विनोदी अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये बस्तान बसवणे सोपे काम नाही. ऐंशीच्या दशकापासून बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या जॉनी लिव्हरसारख्या अभिनेत्यांना आत्ता हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या योग्य भूमिका आहेत, असे वाटत नाही. त्यांच्या जागी पूर्ण नवीन कलाकारांची पिढी आली आहे. नवीन कलाकार खूप चांगले आहेत, हुशार आहेत आणि व्यावसायिक आहेत. अनुभवी कलाकार म्हणून नव्या कलाकारांबरोबर काम करताना त्याच्या सुरात सूर मिसळून काम करायला आवडते, असे जॉनी लिव्हर यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. सध्या अगदी निवडक चित्रपटांमधून काम करणाऱ्या जॉनी लिव्हर यांना ‘दिलवाले’ चित्रपटात शाहरूखबरोबर पाहण्याची संधी मिळणार आहे.
शाहरूख आणि काजोल या जोडीबरोबर मी खूपदा काम केले आहे. तरीही इतक्या वर्षांनी जेव्हा ‘दिलवाले’मध्ये त्याच्याबरोबर काम करायची वेळ आली तेव्हा काहीसे दडपण आले होते. मात्र, शाहरूखने हे दडपणच काढून टाकले. पहिल्याच चित्रपटात काम करत असल्याप्रमाणे तो प्रत्येक कलाकाराला मला सांभाळून घ्या, असे सांगत होता. त्यामुळे दडपण वाटले नाही. मीच काय.. वरुण धवन, कीर्ती सनन, वरुण शर्मासारख्या नवीन कलाकारांनीही अगदी मनमोकळेपणे काम केले आहे, असे जॉनी लिव्हर यांनी सांगितले. ‘दिलवाले’ चित्रपटात जॉनी लिव्हर यांच्यासह संजय मिश्रा, बोमन इराणी, वरुण शर्मा अशी विनोदी कलाकारांची गँग एकत्र आली आहे. हे तर रोहित शेट्टीच्या चित्रपटांचे वैशिष्टय़ आहे असे ते म्हणतात.
दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीचे कसब खूप वेगळे आहे. एका विनोदी अभिनेत्यासाठी त्याची विनोदबुद्धी आणि टायमिंग या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्याचा उपयोग करून त्या त्या कलाकाराकडून कसे काम करून घ्यायचे, हे त्याला बरोबर कळते. प्रत्येक वेळी जॉनी भाई आणखी एक टेक.. असे म्हणत जोपर्यंत त्याला अपेक्षित हावभाव, पंचसह तो टेक येत नाही तोपर्यंत तो सतत रिटेक करत राहतो. त्यामुळेच तर आमच्या भूमिका छोटय़ा असल्या तरी त्या लक्षात राहतील असे काम आमच्याकडून होते. म्हणून रोहितसारख्या दिग्दर्शकांकडेच आणि तेही चांगल्या भूमिका असतील तरच आपल्याला काम करायला आवडते, असे त्यांनी सांगितले.
‘दिलवाले’मध्ये जॉनी लिव्हर यांनी चोराची भूमिका केली आहे. हा चोर चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथेशी संबंधित आहे. एक खूप चांगली भूमिका आपल्या वाटय़ाला आल्याचे त्यांनी सांगितले. काजोल, शाहरूख यांच्यासारखे कलाकार आजही जेव्हा आपल्या कामाबद्दल, संवादफेकीच्या टायमिंगबद्दल कौतुक करतात तेव्हा कामाचे चीज झाल्यासारखे वाटते, असे म्हणणाऱ्या जॉनी लिव्हर यांनी इथून पुढे भूमिकेतून नवे काही शिकायला, करायला मिळणार असेल तरच काम करायची इच्छा असल्याचे सांगितले. ‘दिलवाले’नंतरही ‘संता बंता’ आणि साजिद नाडियादवालांचा एक असे निवडक चित्रपट करत असल्याचे त्यांनी सांगितले.