30 September 2020

News Flash

पुस्तकपाळ  आणि जगाचा अंत

झॉम्बी या मानवी संवेदना हरविलेल्या राक्षसाची निर्मितीही विज्ञान लेखकांच्या कल्पनेतूनच साकारली आणि झॉम्बीपटांमध्ये अगणित प्रयोग झाले.

(संग्रहित छायाचित्र)

पंकज भोसले

प्रचंड मोठय़ा अरिष्टानंतर पृथ्वीवर शिल्लक राहिलेला शेवटचा मानव अथवा मानव-समुहांच्या जगण्यावर आधारलेले कथानक ब्रिटिश-अमेरिकी विज्ञान लेखकांनी आवडीने रचले. परग्रहवासीयांकडून पृथ्वीचा नायनाट होण्यापासून ते वायुगळती, आजार आदी माध्यमातून मानवाचा आत्मसंहार दाखविणाऱ्या या गोष्टी चित्रपटांनी आणखी परिणामकारकरीत्या पडद्यावर साकारल्या.

एच.जी वेल्स यांच्या ‘वॉर ऑफ द वर्ल्ड्स’पासून ते रिचर्ड मथीसन यांच्या ‘आय अ‍ॅम लेजंड’ या कादंबऱ्यांनी कितीएक चित्रपटांना प्रेरणा दिली याची गणतीच करता येऊ शकत नाही. झॉम्बी या मानवी संवेदना हरविलेल्या राक्षसाची निर्मितीही विज्ञान लेखकांच्या कल्पनेतूनच साकारली आणि झॉम्बीपटांमध्ये अगणित प्रयोग झाले. जगण्याचे तत्वज्ञान आणि तिरकस विनोदाचा वापर करून तयार झालेला ‘शॉन ऑफ द डेड’, ‘झॉम्बीलॅण्ड’  किंवा ‘ट्वेंण्टीएट डेज लेटर’, ‘आय एम लेजंड’सारखे निव्वळ थरारपट या साहित्यावर पोसलेले उत्तम चित्रपट आहेत. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये या प्रकारच्या सिनेमांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. पर्यावरणाची दैनंदिन हानी, एकूणातच औद्योगिक घटकाच्या विस्ताराने प्रदूषणाचा वाढता स्तर आणि रासायनिक अस्त्रांनी सज्ज झालेल्या देशांच्या शक्तिप्रदर्शनामुळे भविष्यात कधीतरी आत्मसंहाराच्या वाटेवर जावे लागणार असल्याची सूचना या कल्पांतिकांमधून चित्रकर्ते देत आहेत. दिग्दर्शक रिड मोरेनो यांनी गेल्या वर्षी गाजविलेला ‘आय थिंक वी आर अलोन नाऊ’ हा या चित्रपंथातील आवर्जून अनुभवावा असा नमुना आहे. त्यात पूर्वसूरींनी आखून ठेवलेल्या झॉम्बी अथवा प्राणघातक अडचणींच्या संकल्पना राबविल्या गेल्या नाहीत. ही पृथ्वीवर उरलेल्या लोकांची धाडस किंवा साहसकथा नाही. त्यापलिकडे मानवी मनतळाचा शोध घेण्याचा तिचा छोटासा प्रयत्न दिसतो.

‘आय थिंक वी आर अलोन नाऊ’ चा नायक आहे अमेरिकेतील एका खेडय़ात आश्चर्यकारकरीत्या मानवी विनाशातून बचावलेला डेल (पीटर डिंक्लेज)हा एक पुस्तकपाळ. अज्ञात आजाराने सारे गाव क्षणार्धात आहे त्या स्थितीत मृत्युमुखी पडले असतानाही गावात असलेल्या ग्रंथालयामध्ये काम करणारा बुटकुळा डेल वाचला कसा, याचे त्याच्याकडेही स्पष्टीकरण नसते. आफाट एकटेपणा अंगावर कोसळलेला डेल जगण्यासाठी स्वत:ला एक काम लावून देतो. वार लावून प्रत्येक घरातील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे आणि ग्रंथालयातील पुस्तकांचे जतन करायचे त्याचे काम निर्विघ्नपणे सुरू असते. यात ग्रंथालयातून पुस्तके घेऊन गेलेल्या घरांतील मृतदेहांची वासलात लावताना तो तेथील पुस्तकांच्या प्रती पुन्हा ग्रंथालयात आणून जागच्या जागी लावत असतो. ग्रंथालयातील पुस्तकांच्या सानिध्यातच त्याचे एकांतरुपी आयुष्य सुरळित चाललेले असते. मात्र एके दिवशी गावात नुकत्याच अपघातग्रस्त झालेल्या गाडीसमोर तो उभा राहतो. ग्रेस (एल फॅनिंग) ही तरुणी त्याला त्यात जखमी अवस्थेत सापडते. कुणीतरी जिवंत आहे, याचे आनंद वा दु:ख नसलेला डेल तिला मदत करतो. अट्टल एकटेपणाची सवय झालेल्या डेलकडून बेतास बात पाहुणचार झोडल्यावर ग्रेस त्याला तिथेच राहू देण्याची विनंती करते. नाखुषीने तिला आपल्यासोबत राहू देण्यास कबुल करून डेल दैनंदिन कामात कोणताही खंड पडू देत नाही. गावातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार आणि पुस्तकांच्या पालनाचा दिनक्रम आता ग्रेसच्या सोबतीने सुरू राहतो. सतत प्रश्नोत्सुक आणि आनंदी असलेल्या ग्रेसच्या सहवासाने डेलची एकटेपणाची कवचकुंडले शिथिल होत असतानाच पॅट्रिक (पॉल जियामाटी) आणि व्हायलेट (शार्लेट गिन्सबर्ग) हे मध्यमवयीन जोडपे गावात दाखल होते. ग्रेसचे माता-पिता असल्याचा दावा हे जोडपे डेलकडे करते. वर एक आख्खे शहरच बचावले असून तेथे डेललाही येण्यास सुचविते. या शहरात लोकांनी आपल्या कटू स्मृती नष्ट करून आनंदी जगण्याचा मार्ग निवडल्याचे आमिषही डेलला दाखविले जाते. डेल या जोडप्याचा प्रस्ताव उडवून लावतो. तुसडेपणाने त्या तिघांना गावातून हुसकावून लावतो. पण ग्रेसशी संवाद आणि संपर्काचा परिणाम पुन्हा एकटेपणा आल्यानंतर डेलवर मोठय़ा प्रमाणावर होतो. तिला पुन्हा खेडय़ात आणण्यासाठी तो माणसे जिवंत असलेल्या शहराकडे निघण्यास सज्ज होतो.

अगदी छोटय़ाशा गोष्टीला आफाट अशा दृश्यमालिकांमधून सादर करीत दिग्दर्शकाने उत्तम परिणाम साधला आहे. डेलचा दैनंदिन व्यवहार वेगवेगळ्या मितींमधून चित्रित करीत अस्सल मुर्दाड शहराला कॅमेराने जिवंत केले आहे. पीटर डिंक्लेज आणि एल फॅनिंग यांच्यातील अशक्य पातळीवर घडणारे सौहार्द चित्रपटाला प्रेमकथासदृश मुलामा देतो.

पुस्तक वाचणारा आणि त्यांची अत्यंत काटेकोर देखभाल करणारा डेलचे गावातील सारे मृत पावले असताना जिवंत राहणे, हे वापरलेले रुपक आज जगातील ग्रंथालये आणि वाचनक्रिया मृत पावत असताना आत्यंतिक महत्त्वाचे आहे. जगाच्या अंतानंतर उरलेल्या लोकांमध्ये मानवी समाजाला उपकृत ठरू शकणाऱ्या ग्रंथाला हस्तगत करण्याचे कथानक असलेला ‘बुक ऑफ इलाय’ आणि ‘आय थिंक वी आर अलोन नाऊ’ हे येत्या आठवडय़ात असलेल्या जागतिक ग्रंथदिनानिमित्ताने आस्वाद घ्यावेत असे चित्रपट आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 12:32 am

Web Title: article on hollywood movies on book
Next Stories
1 चित्र चाहूल : हे प्रेम प्रेक्षकांचे..!
2 हा अभिनेता करणार ‘बिग बॉस मराठी २’चे सूत्रसंचालन
3 टँकरचं पाणी कुठे मुरतंय? ‘एक होतं पाणी’चा ट्रेलर पाहिलात का?
Just Now!
X