल्याने विचारधारेचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. अशा वेळी मतदारांनी नक्की कुणावर विश्वास ठेवून मतदान करायचे. त्यात निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘नोटा’ या पर्यायात किती तथ्य आहे हेही पडताळून पाहायला हवे. मतदानात ‘नोटा’चा आकडा पन्नास टक्क्यांहून अधिक आला तरी विजयी हा कोणता तरी पक्षच होणार असतो. त्यापेक्षा ‘राष्ट्रपती राजवट’ असा काही तरी पर्याय तिथे द्यायला हवा. जेणेकरून आम्हाला कोणत्याच पक्षाची सत्ता नको हे ठामपणे सांगता येईल, असे सडेतोड मत त्यांनी व्यक्त केले.

‘नेटकऱ्यांनो..’

शरद पोंक्षे यांनी समाजमाध्यमांवर आजवर अनेक विषय मांडले परंतु सध्या ते तिथून बाहेर पडले आहेत. ‘समाजमाध्यमांवरील वातावरण तकलादू झाले आहे. त्यामुळे पहिल्यासारखे काही लिहावेसे वाटत नाही’, असे पोंक्षे सांगतात. आपण लिहिलेल्या गोष्टी लोक नीट वाचत नाहीत, त्याचा अभ्यास करत नाहीत, आपापल्या सोयीने त्या वळवून घेतल्या जातात. केवळ एखाद्याचे नाव पाहून त्याची जात, विचार, पक्ष सगळे काही स्वत:च ठरवणाऱ्या लोकांची समाजमाध्यमांवर बरीच गर्दी झाली आहे. तुम्ही माझे समर्थन करा असे मी कधीच म्हणणार नाही, परंतु जे लिहिलेय ते आधी वाचा आणि मग व्यक्त व्हा, असा सल्ला ते नेटकऱ्यांना देतात. त्यामुळे सध्या तरी त्यांनी आपला मोर्चा पुन्हा व्याख्यानांकडे वळवला असल्याचे सांगितले.

‘‘सेन्सॉर’ची गरज आता संपली’

ज्या माध्यमाकडे तरुणाई मोठय़ा प्रमाणात आकर्षित झाली आहे ते वेब सीरिजचे माध्यम सशक्त माध्यम म्हणून समोर आले आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे याला ‘सेन्सॉर’ नाही. त्यामुळे जे मांडायचे आहे ते थेट आणि सडेतोड आहे. ज्याला जे आवडेल त्याने पाहावे. इथे कुणालाही सक्ती नाही. खऱ्या अर्थाने हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रयोग आहे, असेही म्हणणे वावगे ठरणार नाही, असे ते सांगतात. ‘सेन्सॉर’ची गरज आता संपली आहे. काय निवडावे आणि काय निवडू नये यासाठी प्रेक्षक सुजाण झाले आहेत. विशेष म्हणजे त्या कधीही, कुठेही आणि केव्हाही पाहता येत असल्याने त्याला लोकांची पसंती अधिक आहे. किंबहुना आता टीव्हीवरील वाहिन्यांनीही टीव्हीसोबत ऑनलाइन मालिका दाखवण्याचा पवित्रा उचलला आहे. बदलत्या काळानुसार माध्यमे आयाम घेत जातात आणि आपणही स्वत:ला त्यानुसार बदलायला हवे, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 4:26 am

Web Title: article on actor sharad ponkshe stubborn artist abn 97
Next Stories
1 ‘आमने सामने’ : लग्न अन् लिव्ह-इन्ची रंजक शल्यचिकित्सा
2 चित्ररंग : रुपेरी पडद्यावरही मोहीम फत्ते!
3 वेबवाला : मर्यादित चौकटीत, मर्यादित यश
Just Now!
X