News Flash

पाहा नेटके : ‘फिशिंग’चे गाव..

नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘जमतारा : सबका नंबर आयेगा’ ही वेबसीरिज केवळ तिच्या नावातूनही प्रेक्षकांची उत्कंठा चाळवते

(संग्रहित छायाचित्र)

असिफ  बागवान

‘डेबिट कार्ड एक्स्पायर झालंय’, बँक खात्यावर भरपूर रिवॉर्ड पॉइंट जमा झालेत, ‘लॉयल कस्टमर म्हणून तुम्हाला गिफ्ट देतोय’ यापैकी काही तरी सांगणारा फोन आपल्यापैकी प्रत्येकाला कधी न कधी आलेला असेलच. हे फोन म्हणजे, फसवणूक करण्याचा प्रकार हे आता जगजाहीर झालं आहे. तरीही काही जण भीतीने, आमिषाने किंवा अजाणतेपणी या चक्रव्यूहात अडकतात आणि बँक खात्यातील भलीमोठी रक्कम गमावून बसतात. तंत्रज्ञानाच्या भाषेत याला ‘फिशिंग’ म्हणजेच ‘गळाला लावणं’ असं म्हटलं जातं. अशा ‘फिशिंग’ची राजधानी समजला जाणारा एक जिल्हा जमतारा. झारखंडची राजधानी रांचीपासून अडीचशे किमी अंतरावर असलेला सुमारे लाखभर लोकवस्तीचा हा जिल्हा कुप्रसिद्ध आहे तो ‘फिशिंग’च्या कारणांसाठीच. २०१५ ते २०१७ या दोन वर्षांच्या काळात देशातल्या बारा राज्यांतील पोलिसांनी जमताराच्या तब्बल २३ वाऱ्या केल्या. कारण देशाच्या कानाकोपऱ्यात फोनद्वारे होणाऱ्या ‘फिशिंग’च्या घटनांपैकी फसवणुकीचे जवळपास ७० टक्के फोन या जिल्ह्य़ातून आलेले असतात. अवघ्या १९ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या आणि आजही बहुतांश भाग अविकसित राहिलेल्या जमताराचं हे ‘कर्तृत्व’ नजरेत भरण्यासारखंच. त्यामुळेच नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘जमतारा : सबका नंबर आयेगा’ ही वेबसीरिज केवळ तिच्या नावातूनही प्रेक्षकांची उत्कंठा चाळवते.

सौमेंद्र पाधी दिग्दर्शित आणि त्रिशांत श्रीवास्तव-निशंक शर्मा यांनी लिहिलेली ही वेबसीरिज जमतारातील २०१५ ते २०१७ या काळात घडलेल्या सत्यघटनांवर आधारित आहे. बोगस फोनकॉल करून देशाच्या कोणत्याही भागातील नागरिकाच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारणाऱ्या टवाळ मुलांच्या टोळीची ही कहाणी. शिक्षण अध्र्यावरच सोडून दिलेल्या या मुलांना स्मार्टफोनने झटपट कमाईचा एक नवा रोजगारच दिला आहे. हातात येणाऱ्या मोबाइल नंबरांच्या यादीतून कोणालाही फोन करायचा, आपण अमुक बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून त्याच्याशी संवाद साधायचा, काही तरी बहाण्याने त्याच्या बँक खात्याचे किंवा डेबिट-क्रेडिट कार्डचे तपशील मिळवायचे आणि मग काही क्षणांत त्याच्या बँकेतील रक्कम लंपास करायची ही या टोळीची कार्यपद्धत. या टोळीतली बहुतांश मुलं अठरा वर्षही न पूर्ण झालेली. बँकेत खातं काढण्याची परवानगीही नसलेली. त्यामुळे हडपलेले पैसे गावातल्याच कुणाच्या तरी खात्यावर परस्पर वळते करायचे आणि नंतर मग त्या व्यक्तीला आपला मामा, काका बनवून बँकेत जाऊन ते काढायचे, हा त्यांचा दिनक्रम. मग काढलेल्या पैशांतून कुणी बुलेट घेतो तर कुणी चारचाकी, कुणी आपल्या झोपडीवजा घराच्या शेजारीच आलिशान बंगला बांधतो तर कुणी दारू किंवा वेश्येवर पैसा उडवतो. आपण कुणाचे किती पैसे लुबाडले, हा त्यांच्यासाठी जणू नोकरीचाच एक भाग. त्याबद्दल पश्चात्ताप नाही की पकडले जाण्याची भीती नाही किंवा एवढय़ा पैशांचं काय करायचं, याचं नियोजनही नाही. त्यातलं कुणी तो पैसा घरात दडवून ठेवतो तर कुणी अंगणात पुरून ठेवतो. पण तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने पैसे उकळण्याचा धंदा सुरूच. सन्नी मोंडल(स्पर्श श्रीवास्तव) आणि रॉकी (अंशुमन पुष्कर) या भावांची जोडी या टोळीचे मास्टरमाइंड. खरंतर सन्नीच्या डोक्यानेच टोळी चालते, तो त्यांचा अघोषित नेता आहे. हीच बाब रॉकीला खटकते. रॉकीला राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत आणि त्या भागाचा आमदार ब्रजेश भान (अमित सियाल) याच्या सान्निध्यात नगरसेवक बनण्याचं त्याचं स्वप्न आहे. म्हणूनच आपण ब्रजेशसाठी फिशिंगची कामं करावीत, असं त्याचं म्हणणं. सन्नीचा मात्र याला पूर्ण विरोध आहे. या दोघांच्या संघर्षांतूनच ‘जमतारा’ची कहाणी उलगडत जाते.

दोन भावांतील संघर्ष हा या कहाणीचा गाभा. पण त्याला अनेक पदरही आहेत. सन्नीच्या कोचिंग क्लासमध्ये शिकवणारी गुडिया, त्या भागचा पोलीस अधिकारी बिश्वा पाठक, तेथे नव्याने पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेली डॉली साहू ही या कहाणीतलं अन्य महत्त्वाची पात्रं. त्यांच्या प्रत्येकाची छोटी गोष्ट आहे. मात्र, एकत्रितपणे ‘फिशिंग’च्या केंद्रकाभोवती ही सर्व पात्रं फिरत राहतात. त्यातून एक थरारक आणि उत्कंठावर्धक घटनापट आपल्यासमोर येतो.

२५ ते ४० मिनिटांच्या दहा भागांत विभागली गेलेली ‘जमतारा’ ही वेबसीरिज तिच्या विषयामुळे सर्वाधिक लक्षवेधी ठरते. गेल्या पाचेक वर्षांत भारतात मोठी डिजिटल क्रांती घडली आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे सर्वच क्षेत्रांतील व्यवहार सुलभ झाले आहेत. मात्र, बँकिंग व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले आहेत. नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग, डिजिटल पेमेंट, मोबाइल वॉलेट या साऱ्यांमुळे आपल्या बँकेशी असलेला ग्राहकाचा थेट संवाद जवळपास खुंटला आहे. फोन हेच त्या संवादाचं उरलेलं माध्यम. त्यामुळे बँकेतून आलेला प्रत्येक फोन आपल्या उपयोगाचाच, ही धारणा अनेकांच्या मनांत घट्ट झाली आहे. याचाच गैरफायदा घेऊन गेल्या तीन-चार वर्षांपासून भारतात फोनवरून आर्थिक गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकाला त्याच्या बँकेशी संबंधित व्यवहारांबाबत भीती घालून किंवा आमिष दाखवून त्याचे आर्थिक तपशील मिळवणं हे सायबर भामटय़ांच्या डाव्या हातचा मळ. ही सायबर भामटी उच्चशिक्षित, बुद्धिमान आणि तंत्रज्ञानाने अवगत असतील, असा फसवणूक झालेल्याचा सर्वसाधारण समज असतो. ‘जमतारा’ तो समजच मोडून काढते. हातात मोबाइल आणि गाठीशी असंख्य सिमकार्ड असलेला एखादा दहावी नापास पोरगाही तुम्हाला ठकवू शकतो, हे जमताराच्या सुरुवातीलाच लक्षात येतं. पण जमतारा त्या फिशिंगमागची कहाणी सांगत नाही. खरंतर ती आणखी उत्कंठावर्धक गोष्ट असली पाहिजे. झारखंडसारख्या राज्याच्या एका अविकसित जिल्ह्य़ात फिशिंगचं हे फॅड रुजलं तरी कसं, हा प्रश्न अधिक बेचैन करणारा आहे. दुर्दैवाने या वेबसीरिजमध्ये त्याचं उत्तर मिळत नाही. मुळात ‘जमतारा’ची सुरुवात होते तीच मुळी हे फिशिंग शिखरावर पोहोचलेलं असतं तेव्हा. ही वेबसीरिज आपल्याला फिशिंग प्रकरणाची दुसरी बाजू दाखवते. फिशिंगचं हे रॅकेट म्हणजे संघटित कट नव्हे तर भुक्कड भामटेगिरी कशी आहे, हे आपल्याला ‘जमतारा’तून दिसतं. अर्थात ते पाहणंही रंजक आहे.

विषय नवा असला तरी ‘जमतारा’ची कहाणी नवी नाही. गेल्या दोनेक वर्षांत वेगवेगळय़ा नवरंजन फलाटांवर आलेल्या भाऊबंदकी, राजकारण, गुंडगिरी, हिंसाचार या धाटणीच्या पटकथा असलेल्या पटकथांप्रमाणेच ‘जमतारा’ची कहाणी उलगडत जाते. मागासलेलं गाव, त्यावर वर्चस्व असलेला राजकारणी, भ्रष्ट पोलीस अधिकारी, हे सगळं मोडून काढण्यासाठी आलेला कुणी वरिष्ठ पोलीस हे साखळीसूत्र आपल्याला गंगाजलपासून सिंघमपर्यंत अनेक चित्रपटांतही दिसलं आहे. पण तरीही ‘जमतारा’ प्रेक्षणीय ठरतो तो त्यातील अभिनय आणि दिग्दर्शकाच्या शैलीमुळे. स्पर्श श्रीवास्तव, अमित सियाल, अंशुमन पुष्कर या तिघांनीही आपल्या भूमिकेत जान ओतली आहे. तर मोनिका पनवर (गुडिया), अक्षा परदासानी (डॉली साहू) या दोघींच्याही भूमिका या पुरुषकेंद्री कहाणीतही नजरेत भरण्यासारख्या आहेत. ही कहाणी पुढे सरकत असताना त्यात सूत्रधाराची भूमिका बजावणारे मुन्ना (रोहित केपी) आणि बच्चा (हर्षित गुप्ता) हेही चमकून गेले आहेत.

वर म्हटल्याप्रमाणे,  जमतारा फिशिंगची राजधानी कसं बनलं हे सांगत नाही. पण म्हणून थराराच्या बाबतीत त्यात उणं काही नाही. वेबसीरिजचा शेवट अधांतरी ठेवून दिग्दर्शकाने दुसऱ्या सीझनचा मार्ग मोकळा ठेवला आहे. त्यामुळे त्या सिक्वेलमध्ये जमताराचा प्रीक्वेल पाहायला मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 3:15 am

Web Title: article on jamtara web series abn 97
Next Stories
1 विदेशी वारे : हवा कोणाची रं?
2 टेलीचॅट : ‘यशाची वाट सापडत गेली, अन्..’
3 ‘मनोरंजनाबरोबरच चित्रपट हे अभिव्यक्तीचे माध्यम’
Just Now!
X