फक्त तीन महिन्यांत मनोरंजनविश्वाची समीकरणं किती बदलतील? कोणीही कल्पना केली नसेल इतक्या वेगाने चित्रपट, स्टार कलाकार आणि तिकीटबारीवर ठरणारे त्यांचे भविष्य, यांची समीकरणंच बदलून गेली आहेत. करोनापूर्व काळात या वर्षी कोणत्या मोठय़ा कलाकाराचे चित्रपट कोणत्या मुहूर्तावर चित्रपटगृहात झळकणार? आणि कोण २००, ३०० की त्याहून अधिक कोटींचा मालक बनणार? अशा सगळ्या रोजच्याच गोष्टींची चवीने चर्चा सुरू असताना करोनाने घाला घातला. तीन महिने चित्रीकरण बंद, चित्रपटगृह बंद म्हणून थांबलं तर ते मनोरंजन कसलं? या नव्वद दिवसांच्या कालावधीत ‘फ्रायडे फर्स्ट’ ही संकल्पना इतिहासजमा होते की काय असं भय वाटावं इतक्या मोठय़ा संख्येने हिंदी चित्रपट ओटीटी या तिसऱ्या माध्यमावर प्रदर्शित होत आहेत. चित्रपटगृहं कधी उघडतील याची वाट बघत बसण्यापेक्षा घरच्या घरीच लोकांना ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा आनंद अनुभवायला मिळावा, असा चंगच बॉलीवूड मंडळींना बांधला आहे. त्यामुळे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत किमान २० ते २५ हिंदी चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी माध्यमांवर पाहायला मिळणार आहेत.

एप्रिल-मे-जून हे सुट्टी आणि शाळा-महाविद्यालयांचा नुकताच सुरुवात होण्याचा काळ हा हिंदी, मराठी-हॉलीवूड चित्रपटांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने पर्वणीचा काळ मानला जातो. याच काळात मोठय़ा बॅनरचे चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेसाठी वर्षभर आधीच नियोजन करून तयार असतात, तर छोटे-मध्यम खेळाडू हे यातल्या कोणत्या तारखांना कमीत कमी स्पर्धा मिळेल, त्या मुहूर्तावर धडकण्यासाठी झगडत असतात. मात्र मोठय़ा आणि छोटय़ा चित्रपटांचा हा झगडाच करोनाने एका अर्थाने संपवला आहे. नव्या बदलांची नांदी लक्षात घेतली तर नव्या माध्यमावर नव्याने हा झगडा सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. टाळेबंदी जुलैपर्यंत पुढे गेली आहे हे लक्षात आल्यावर चित्रपटगृहप्रवेश दीर्घकाळ लांबणार हे लक्षात आलेल्या बॉलीवूडजनांनी आपल्या आर्थिक गणितांची नव्याने जुळवाजुळव करायला सुरुवात केली. प्रदर्शनाच्या तयारीत असलेल्या आणि चित्रपटगृहे बंद झाल्याने अडकू न पडलेल्या निर्मात्यांना ओटीटी या नव्या माध्यमाचा पर्याय खुणवू लागला. चित्रपटाचे प्रदर्शन आणखी दीर्घकाळ लांबले तर गुंतवलेला पैसा बुडीत खात्यात जमा होणार, त्याचा फटका पुढच्या नियोजित चित्रपटांनाही बसणार हे लक्षात आलेल्या निर्मात्यांनी आधी चित्रपटगृहे आणि मग ओटीटी हा एरव्हीचा प्रदर्शनाचा नियम मोडून थेट ओटीटीकडे धाव घेतली. मे महिन्यात अ‍ॅमेझॉन प्राइमवर ‘गुलाबो सिताबो’ आणि ‘शकुंतला देवी’ अशा दोन-तीन मोठय़ा कलाकारांची नावं असलेल्या चित्रपटांची घोषणा झाली. मात्र जून महिन्यापर्यंत काही मोजके च चित्रपट वगळता ओटीटी चित्रपट प्रदर्शनाची फारशी चर्चा नव्हती. जुलै उजाडता उजाडता ‘डिस्ने हॉटस्टार’ या वाहिनीने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेतून सात नवीन हिंदी चित्रपटांची घोषणा केली आणि सगळेच चक्र झपाटय़ाने बदलले. किमान दिवाळीत चित्रपटगृहे सुरू होतील आणि मोठे चित्रपट तिथे प्रदर्शित होतील या अंदाजाने ऑक्टोबपर्यंत वीस ते पंचवीस हिंदी चित्रपट प्रामुख्याने डिस्ने हॉटस्टार, नेटफ्लिक्स, झी ५ आणि अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी वाहिन्यांवरून प्रदर्शित होणार आहेत.

‘डिस्ने हॉटस्टार’ वाहिनीवर सुशांतसिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट २४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबपर्यंत टप्प्याटप्प्याने अक्षय कु मारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, अलिया भट्टचा ‘सडक २’, अजय देवगण-सोनाक्षी सिन्हा जोडीचा ‘भुज – द प्राइड ऑफ इंडिया’, अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’, विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज’ आणि कु णाल खेमूचा ‘लूटके स’ असे सात चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती ‘द वॉल्ट डिस्ने इंडिया’चे अध्यक्ष उदय शंकर यांनी दिली आहे. करोना आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून ओटीटी वाहिन्या या एक संधी म्हणून चित्रपटकर्मीसमोर आल्या आहेत. ओटीटीच्या माध्यमातून आभासी चित्रपटगृहच लोकांना घरातल्या घरात अनुभवायला मिळालं तर त्यांना चित्रपटगृहे सुरू होण्याची वाट पाहायला नको. घरच्या घरी नवे चित्रपट या उद्देशानेच आम्ही काम करत आहोत, इंडस्ट्रीसाठीसुद्धा ही सुवर्णसंधी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार यांनी सुरू केलेल्या या नव्या स्पर्धेला खरं तगडं उत्तर सध्या नेटफ्लिक्सने दिलं आहे. नेटफ्लिक्सने तब्बल १२ हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. अभिषेक बच्चन-राजकु मार राव-आदित्य रॉय कपूर अशी मोठी कलाकारांची फौज असलेला ‘ल्यूडो’, संजय दत्तचा ‘तूरबाज’, राधिका आपटे-नवाझुद्दीन सिद्दकी जोडीचा ‘रात अकेली है’, कोंकणा सेनशर्मा आणि भूमी पेडणेकरचा ‘डॉली किट्टी और वो’, ‘बॉम्बे रोज’ हा अ‍ॅनिमेशनपट, ‘त्रिभंगा – टेडी मेडी क्रे झी’, ‘क्लास ऑफ ८३’, अनिल कपूर-अनुराग कश्यपचा ‘एक वर्सेस एके ’ असे लहानमोठे चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत.

ओटीटी वाहिन्यांमधील या स्पर्धेचा थेट फायदा सध्या प्रेक्षकांना होणार असल्याचे ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी स्पष्ट के ले. जिओ आल्यानंतर देशभरातील लोकांना कमीत कमी कि मतीत मिळालेले इंटरनेट आणि वर्षभराची ठरावीक रक्कम मोजून सगळ्या घरच्यांना मिळणारा नवीन चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांच्या वाटय़ाला आला आहे. शिवाय, ‘गुलाबो सिताबो’सारखा चित्रपट जो अमिताभ बच्चन-आयुषमान खुराणासारखे कलाकार असूनही फार चालला नाही, अशा चित्रपटांचे तिकीटबारीवरील यशापयश लक्षात घेतले तर चित्रपटगृह प्रदर्शनाचा खर्च वजा होऊन ओटीटीकडून विक्रीपोटी मिळणारी रक्कम निर्मात्यांच्या फायद्याची आहे. त्यामुळे या तीन-चार महिन्यांच्या काळात असे सगळेच लहानमोठे चित्रपट ओटीटीकडे वळले यात नवल नाही. ओटीटी वाहिन्यांनाही याच संधीचा फायदा घेत नवीन, मोठे  काही प्रेक्षकांसमोर ठेवत सदस्यसंख्या वाढवण्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याने अधिकची पदरमोड करून ओटीटी वाहिन्या चांगल्या चित्रपटांचे हक्क विकत घेत असल्याचे अतुल मोहन यांनी सांगितले, तर ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते ओटीटी चित्रपट प्रदर्शनाचा हा टप्पा महत्त्वाचा असला तरी तो काही काळापुरताच सीमित राहील. सध्या हिंदीसह प्रादेशिक चित्रपटसृष्टीचेही मोठे नुकसान झाले असल्याने ओटीटीचा पर्याय निर्मात्यांनी निवडला असला तरी रुपेरी पडद्याची जादू ओसरणार नाही. कारणं काहीही असली तरी चित्रपट आणि ओटीटी प्रदर्शनाचे हे समीकरण सध्या प्रेक्षक, चित्रपट निर्माते आणि ओटीटी वाहिन्या तिघांसाठीही फायदेशीरच ठरते आहे.

ओटीटीची वाढीव प्रेक्षकसंख्या

तीन महिने घरातच बसलेल्या प्रेक्षकांमुळे ओटीटी वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नेटफ्लिक्सने जगभरात १०.१ कोटी प्रेक्षक जोडले असल्याचे स्पष्ट केले. करोनामुळे  अमेरिकेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. दक्षिण अमेरिका आणि भारतातील करोनाचे वाढते प्रमाण पाहता आम्हाला नव्याने कामाच्या पद्धतीत बदल करावे लागतील, असे नेटफ्लिक्सने स्पष्ट केले. या कालावधीत ‘झी ५’च्या प्रेक्षकसंख्येत ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर एकता कपूरचे ‘अल्ट बालाजी’ अ‍ॅप रोज १७  हजार प्रेक्षक पाहतात.