News Flash

इतिहासाचे रिमिक्स..

काही कादंबऱ्या आणि सद्य:स्थितीतील काही इतिहासावर आधारित चित्रपट पाहता ‘इतिहास वळवावा तसा वळतो’ असे म्हणायची वेळ आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नीलेश अडसूळ

‘मराठी भाषा वळवावी तशी वळते’ अशी एक संज्ञा मराठी भाषेत चांगलीच प्रचलित आहे. महाराष्ट्राची भौगोलिक आणि वाङ्मयीन विविधता पाहताना याचा प्रत्यय येतोही, त्यामुळे हे असत्य आहे असेही नाही. परंतु काही कादंबऱ्या आणि सद्य:स्थितीतील काही इतिहासावर आधारित चित्रपट पाहता ‘इतिहास वळवावा तसा वळतो’ असे म्हणायची वेळ आली आहे.

इतिहासातही अनेकांनी हवा तसा ‘पराक्रमी-इतिहास’ लिहून घेतला होता, पुढे कादंबऱ्या लिहिताना लेखकांनीही आपल्या नजरेला जसा दिसेल तसा इतिहास रंगवला त्यामुळे आता जर एखाद्याने इतिहासाचा अभ्यास सुरू केला तर नक्की खरा इतिहास कोणता? असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहील. त्यामुळे इतिहासातील व्यक्ती जरी खऱ्या असल्या, त्यांचा पराक्रम जरी दिव्य असला तरी त्या काळात नेमकं काय झालं असेल हे ठामपणे कुणालाही सांगणे शक्य नाही. आता तो सांगायचा असेल तर केवळ अंदाज लावून त्याची मांडणी करणे क्रमप्राप्त ठरले. परंतु अशा वेळी अंदाज आणि तार्किक मांडणीला आकार देण्याचे काम करतात ते संदर्भग्रंथ आणि जेव्हा अशा ग्रंथाचा आधार घेऊन, कल्पनाविलासाच्या मर्यादा न ओलांडता कलाकृती घडवली जाते तेव्हा ती इतिहासाला स्पर्श करणारी कलाकृती ठरते. अन्यथा ‘डायरेक्टर्स लिबर्टी’च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करून २०२० सालच्या अनुषंगाने मांडलेला इतिहास हल्ली सर्रास चित्रपटांमधून पाहायला मिळतो आहे आणि तो चवीने पाहण्यात लोकांनाही समाधान वाटते हेच खरं दुर्दैव.

गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपटांनी, मालिकांनी आपला मोर्चा इतिहासाची पाने चाळण्याकडे वळवला आहे. तरुणांपर्यंत इतिहास पोहोचवणे हा जरी मागील उद्देश असला तरी ऐतिहासिक भूमिकांच्या नावावर होणारा ‘गल्ला’ हेदेखील त्याचे प्रमुख कारण आहे. यात सगळ्याच कलाकृती या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या आहेत, असे म्हणणे अयोग्य ठरेल, काही कलाकृती खऱ्या अर्थाने इतिहासाला न्याय देणाऱ्या आहेत, परंतु काही कलाकृतींमधला जाज्ज्वल्य इतिहास पाहून मात्र ‘साशंक इतिहासाची पाने’ उलगडल्याची भावना मनात येते. ती कदाचित सामान्य प्रेक्षकांना लक्षात येणार नसेलही, परंतु जाणकार, अभ्यासक, तज्ज्ञांसाठी मात्र तो चर्चेचा विषय ठरतो.

याविषयी  इतिहास अभ्यासक आणि अनेक ऐतिहासिक चित्रपट मालिकांचे मार्गदर्शक प्रा. हरी नरके सांगतात, चित्रपट कसाही असो तो ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर आहे म्हणजे त्याला तुफान प्रतिसाद मिळतो. आता त्यातला कथाभाग आणि इतिहासाची मोडतोड पाहता ‘लिबर्टी’ या एका शब्दात ती झाकून टाकली जाते. मग लिबर्टीच्या नावाखाली प्रामुख्याने तीन प्रकारची मोडतोड सिनेमात होते, एक म्हणजे गौरवीकरण किंवा उदात्तीकरण. दुसरं म्हणजे त्या काळाला २०२० च्या नजरेतून मांडणे आणि तिसरं म्हणजे तंत्रज्ञान आणि व्हीएफएक्सचा भडिमार. आपल्याकडे ज्या व्यक्तिरेखेवर चित्रपट केला जातो, त्याचे उद्दात्तीकरण करून आहे त्या वास्तवाला फुगवून सांगितले जाते. शिवाय इतिहासाचा कालखंड लक्षात न घेता त्या काळातील अनेक घटनांना २०२० चा आयाम दिला जातो. विशेषकरून प्रेमप्रसंगामध्ये किंवा समाजव्यवस्थेत हा अधोरेखित होतो. तर व्हीएफएक्सच्या वापरातून असं काहीतरी उभं केलं जातं जे पाहून प्रेक्षक अचंबित होतात. इथे कोणत्याही चित्रपटाचे नाव घेणे गैर राहील, परंतु अशा तंत्रज्ञानातून चित्रपटाचा कथाभाग वास्तविक इतिहासापासून बराच दूर गेलेला असतो. त्यांच्या मते, चित्रपट तयार करताना प्रचंड पैसे खर्च करावे लागतात आणि पर्यायाने ते वसूल होणेही गरजेचे असते. या चित्रपटामागील गणितामुळे इतिहास सध्या ‘करमणुकी’च्या दिशेने वाटचाल करत आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

चित्रपट वाईट आहेत असे नाही, परंतु ते अभ्यासपूर्ण करण्याकडे अधिक कल असावा. ‘दंगल’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘गांधी’ आणि असे कितीतरी दर्जेदार चित्रपट आहेत ज्यांनी अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे अभ्यासपूर्ण मांडणीलाही लोक स्वीकारतात हे लक्षात घ्यायला हवे. प्रेक्षकांनी असे चित्रपट पाहताना काळजीपूर्वक पाहावेत असा सल्लाही नरके देतात. त्यांच्या मते, आपण पाहात असलेला इतिहास विश्वासार्ह आहे का हे प्रेक्षकांनी पडताळून घ्यावे. किंबहुना चित्रपटातून समोर आलेला ‘इतिहास हा विश्वासार्ह नाही’ याची प्रेक्षकांमध्ये जाणीव निर्माण करायला हवी. म्हणजे लोक चुकीचा इतिहास घेऊन घरी जाणार नाहीत. ‘र्फजद’, ‘फत्तेशिकस्त’सारखे चित्रपट याला नक्कीच अपवाद आहेत. दिग्पाल लांजेकर हा तरुण दिग्दर्शक आपल्या चित्रपटातून अभ्यासपूर्ण इतिहास मांडतो आहे. याबद्दल त्याचे कौतुक करावेसे वाटते, असे नरके म्हणतात. या चित्रपटांचा सकारात्मक परिणाम कधी होईल, जेव्हा चित्रपट पहिल्यांनंतर प्रेक्षक घरी जाऊन कथेवर विचार करतील, इतिहास पडताळून पाहतील आणि तो पाहण्यासाठी संदर्भ ग्रंथ हातात घेतील. तेव्हा काहीतरी सार्थकी लागेल अशी दुसरी बाजूही ते मांडतात.

तर इतिहास पटांची निर्मिती करणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतो, चित्रपटाची निर्मिती करताना त्यामागील इतिहास, पाश्र्वभूमी, वंशावळ याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. मुळात भविष्यात चित्रपट हे ग्रंथाइतकेच महत्त्वाचे ठरले पाहिजे म्हणून त्यांची निर्मिती ही अभ्यासपूर्णच व्हायला हवी. चित्रपटानंतर जर कोणी आशयावर बोट उचलले तर त्या घटनांचे संदर्भ पुराव्यांसहित देण्याइतका आपला अभ्यास असायला हवा. चित्रपट साकारताना त्यात मनोरंजन आणि कल्पनाविलास या गोष्टी येतात, परंतु त्या आणतानाही कथेला त्या काळाशी जोडून तार्किक विचार व्हायला हवा. इतिहास हेही एक प्रकारचे विज्ञान आहे त्यामुळे त्याला तर्काची जोड देऊन मांडणी व्हायला हवी, असेही दिग्पाल सांगतो.त्याच्या मते, जे नाही ते चित्रपटात रोवण्यापेक्षा जे आहे त्यांची मांडणी अधिक स्पष्टपणे व्हायला हवी. अन्यथा मनासारखा इतिहास दाखवण्यासाठी ‘डिस्क्लेमर’चा पर्याय असतोच. पण त्याचा कितपत आधार घ्यावा हे मात्र त्या त्या दिग्दर्शकांनी ठरवावे. आगामी येणाऱ्या ‘जंगजौहर’ चित्रपटाचा अभ्यास करण्यासाठी स्वत: पावनखिंडीत जाऊन तो काळ, तिथल्या घटना समजून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. आजही त्या पावनखिंडीत सहज चालणे शक्य नाही मग तेव्हा आपले मावळे कसे लढले असतील हा अभ्यास होणे गरजेचे आहे. इतिहास प्रेरणादायी असला म्हणजे अतिरंजकतेने मांडावा असा त्याचा अर्थ होत नाही. गेली बारा वर्षे मी स्वत: इतिहासाचा अभ्यास करतो आहे आणि त्या काळातील इतिहासासोबतच सांस्कृतिक जीवनाचा अभ्यासही चित्रपटातून मांडण्याचा माझा प्रयत्न आहे, असे त्याने सांगितले.

नुकताच आलेला ‘तान्हाजी’ चित्रपट आणि त्याच्या इतिहासावरून झालेले वाद प्रत्येकालाच माहिती असतील. पण नेमका इतिहास काय याविषयी मालुसरेंच्या वंशज शीतल मालुसरे सांगतात, तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर चित्रपट केला गेला, तो जगभर पोहोचला याचा आनंद आहेच, परंतु त्या चित्रपटात अनेक संदर्भ चुकले आहेत हेही मला ठाऊक आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मी ते निदर्शनासदेखील आणून दिले होते, परंतु त्याच्यावर पुढे काहीच विचार झाला नाही. गेली दहा वर्षे मी स्वत: ‘तान्हाजी’चा अभ्यास करते आहे. चित्रपटाचा शेवट मला पटलाच नाही.  ‘युद्धभूमीवर तान्हाजी धारातीर्थी पडल्यानंतर शेलार मामा आणि सूर्याजी मालुसरेंनी किल्ला लढवला’, असा इतिहास लिखित आणि सर्वश्रुत असताना तान्हाजी मालुसरेंनी शेवटचा वार केला असे दाखवण्यात आले, जे अत्यंत चुकीचे आहे. याऐवजी ‘उदयभानावर शेवटचा वार शेलार मामांनी केला, असे दाखवले असते तर नक्कीच इतिहासाला न्याय मिळाला असता.  लिबर्टीच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी इतिहासाची मोडतोड केली आहे.

जी नागीण तोफ इतिहासात कुठेच आणि कधीच नव्हती तीही या चित्रपटात दाखवली गेली आहे. प्रेक्षकांना जरी हा चित्रपट आवडला असला, तो जगभर पोहोचला असला तरी जाणकारांना मात्र यातला इतिहास खटकणारा आहे हे मात्र नाकारता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पूर्वीही लोकसाहित्यात, संत वाङ्मयात प्रबोधनासोबत रंजन हे होतेच, परंतु केवळ रंजन हा त्यांचा उद्देश नव्हता. आता लोकांपर्यंत आशय पोहोचवण्याचे मध्याम चित्रपट आहे, परंतु सध्याच्या चित्रपटांनी ‘रंजन रंजन आणि रंजन’ असा एककलमी कार्यक्रम स्वीकारल्याचे दिसते. मग रंजन हा एकवेम उद्देश असेल तर ‘आभासी इतिहास’ दाखवण्यापेक्षा अवांतर विषयांना आपल्याकडे काही तोटा नाही. मनोरंजन हे आवश्यक आहेच, परंतु मनोरंजनाच्या नावाखाली दिग्दर्शक-निर्मात्यांनी आपण समाजाला निर्बुद्ध करमणुकीकडे घेऊन चाललो आहोत याचे भान बाळगायला हवे.

– हरी नरके, इतिहास अभ्यासक

बॉलीवूडमध्ये सर्रास वीर व्यक्तिमत्त्वांना नाचवले जाते. ही बाब अत्यंत खटकणारी आहे. ७१ युद्ध लढणारे बाजीराव जर नाच करत असतील तर असा इतिहास नक्कीच साशंक आहे. उद्या माझ्या लहान मुलीने चित्रपट पाहून प्रश्न केला की, बाबा बाजीराव असेच नाचले होते का, तर तिला काय उत्तर द्यावे हा मोठा प्रश्न आहे. चित्रपटांचा विचार क्षणासाठी न करता आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतो आहोत याचाही विचार दिग्दर्शक निर्मात्यांनी करायला हवा.  इथला प्रेक्षक भाबडा आहे त्याला माहितीपट आणि चित्रपटातला फरक कळत नाही. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी तरी जबाबदार असायला हवे.

– दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 4:46 am

Web Title: article on breakdown of history under the name of directors liberty abn 97
Next Stories
1 लुकलूकत्या गोष्टी : ‘हा ड्रेस मला खूप आवडला’
2 ‘द मिरर क्रॅक्ड’ नाटकाच्या निमित्ताने..
3 कलासक्त चित्रपट‘हिज फादर व्हॉइस’चे जगभरात प्रक्षेपण
Just Now!
X