‘काळ’ हा मराठी भयपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. बऱ्याच वर्षांनी मराठीत भयपट येत असल्याने प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती संदीप खरात या तरुणाने केली आहे. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना संदीपने चित्रपट निर्मितीचे धाडस केले आहे.

लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता या तिन्ही भूमिका पार पडणारा संदीप चित्रपटाच्या वेगळेपणा विषयी सांगतो, आतापर्यंत अनेक भयपट प्रदर्शित झाले आहेत. परंतु काळ हा चित्रपट अभ्यास आणि संशोधन करून तयार करण्यात आला आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांना ‘पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी’ आणि ‘द टनेल’ या चित्रपटांची आठवण होईल. उलगडत जाणारी कथा, तंत्रज्ञानातील करामती आणि संगीत ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. तर ‘इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी’चे संस्थापक गौरव तिवारी हे या चित्रपट निर्मितीमागील प्रेरणा असल्याचेही तो सांगतो.

पुणे विद्यापीठातील वातावरण पाहून तिथे  एक भयकथा आकारास येऊ  शकते, असे कायम वाटायचे. विद्यापीठातील एलिस गार्डनबाबत एक दंतकथा रूढ आहे. एलिस नावाच्या एका ब्रिटिश महिलेचे भूत विद्यापीठाच्या या गार्डनमध्ये वावरते. भूताला डोके नाही आणि ते घोडय़ावर फिरत असते असे म्हटले जाते. असे अनुभव प्रत्यक्षात आल्याचे तो व्यक्त करतो, तर चित्रपट साकारताना कथेच्या आत्म्यावर सगळा भर दिला आहे. संहितेतील अलौकिकत्वाबाबतचा अभ्यास करताना त्यात अनेक शास्त्रीय निरीक्षणे आणि साधनांचा समावेश आढळून येईल, असे संदीप सांगतो.

चित्रपट निर्मिती करताना आर्थिक पाठबळ हे सर्वात मोठे आव्हान होते. परंतु मदतीचे अनेक हात पुढे आल्याने हा चित्रपट संघभावनेतून निर्माण झाला आहे असे संदीप सांगतो. याच स्नेहींबाबत कृतज्ञता व्यक करताना संदीप म्हणाला, चित्रपट निर्मितीबाबत आम्ही सर्व जण आग्रही होतो, परंतु पैशांची कमतरता होती. मग सर्वानी चित्रपटासाठी पैसा उभारण्याचे ठरवले. सुरुवातीला जी रक्कम जमा करत होतो ती पुरेशी नव्हती पण महाविद्यालयातील काही स्नेहींनी मदतीचा हात दिला म्हणूनच हे स्वप्न पूर्ण होऊ  शकले.

चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनच्या हेमंत रुपारेल आणि रंजित ठाकूर, नितीन वैद्य प्रॉडक्शन्सचे नितीन वैद्य, कांतीलाल प्रॉडक्शन्सचे डी संदीप आणि प्रवीण खरात व अनुज अडवाणी यांची असून सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.