पंकज भोसले

हयात असलेल्या किंवा नसलेल्या पॉप-रॉकस्टार्सचे चरित्रपट साधारणत: एकच कथाप्रवाह सोबत घेऊन आलेले असतात. म्हणजे कलाकाराची शून्यातून विश्व उभे करण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, अपार कष्टातून सिद्ध केलेले स्थान आणि अंतिमत: प्रसिद्धी-लोकप्रियतेच्या मार्गाने विकारविलासी भोगाद्वारे झालेला नाश. हॉलीवूडच्या सिनेमांमध्ये मुख्य व्यक्तिरेखेला देव्हाऱ्यात ठेवण्याइतपत प्रतिमासफेदी होत नसली, तरी एकटेपणा, अभावग्रस्त बालपण किंवा प्रेमअभावाचे दाखविले जाणारे हळवे टप्पे त्या त्या कलाकाराविषयी सहानुभूतीचे घाऊक पीक निर्माण करण्यात यशस्वी होतात.

जॉय डिव्हिजन बॅण्डचा प्रमुख गायक इयन कर्टीस याने २३ व्या वर्षी कारकीर्द ऐन भरात असताना केलेल्या आत्महत्येपर्यंतचा त्याचा आयुष्यपट दाखवणारा ‘कण्ट्रोल’, ‘द डोअर्स’ बॅण्डच्या जिम मॉरिसन याने २७ व्या वर्षी संपविलेल्या आयुष्याची कारणमीमांसा शोधणारा ‘द डोअर्स’, एलविस प्रेसले याला समांतर असलेल्या कण्ट्री संगीतसम्राट जॉनी कॅश याच्या संगीतकारकीर्दीतील चढ-उतार मांडणारा ‘वॉक द लाइन’ हे चांगले चरित्रपटही एकाच प्रकारच्या फॉर्म्युलाबद्ध व्यक्तिचित्रणामध्ये रमलेले दिसतात. नाही म्हणायला बॉब डीलनचा जीवनपट अद्भुत प्रयोगांनी रंगविलेला ‘आय अ‍ॅम नॉट देअर’ हा या प्रकारच्या चरित्रपटांमध्ये सर्वात वेगळा म्हणता येईल. तरी डीलनच्या जगापासून फटकून लांब राहण्याचा गुण या चित्रपटानेही प्रेक्षकांबाबत अंगीकारला. यंदा ऑस्करच्या सवरेत्कृष्ट चित्रपटांच्या गटात दाखल झालेला ब्रायन सिंगर दिग्दर्शित ‘बोहेमियन राप्सोडी’ हा क्वीन बॅण्डमधील प्रमुख गायक फ्रेडी मर्क्युरी याच्या संगीत आयुष्यावरील चित्रपट वरील उदाहरणांपेक्षा वेगळे काय देतो याबाबतचे कुतूहल मिटविण्यासाठी पाहणे आवश्यक ठरतो.

फारूख बलसारा नाव घेऊन भारतीय पारशी दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या आणि पाचगणीतील बोर्डिग स्कूलमध्ये पौगंडावस्थेपर्यंत शिक्षण घेतलेल्या फ्रेडी मर्क्युरीच्या भारतीयत्वाचा शोध गेल्या दशकभरात अनेक आंग्ल वृत्तपत्रांनी घेतला आहे. अगदी त्याच्या शालेय जीवनातील छायाचित्रापासून ते त्याच्या मुंबईतील वास्तव्याबाबत भारतीयांना अभिमानास्पद वाटावे इतकी माहिती त्यातून मिळू शकते; पण १९६३ साली भारत आणि भारतीयत्व त्याग केलेल्या या कलाकाराने आपल्या आई-वडिलांसोबत ब्रिटनमध्ये बस्तान बसविले. ‘बोहेमियन राप्सोडी’ हा चित्रपट हीथ्रो विमानतळावर चतुर्थ श्रेणीतील काम करणाऱ्या तरुण फारुख बलसाराच्या संगीतस्वप्नांपासून सुरू होतो. लंडनमधील क्लब बॅण्डमध्ये आपल्या असामान्य पट्टीच्या आवाजामुळे करून घेतलेला शिरकाव आणि धाकड-धाडसी वृत्तीमुळे त्या बॅण्डवर अंमल गाजवत ‘क्वीन’ नामांतराद्वारे सत्तर-ऐंशीच्या दशकाला ताब्यात घेणारी त्याची सांगीतिक वाटचाल, यांचा वेध घेण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो.

फारुख ऊर्फ फ्रेडी (रॅमी मालेक) बॅण्ड उभारणीसोबत मॅरी ऑस्टेन (लुसी बॉइण्टन) हिच्यासोबत ‘पहिल्या प्रेमाची गाणी’ गाताना दिसतो. क्लब म्युझिक वर्तुळातून, रेडिओ आणि अल्बम अशा प्रसिद्धीच्या सुसाट वेगामध्येच या बॅण्डच्या ‘बोहेमियन राप्सोडी’ या ऐतिहासिक गाण्याची निर्मितीप्रक्रिया पाहायला मिळते. अर्थ काढणे अशक्य असलेले हे गाणे फ्रेडी मर्क्युरीच्या इतर अनेक गाण्यांप्रमाणे आत्मचरित्रात्मक आहे. त्यात कुराणातील अनेक शब्दांचा भरणा आहेच पण त्यासोबत ‘गॅलिलिओ’ या शब्दाला अतिउच्च पट्टीत म्हणण्याचा विचित्र प्रयोगही करण्यात आला आहे. रेकॉर्ड कंपनीच्या संचालकाने गाण्याचा सहा मिनिटांचा अवधी आणि बिसमिल्लासह त्यातील काही शब्दांना आक्षेप घेत नाकारल्यानंतरही या बॅण्डने ते गाणे हिट करून दाखविले. क्वीन बॅण्डच्या या प्रायोगिक गाण्याचा जगभर बोलबाला झाला. गाण्याच्या लोकप्रियतेची पावती दाखविण्यासाठी तत्कालीन मासिके, साप्ताहिके, वृत्तपत्रांनी गाण्याविषयी मांडलेल्या नोंदींचा कोलाज चित्रपटातील दृश्यांमध्ये अत्यंत चलाखीने एकत्रित करण्यात आला आहे.

अर्थातच हा चित्रपट शीर्षकासाठी वापरण्यात आलेल्या या एकाच गाण्याची कहाणी सांगत नाही, तर त्यांच्या ‘वी विल, वी विल रॉक यू’ या गाण्याची जन्मकथाही उभी करतो. यादरम्यान परमोच्च यश, पैसा, प्रसिद्धी, चाहत्यांच्या गराडय़ात तयार झालेला माज, समलैंगिक असल्याची जाणीव झाल्यानंतर तुटलेले प्रेम आणि वाढत जाणारे एकलेपण यांच्या गर्तेत हरवत जाणारा फ्रेडी येथे रंगविण्यात आला आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर कुसंगतीने बॅण्ड सहकाऱ्यांशी काडीमोड घेऊन एकल प्रसिद्धीचा ध्यास घेताना बेधुंद जीवनशैलीत या कलाकाराला एड्स रोगाने घेरले. त्याच्या या जीवनाचा त्रोटक आणि वरवरचा परिचय देऊन आजारानंतरच्या परिमार्जनाला महत्त्व देण्यात आले आहे. मोडलेल्या क्वीन बॅण्डचा जीर्णोधार करून त्याने या बॅण्डचे लोकप्रियक संगीत जगतातले स्थान अबाधित केले.

एमटीव्ही काळात चलती असणाऱ्या या बॅण्डच्या लोकप्रिय गाण्यांच्या व्हिडीओ निर्मितीपासून ते त्याच्या सर्वात गाजलेल्या अखेरच्या काळातील लाइव्ह कन्सर्टपर्यंत (मूळ कन्सर्ट तुलनात्मक अभ्यासासाठी यूटय़ुबवर उपलब्ध आहे)  हा चित्रपट फ्रेडी मक्र्युरी या व्यक्तीविषयी त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या सर्वच वाईट चर्चाना पुसण्याचा प्रयत्न यशस्वीरीत्या करतो.

दुसऱ्या कोणत्याही कलाकाराला उभारता आला नसता इतका हुबेहूब फ्रेडी मक्र्युरी येथे रॅमी मालेक याने साकारलेला आहे. केवळ चेहरेपट्टीतच नाही, तर हावभाव आणि अंगातील ऊर्जेसह फ्रेडी मर्क्युरी म्हणून जगलेला मालेक यंदा ऑस्करच्या सर्वोत्तम भूमिकेचा दावेदार आहे. आपल्याकडे लागलेला असताना सरधोपट म्युझिकल म्हणून पाहण्याचा राहिला असल्यास ऑस्करच्या मानांकनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे दर्शन अत्यावश्यक आहे. रॉकस्टार्सच्या विकारविलासाचे फॉर्म्युलाबद्ध घटक असूनही या सिनेमाचा आस्वाद आनंददायी ठरू शकेल.