रवींद्र पाथरे

गेल्या काही वर्षांत एखाद्या मराठी नाटकाचे हजार प्रयोग झाल्याचं तुम्ही ऐकलंयत का? गेलाबाजार पाचशे तरी? नाही ना? कसं ऐकणार? झालेलेच नाहीत इतके प्रयोग- तर ऐकणार कुठून? परंतु एके काळी बहुतेक निर्मात्यांना सहस्र प्रयोगसंख्येच्या किमान एखाद्या तरी नाटकाची लॉटरी लागल्याचं पाहायला मिळत असे. यापैकी काही नाटकांचे तर दोन-तीन-पाच हजार प्रयोगही झाल्याची उदाहरणं आहेत. ‘तो मी नव्हेच’, ‘वस्त्रहरण’, ‘ऑल द बेस्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘वात्रट मेले’, ‘मोरूची मावशी’, ‘सही रे सही’, ‘चारचौघी’, ‘पुरुष’, ‘यदा कदाचित’, ‘हसवाफसवी’ अशा किती तरी नाटकांची नावं घेता येतील. यांच्यापैकी ‘ऑल द बेस्ट’ने तर एवढा धुमाकूळ घातला, की शब्दश: या नाटकाच्या दोन-तीन टीम्स करूनही प्रयोगांची मागणी पुरी करता करता निर्मात्यांच्या नाकीनऊ आले होते. तीच गोष्ट ‘यदा कदाचित’चीही. या नाटकाचे झंझावाती दौरे आणि प्रयोगांचा वेगाने फुगत गेलेला आकडा भल्याभल्यांना अचंबित करणारा ठरला होता. पुढे ‘सही रे सही’नेही हा विक्रम केला. या नाटकावर निर्मात्यांनी पैसे कमावलेच; पण त्याचे प्रयोग लावून अन्य अनेकांनीही भरपूर पैसे कमावल्याचं सांगितलं जातं. तर ते असो. परंतु हजार प्रयोगांचं हे भाग्य अलीकडच्या काळात मराठी रंगभूमीवरील नाटकांच्या वाटय़ाला येणं दुरापास्त झालंय.

त्याची कारणं अनेक आहेत. त्यातलं प्रेक्षकांची कमी झालेली संख्या हे एक प्रमुख कारण. मराठी माणूस हा नाटकवेडा आहे असं म्हटलं जातं.. ते अभिमानाने मिरवलंही जातं. शिवसेनेचे युती सरकारमधील सांस्कृतिकमंत्री प्रमोद नवलकर रंगभूमीशी संबंधित कुठल्याही कार्यक्रमाला असले की एक विधान हमखास करायचेच.. ‘केरळात नारळ नसतील इतके महाराष्ट्रात कलावंत व रसिक आहेत.’ यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तर तेव्हा थोडंफार ते खरंही होतं. पण आज ते वास्तव राहिलेलं नाही. आज महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटींवर गेली आहे, गावोगावी नाटय़गृहं झाली आहेत. परंतु त्या प्रमाणात मराठी नाटय़रसिकांचा टक्का वाढल्याचं मात्र दिसून येत नाही. उलट, नाटकांची प्रयोगसंख्या दिवसेंदिवस घटते आहे. आज चांगल्या चालणाऱ्या नाटकांचे शंभर-दोनशे प्रयोग होणं म्हणजे खूप झालं असं नाटकवाले मानतात. तीनशे प्रयोग म्हणजे डोक्यावरून पाणी. एके काळी नाटकांचे रोज तीन-तीन होणारे प्रयोग आता अधिककरून शनिवार-रविवारवर आले आहेत. आर्थिक यशाचा विचार करता ‘वीकएण्ड थिएटर हेच खरं!’ या निष्कर्षांप्रत आज मराठी नाटय़निर्माते येऊन ठेपले आहेत. असं का व्हावं? कुठे गेला नाटकवेडा मराठी माणूस? की त्याचं नाटकवेड संपलंय? की ते मुळात नव्हतंच कधी?

ते कधी नव्हतंच असं नाही म्हणता येणार. कारण सत्तर-ऐंशीच्या दशकापर्यंत.. अगदी नव्वदच्या दशकाच्या प्रथमार्धातही नाटकं चांगली चालत होती. त्याचा अर्थ लोकांचं नाटकांवर प्रेम होतं. नाटक पाहणं हा मराठी माणसाच्या सांस्कृतिक भुकेचा एक भाग होता. तो आनंद सोहळाच असे त्यांच्यासाठी. परंतु गिरणी संपोत्तर रसिकांचा मराठी रंगभूमीला असलेला आश्रय हळूहळू कमी कमी होत गेला. त्याच वेळी अनेक खासगी दूरचित्रवाहिन्यांनी मनोरंजन क्षेत्राचं नभांगण व्यापून टाकायला सुरुवात केली. त्यातून घरबसल्या मनोरंजनाची आयतीच (फुकट नाही म्हणता येणार!) सोय उपलब्ध झाली. नव्वदच्या दशकातच आर्थिक उदारीकरणाने मराठी माणसाचं विश्व हळूहळू व्यापू लागलं. परिणामी त्याची सांस्कृतिक भूकही व्यापक झाली. सांस्कृतिक भूक भागवणारी जगभरातील नानाविध प्रलोभनं त्याला खुणावू लागली. त्याची क्षितिजं विस्तारत गेली. कलाजाणिवा अधिक समृद्ध होऊ लागल्या. मराठी रंगभूमीच्या मर्यादांची त्याला हळूहळू जाणीव होऊ लागली. अर्थात आशयदृष्टय़ा मराठी नाटकं कधीच कमी नव्हती याची जाणीव त्याला होती. म्हणूनच नव्वदच्या दशकातील नव्या जाणिवांच्या नाटकांना त्याने उत्तम प्रतिसाद दिला. मात्र, ‘इम्प्रोव्हायझ्ड’ तंत्राच्या नाटकांचा सुकाळू झाल्यावर खरा मराठी नाटय़रसिक बिथरला. हे एकीकडे घडत असतानाच त्याचा बदललेला आर्थिक स्तर त्याला नवश्रीमंत जीवनशैलीकडे आकृष्ट करू लागला. त्यासाठी सतत अधिकाधिक पैसा कमावणं आणि तो कमावण्यासाठी भरपूर परिश्रम करणं ओघानं आलंच. त्यामुळे नाटकं बघण्यासाठी जे एक निवांतपण लागतं, तेच हरवलं. पर्यायानं त्याची नाटकाची असोशी उणावली. म्हणजे तो नाटकापासून पूर्णपणे दुरावला असं जरी झालं नाही, तरी त्याचे प्राधान्यक्रम आता बदलले होते. नवी पिढी नाटकांच्या संस्कारांविना वाढल्याने ती आपल्या या समृद्ध वारशापासून मुळातच दुरावली. याचं कारण तिच्यावर नाटक बघण्याचे संस्कारच केले गेले नाहीत. पूर्वी बालनाटय़ं बघण्यासाठी पालक आवर्जून मुलांना घेऊन जात. त्यावेळच्या नाटय़शिबिरांतून मुलं नाटय़प्रशिक्षणाबरोबरच उद्याचे सुजाण प्रेक्षक म्हणून घडण्याची प्रक्रियाही आपसूकच होत होती. (आजही मुलांना नाटय़शिबिरांना घातलं जातं, पण त्यामागील हेतू पूर्णपणे वेगळे असतात.) परंतु बालनाटय़ चळवळ थंडावताच ती प्रक्रियाही थांबली. भविष्यातला नवा प्रेक्षक घडणं बंद झालं. आज महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धातून मुलं हिरिरीनं भाग घेतात, पण ते मालिका-चित्रपटांतून जाण्याची पहिली पायरी म्हणूनच! त्यांच्यातून नाटकाचे प्रेक्षक घडतात का, हा प्रश्नच आहे. अगदी रीतसर नाटय़प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांचं स्वप्नही सिनेमा-मालिकांत जाण्याचंच असतं, तिथं प्रेक्षकांचं काय घेऊन बसलात! त्यापैकी फारच थोडे मालिका-सिनेमा करून नाटकही करतात. जिथे नाटय़प्रशिक्षित तरुणाईच्याच प्राधान्यक्रमावर नाटक नाही, तिथे ते बघणाऱ्यांच्या तरी कसं काय असू शकेल? अर्थात याला अनेक बाजू, अनेक कंगोरेही आहेत. नाटकावर पोट भरता येत नाही, हे एक; आणि दुसरं म्हणजे आताची पिढी उदरनिर्वाहासाठी केवळ मनोरंजन क्षेत्रावरच (पूर्वीचे नाटकवाले पोटापाण्यासाठी इतर नोकरीधंदा करत आणि ‘पॅशन’ म्हणून नाटक करत.) अवलंबून असल्याने तिला काही वेळा मनात असूनदेखील नाटक करणं शक्य होत नाही. त्यात आणखी वाहिन्यांवर ‘डेली सोप्स’चं प्रस्थ असल्याने त्या चक्रात एकदा का कलावंत घुसला की त्याचं नाटक संपलंच म्हणून समजा. मालिका, सिनेमा आणि कार्यक्रमांच्या सुपाऱ्या या भूलभुलय्यात तो एकदा का अडकला, की नाटकासाठी वेळ मिळणंच अशक्य होतं. त्यातूनही वेळात वेळ काढून एखाद्याने नाटक करायचं ठरवलं तरी नाटकांचे दौरे करणं मात्र त्याला अवघड जातं. परिणामी बाहेरगावी नाटकांचे प्रयोग होणं हल्ली कमी झालंय. त्यामुळे बाहेरगावी नाटकंच होत नाहीत, तर मग तिथं प्रेक्षक तरी कसा घडणार? मुंबई-पुणे-नाशिक अशा काही शहरांचा अपवाद वगळता उर्वरित महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना नाटक पाहायला मिळणंच दुर्मीळ झालंय. बरं, जिथं नाटकं होतात तिथं प्रेक्षकांना अन्य माध्यमांतूनही इतकं काही पाहायला, आस्वादायला मिळत असतं की त्यांना नाटकाचं पूर्वीइतकं अप्रूप उरलेलं नाही.

महाराष्ट्रात राज्य नाटय़ स्पर्धेसह अनेक स्तरांवर हौशी नाटय़ स्पर्धा होत असल्या तरी तोही आता फक्त हौसेचाच मामला उरलाय. पूर्वीसारखी ईष्र्येनं, आपल्याला नाटकात काही तरी करून दाखवायचंय, ही असोशी आता संपली आहे. (याला काही अपवाद असतीलही. परंतु ते अपवादच; नियम नव्हे!) सबब त्यांतूनही ना नवा कलावंत घडत, ना प्रेक्षक! कसं वाढणार महाराष्ट्राचं नाटय़वेड?

एक मार्ग आहे : शालेय अभ्यासक्रमात ‘नाटय़शिक्षण’ हा विषय अंतर्भूत करण्याचा! याचे अनेक फायदे संभवतात. एक तर नाटक या कलेचा मुलांना संस्कारक्षम वयातच परिचय होईल. या कलेची गोडी लागेल. त्यातून सर्वच जरी सर्जनशील कलावंत म्हणून घडले नाहीत, तरी उद्याचे सुजाण प्रेक्षक तरी त्यांच्यातून नक्कीच घडू शकतात. अगदी काहीच नाही तरी ‘नाटक’ हा विषय मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नक्कीच साहाय्यभूत ठरू शकतो. मुलांना क्रमिक अभ्यासक्रमाबाहेरचं जगणं नाटकातून आकळत जाईल. त्यांच्यात समाजात आत्मविश्वासाने वावरण्याचा स्मार्टनेस येऊ शकेल. (जो निव्वळ पुस्तकी शिक्षणातून कधीच येत नाही.) नाटक या माध्यमात व्यक्तीचा सर्वागीण विकास करण्याची अंगभूत ताकद आहे. कांचन सोनटक्के यांनी ‘नाटय़शाला’च्या माध्यमातून गेल्या ३५ वर्षांत हे सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. अंध, अपंग, मूकबधिर, अस्थिव्यंगपीडित, मतिमंद, गतिमंद अशा सगळ्या तऱ्हेच्या विशेष मुलांना नाटकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्यातील कमतरतांवर मात करण्याची जिद्द निर्माण केली आहे. या मुलांचे नाटय़ाविष्कार पाहताना नाटक ही एक उत्तम ‘थेरपी’ आहे याचीही पुरेपूर साक्ष पटते.

महाराष्ट्राचं नाटय़वेड जपण्यासाठी, ते वृद्धिंगत करण्यासाठी हे आपण नक्कीच करू शकतो. नाही का?