नीलेश अडसूळ

‘निरमा निरमा वॉशिंग पावडर निरमा..’ ही जाहिरात आजही अनेक पिढय़ांना सहज आठवते.  हीच नव्हे तर यासारख्या अनेक जाहिराती लोकांना तोंडपाठ आहेत. काही जाहिरातींच्या जिंगल तर अंताक्षरीच्या खेळातही आवर्जून गायल्या जातात. थोडक्यात, काय तर मालिका किंवा चित्रपट पाहताना जाहिरात लागताच, आपण लगेच दुसऱ्या वाहिनीवर उडी मारतो. परंतु सगळ्याच वाहिन्यांवर जाहिरातींचे सत्र सुरू असल्याने या ना त्या कारणाने त्या पहिल्या जातात. आणि केवळ पाहिल्याच जात नाहीत तर पाहणाऱ्याला त्या प्रभावित करून जातात. जाहिरातीतील आशय आकर्षक किंवा रंजक असेल तर बऱ्याचदा या जाहिरातींचा प्रभाव अनंत काळासाठी राहिल्याचेही आपल्याला दिसते. पूर्वी ज्याप्रमाणे जिंगलने लोकांना वेड लावले होते तसे आता बदलत्या आशयाच्या सामाजिक जाहिरातींनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे यात कोणतेही मोठे चेहरे नाहीत किंवा मोठय़ा वाहिन्या नाहीत तर अगदी समाजमाध्यमांची साथ आणि दर्जात्मक आशयावर त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

पूर्वीही जाहिराती असायच्या, परंतु त्याचे स्वरूप काहीसे वेगळे होते. दूरचित्रवाणीच्या आधीही आकाशवाणी हे जाहिरात प्रसारणाचे काम करत असे. त्या वेळी श्रवण माध्यमातून कमीतकमी वेळात जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिंगल गीतप्रकार वापरला गेला आणि तो तितक्या प्रभावीपणे पोहोचलाही.  पुढे तो दूरचित्रवाहिनीवर आला आणि अधिक प्रचलित झाला. तेव्हापासून ते आजपर्यंत साधारण तीन ते चार दशकांचा काळ जाहिरात विश्वावर जिंगलने अधिराज्य गाजवले. परंतु गेल्या काही वर्षांत जाहिरात क्षेत्रात झपाटय़ाने बदल होताना दिसत आहेत. या नव्या प्रवाहातील सर्वात मोठा बदल म्हणजे जाहिरातींचा बदलता आशय आणि सामाजिक समस्यांकडे घेतलेली धाव होय. कारण जाहिरात म्हटलं की जिंगल, भावनिक संवाद अशाच काहीशा कल्पना आपल्या डोळ्यांपुढे येतात. परंतु याच कल्पनांना छेद देणाऱ्या जाहिराती सध्या वाहिन्यांवर आणि विशेषकरून समाजमाध्यमांवर येत आहेत. ज्या जाहिरातींना ना वेळेचे बंधन आहे ना आशयाचे, केवळ जे मांडायचे आहे ते प्रभावीपणे मांडण्याकडे या जाहिरातींचा कल दिसतो.

गेली अनेक वर्षे जाहिरात आणि मग चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून लौकिक मिळवलेले रवी जाधव या बदलत्या प्रवाहाविषयी सांगतात, आशयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पूर्वीपेक्षा आशय अधिक खालावलेला दिसतो. म्हणूनच कदाचित पूर्वीच्या जाहिराती आजही तोंडपाठ आहेत, परंतु आताच्या चार जाहिराती सांगा म्हटलं तर चटकन कुणाला सांगता येणार नाही. पण दुसरीकडे समाजमाध्यमांवर मात्र लोक आवर्जून जाहिराती पाहत आहेत. कारण वस्तू तीच असली तरी ती लोकांसमोर मांडताना सामाजिक समस्यांवर भाष्य करत मांडली जाते. जेणेकरून अप्रत्यक्षपणे लोकांच्या भावनिकतेला आवाहन केले जाते म्हणून या जाहिराती लोकप्रिय ठरत आहेत. यामागे वेळ हेदेखील एक महत्त्वाचे कारण वाटते, असे ते सांगतात. दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांवर पूर्वी ३० सेंकदांहून अधिक दिला जाणारा वेळ आज १० ते २० सेकंदांवर आला आहे. एवढय़ा कमी वेळात जाहिरात निर्मात्यालाही काही मोजक्याच गोष्टींना प्राधान्य देणे शक्य होते, परिणामी जाहिरातींचा दर्जा ढासळतो. दूरचित्रवाणीवर काही सेकंदांसाठी लाखो रुपये देणेही हल्ली कंपन्यांना खर्चीक वाटू लागले आहे. त्यात बडे चेहरे आले की खर्च अधिकच दुणावत जातो.

समाजमाध्यम परवडण्याजोगे आणि लोकांपर्यंत झपाटय़ाने पोहोचणारे असल्याने कंपन्या आणि जाहिरातनिर्माते दोघांनाचाही त्या दिशेने ओढा आहे. विशेष म्हणजे तरुण वर्ग यात अधिक उत्साहाने उतरला आहे. किंबहुना भारतातील या नव्या आशयाच्या जाहिराती जगभरातील पुरस्कारांच्या मानकरी ठरत आहेत. आज ज्याप्रमाणे ओटीटी माध्यम लोकप्रिय होत आहे ते पाहता जाहिरातीही हळूहळू ओटीटीकडे झुकतील. परंतु तिथे सर्वात मोठे आव्हान असेल ते जास्तीतजास्त प्रेक्षकवर्ग, लाइक आणि शेअर मिळवणे. ताकदीचा आशय असेल तरच या जाहिराती तग धरतील अन्यथा वाढत्या स्पर्धेत टिकणे कठीण आहे, असे रवी जाधव यांनी स्पष्ट केले.

तर जाहिरातींमध्ये झालेला हा बदल इंटरनेट, समाजमाध्यम अशा घटकांमुळेच झाला आहे. या घटकांमुळे ज्याप्रमाणे चित्रपट आणि मालिकांमध्ये बदल झाला आहे त्याप्रमाणेच जाहिरातींचेही स्वरूप पालटून टाकले आहे, असे मत जाहिरात-चित्रपटविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या दिग्दर्शक अभिनय देव यांनी व्यक्त केले. सामाजिक आशयाच्या जाहिराती वरून व्यवसाय म्हणून केल्या असल्या तरी त्यातून पोहोचवला जाणारा सामाजिक संदेश हा जनजागृती करणारा आहे. त्याच जाहिराती सतत डोळ्यांपुढे येत असल्याने लोक विचार करायला प्रवृत्त होतात आणि याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. विशेष म्हणजे तरुण मुलांच्या सामाजिक जाणिवा दृढ होत असल्याने ते स्वत: आशयनिर्मिती करत आहेत. आणि हाच आशय जाहिरात क्षेत्राचे रूप पालटून टाकणारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवाय सामजिक आशयामुळे वस्तूला प्राप्त होणारा दर्जा मोठमोठय़ा उद्योजकांच्या लक्षात आल्याने तेही ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या पलीकडे जाऊन सामाजिक समस्यांचा विचार करत आहेत, असे अभिनय यांनी सांगितले. जाहिरातींमधून पूर्वीही भावनिक आवाहन केले जायचे, परंतु ते करताना आता सामाजिक भान आणि जबाबदारीचा आधार घेतला जातो ही स्तुत्य बाब आहे. जिंगल ऐकणारा वर्ग कमी झाला, दृश्य टिपण्याचे तंत्रज्ञान बदलले, संकलनाचे स्वरूप पालटले आणि अशा अनेक गोष्टी बदलल्याने जाहिराती अधिक ‘सिनेमॅटिक’ झाल्या आहेत. जग बदलल्याचा जो काळ आहे तो हाच म्हणता येईल. जाहिरात पाहून ‘चॅनेल’ बदलण्याच्या आतच ती लोकांना भावली पाहिजे याकडे अधिक भर दिला जातो, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक आशयाच्या जाहिराती आज आल्या आहेत असे नाही, पूर्वीही त्या होत्या परंतु ते मांडण्यासाठी माध्यम नव्हते. आज सुदैवाने समाजमाध्यमांमुळे अशा जाहिरातींना व्यासपीठ मिळाले आणि याचा उपयोग कंपन्यांना विक्रीसाठी नाही तर चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी होतो आहे, असा वेगळा दृष्टिकोन दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी मांडला.  तीन मिनिटांची जाहिरात यू टय़ूब किंवा कोणत्याही माध्यमांवर आपण बघतो, ती आवडली तर शेअर करतो. पण ती जास्त वेळा एकाच माणसाकडून पहिली जात नाही. त्याचा परिणाम होत नाही असे नाही. परंतु दुसरीकडे वाहिन्यांवर तीस सेकंदांच्या जाहिराती तीनशे वेळा दाखवल्या जातात. परिणामी त्यांचाही प्रभाव आपल्यावर पडत असतो हे विसरून चालणार नाही, याकडे लक्ष वेधतानाच  कोणत्या जाहिरातीतून काय घ्यायचे याबाब प्रेक्षकांनी जागृत असायला हवे. जाहिरात भावली म्हणजे वस्तू उत्तमच असेल असे नाही, असा सल्ला दाभोळकर देतात. जाहिरातींनी लघुपटांचे रूप घेतल्याने सर्जनशीलतेला नवे दालन मिळाले आहे, परंतु हे करत असताना नव्या पिढीने विषय आणि उद्देश यापासून हलता कामा नये. जाहिरात क्षेत्रात वेळेची मर्यादाही पाळायलाच हवी, असा स्पष्ट सल्ला त्यांनी नवनिर्मात्यांना दिला.

वेगवेगळ्या जाहिरातींमधून काम केलेल्या अभिनेता निखिल रत्नपारखी यांच्या मते, काळानुसार सगळीच माध्यमे बदलत गेली तसेच जाहिरातीही बदलल्या. लोकांच्या गरजा बदलल्या की आशय बदलतो हे यामागचे सूत्र आहे. आज वाढत्या तंत्रज्ञानात सामजिक भान जपणे लोकांना अधिक महत्त्वाचे वाटत असल्याने सामाजिक आशयाच्या जाहिरातींचा खप जास्त आहे. आणि लोकांना काय आवडतं तेच दाखवण्याचा अट्टहास प्रत्येक माध्यमाचा असतो, कारण लोकांच्या मानसिकतेपलीकडे जाण्याची जोखीम कोणतेच माध्यम, निर्माते किंवा कंपनी सहजासहजी स्वीकारत नाही, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ओटीटीप्रमाणे या माध्यमांवरच्या जाहिरातींना वेळेचे बंधन नसल्याने, ब्रेकनंतर हे पाहायचेच आहे असे नसते. तुम्हाला वाटेल तेव्हा पाहा, नसेल तर ‘स्किप’ करून पुढे जा आणि आवडली तर लोकांपर्यंत पोहोचवा असे सरळ गणित असल्याने तरुणांना या जाहिराती अधिक भावतात, असे रत्नपारखी यांनी सांगितले. कंपन्या आणि निर्माते लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी विविध प्रयोग करून पाहत असतात. त्यातला सामाजिक आशय हा सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला प्रकार म्हणता येईल. आज हा ट्रेंड आहे, उद्या अजून काही येईल, परंतु जाहिराती येत राहतील, ट्रेंडनुसार त्याही बदलतील. कारण अन्न-वस्त्र-निवारा यानंतर जाहिरात ही माणसाची चौथी गरज झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जाहिराती मग त्या वाहिनीवर असोत वा समाजमाध्यमांवर त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे, यात शंका उरलेली नाही. किंबहुना, लोकांच्या दैनंदिन समस्या, विषय यांना हात घालत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या कमीतकमी वेळात आकर्षक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याने जाहिरातींचा प्रभाव वाढताच राहणार असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

चहा पावडरच्या उत्पादनापासून ट्रॅक्टर असो, ‘गूगल’ची जाहिरात असो वा म्युच्युअल फंड कंपनीची जाहिरात असो. या प्रत्येक जाहिरातीतला आशय हा जाणीवपूर्वक एखाद्या सामाजिक विषय किंवा मुद्दय़ावर भर देणारा असतो. ट्रॅक्टरची जाहिरात ही सर्वसाधारणपणे त्याचे इंजिन कसे आहे, ताकद काय, यावर भर देणारी असते. मात्र, ‘इंडो फार्म’ या ट्रॅक्टर कंपनीची जाहिरात मोठय़ा प्रमाणावर गाजली. यात कंपनीने शेतकरी देशासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्या कष्टांविना आपले जगणे कसे कठीण होऊन बसेल, याबद्दलचे भावनिक आवाहन उत्कृष्ट गीत-संगीत याचा मेळ घालत दिले आहे. कोणताही मोठा चेहरा नसताना ही जाहिरात लोकांना खूप भावली. ‘प्रेगा न्यूज’ हे गर्भधारणा चाचणी करणारे यंत्र साधारण गोड बातमीचा आधार घेऊ न दाखवले जाते, परंतु मुलगा-मुलगी भेद करण्यापेक्षा मूल आणि आई हे सुखरूप असणे गरजेचे आहे हे या जाहिरातीतून दाखवण्यात आले आहे. विशेषकरून या जाहिरातीत तृतीयपंथी समाजाचाही समावेश करण्यात आला आहे, तर ‘रस्ता आपल्या बापाचा नाही’ हे आशयसूत्र घेऊन वाहतुकीचे नियम सांगणारी जाहिरात शासनाकडून करण्यात आली आहे. अक्षयकुमारने केलेल्या या गमतीदार पण प्रबोधनात्मक जाहिराती चांगल्याच परिणामकारक ठरल्या. ‘गूगल’ या शोध माध्यमाने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देत फाळणीच्या काळात विलग झालेल्या दोन मित्रांची भेट ‘गूगल’मुळे कशी साध्य होते हे दाखवले आहे. तर ‘रेड लेबल’ या चहा कंपनीनेही एका चहाच्या कपावरून हिंदू-मुस्लीम सूर सहजतेने जुळवून आणले. ‘एडलेवीस’ या म्युच्युअल फंड कंपनीनेही दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीत फटाके उडवताना घ्यावयाची सुरक्षा आणि अग्निशमन दलाचे काम यावर प्रकाश टाकणारी जाहिरात केली होती.