22 September 2019

News Flash

मर्मबंधातील ठेव काळजात घुसली

भारतीय शास्त्रीय संगीत हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा विषय आहे.

अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाने मराठी संगीत रंगभूमीचा पाया घातला असे मानले जाते.

नाटय़संगीत म्हणजे ‘आ’, ‘उ’ प्रकार.. तोंड वेडेवाकडे करत गाणे.. आम्हाला ते नाही आवडत, अशी सर्वसामान्यांची विशेषत: तरुण पिढीची, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पहिली प्रतिक्रिया असते. पण आधी ‘बालगंधर्व’ आणि आता ‘कटय़ार काळजात घुसली’च्या निमित्ताने शास्त्रीय संगीताचा हा प्रकार खरोखरच काहीतरी वेगळा आहे, कानाला खूप छान वाटतोय, नाटय़संगीत शिकले पाहिजे इथपासून ते ‘कटय़ार’ची ही गाणी आपल्या भ्रमणध्वनीत घेण्यापर्यंत तरुण पिढीचा दृष्टिकोन बदलला आहे. हे श्रेय अर्थातच ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाचे आहे. चित्रपटाच्या निमित्ताने का होईना पण तरुण पिढी मराठी रसिकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ असलेल्या नाटय़संगीताच्या या अनमोल आणि अजरामर खजिन्याकडे वळत असेल तर ती नक्कीच स्वागतार्ह आणि आनंदाची बाब आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा विषय आहे. या संगीतानेही आपला समृद्ध वारसा जपत आजच्या काळातही आपले स्थान अबाधित राखले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, त्यातील राग, चिजा मनाला निखळ आनंद देतात. हिंदी किंवा मराठी चित्रपटांतील अनेक गाणी भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित असून ती सर्व लोकप्रियही आहेत. नाटय़संगीत हा भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित असलेला एक गायन प्रकार असून त्याला आपण उपशास्त्रीय गायन असेही म्हणू शकतो. मराठी संगीत रंगभूमीने आणि संगीत नाटकातील नाटय़पदांनी आपला एक स्वतंत्र इतिहास निर्माण केला असून हे नाटय़संगीत मराठी रसिकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’आहे.
अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाने मराठी संगीत रंगभूमीचा पाया घातला असे मानले जाते. त्यानंतर संगीत सौभद्र, शारदा, मानापमान, स्वयंवर, संशयकल्लोळ, एकच प्याला अशी संगीत नाटकांची परंपरा निर्माण झाली. १८८० ते १९३० हा काळ संगीत नाटकांचा सुवर्णकाळ होता. पुढे काही काळानंतर नाटय़पदे ही भावगीतांच्या स्वरूपात सादर होऊ लागली. मास्टर कृष्णराव, पं. जितेंद्र अभिषेकी यांनी नाटय़पदांच्या चाली बांधताना सुगम संगीताला प्राधान्य दिले आणि ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली. त्यांच्या गळ्यात उतरविली.
मराठी नाटय़संगीताचे अण्णासाहेब किर्लोस्कर ते गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ते बालगंधर्व, आचार्य अत्रे ते मो. ग. रांगणेकर आणि विद्याधर गोखले ते वसंत कानेटकर असे टप्पे अभ्यासकांनी मांडले आहेत. गायनाचार्य भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, पं. राम मराठे, छोटा गंधर्व, केशवराव भोळे आणि अन्य दिग्गज संगीतकार तसेच केशवराव भोसले, बालगंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर, बापूसाहेब पेंढारकर, ज्योत्स्ना भोळे, जयराम, जयमाला शिलेदार, प्रभाकर कारेकर, रामदास कामत आणि अन्य गायकांमुळे मराठी नाटय़संगीत समृद्ध झाले.
अभिजात शास्त्रीय संगीत गाणाऱ्या दिग्गज कलावंतांनीही आपल्या मैफलीत नाटय़संगीताचा समावेश केला. या सर्वच गायकांनी नाटय़संगीत हे लोकप्रिय केले. भारतीय संगीत परंपरेतील धमार, गझल, भावगीत, ख्याल, तराणा, ठुमरी, लावणी, साकी, दिंडी, अभंग, आर्या अशा अनेक प्रकारांचा नाटय़संगीतात वापर केला गेला आहे. नाटय़संगीतामुळे वेगवेगळ्या रागांचा प्रसार होण्यासही मोठी मदत झाली आहे.
मराठी संगीत रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे एक साक्षीदार म्हणून बालगंधर्व यांची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी सादर झालेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटातही अनेक नाटय़पदे होती. त्या चित्रपटामुळे आत्ताच्या (याचित्रपटातील पदे आनंद भाटे यांनी गायली होती. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता) बहुतांश तरुण आणि शालेय व महाविद्यालयीन पिढीला नाटय़संगीताची माहिती झाली, नाटय़संगीताबाबत उत्सुकता चाळवली गेली. ते शिकावे असे वाटू लागले आणि आता ‘कटय़ार काळजात घुसली’च्या निमित्ताने ही नवी पिढी नाटय़संगीताच्या प्रेमात पडली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘बालगंधर्व’ आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ या दोन्ही चित्रपटांत अभिनेता सुबोध भावे याचा अभिनेता व चित्रपटात दिग्दर्शक म्हणून असलेला सहभाग हा विशेष योगायोगाचा भाग.
मूळ ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकातील सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी त्या नाटय़पदांना लावलेल्या चाली अजरामर आहेत. त्यामुळे ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातही ‘कटय़ार’नाटकातील नाटय़पदांच्या मूळ चाली संगीतकार शंकर एहसान लॉय यांनी तशाच कायम ठेवल्या आहेत. पं. अभिषेकी बुवांनी केलेल्या या कामाला आम्हाला कुठेही धक्का लावायचा नव्हता, असे शंकर महादेवन यांनी ‘कटय़ार’ चित्रपटाच्या निमित्ताने वेळोवेळी सांगितले होते. त्याचा प्रत्यय चित्रपटातील नाटय़पदे पाहताना आणि ऐकताना येतो. चित्रपटाच्या संगीतातही पूर्णपणे भारतीय वाद्यांचाच कटाक्षाने वापर करण्यात आला आहे. सिंथसाएझर वापरलेला नाही. ‘कटय़ार’चित्रपटातील सर्वच नाटय़पदे आणि अन्य गाणीही तरुण आणि महाविद्यालयीन पिढीला आवडली आहेत. त्यातही विशेषत: ‘सुर से सजी संगीनी’, चित्रपटाच्या अखेरीस ‘सदाशिव’या पात्राच्या तोंडी असलेले ‘अरुणी किरणी’, ‘मन मंदिरा’, ‘दिल की तपीश’ यासह ‘यार इलाही’ ही कव्वाली आणि घेई छंद यासारखी मूळ नाटय़पदे पसंतीस उतरली आहेत. ‘कटय़ार’ चित्रपटातील काही नाटय़पदे ही अनेक वर्षांपूर्वीची असली तरीही त्याचा मूळ ढाचा कायम ठेवून ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पुन्हा नव्याने ध्वनिमुद्रित केल्यामुळे तसेच चित्रपटात भव्य स्वरूपात सादर झाल्यामुळे नव्या पिढीला ती जुनीपुराणी न वाटता आजच्या काळातील वाटतात आणि भावतातही.
‘कटय़ार’ चित्रपटातील ही नाटय़पदे अवघ्या काही मिनिटांची केल्यामुळे त्यातील संगीत व आत्मा हरवला असा आक्षेप काही जणांकडून घेण्यात येत आहे. पण पूर्वीच्या संगीत नाटकांप्रमाणे दीर्घकाळ चालतील अशी नाटय़पदे चित्रपटात घेतली असती तर चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना विशेषत: तरुण पिढीसाठी ती कंटाळवाणी ठरली असती. काय ‘कंटाळा’ आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून उमटली असती. ‘कटय़ार’सारखा चित्रपट हा ‘क्लास’बरोबरच ‘मास’साठीही असल्याने चित्रपटात ज्या पद्धतीने आणि प्रकारे ही नाटय़पदे सादर झाली आहेत, ती योग्य आहेत. दिग्दर्शक आणि संगीतकार म्हणून अनुक्रमे सुबोध भावे व शंकर महादेवन यांचीही भूमिका योग्य वाटते. नाटय़संगीत किंवा नाटय़गीतांविषयीची गोडी वाढीस लावण्यात किंवा नव्याने निर्माण करण्यात त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे. ज्यांना मूळ नाटय़पदे ऐकायची आहेत, त्यांच्यासाठी ती उपलब्ध आहेतच.
संगीत नाटक, संगीत मैफल या जिवंत कला आहेत. त्या प्रत्यक्ष समोर घडल्या पाहिजेत, सादर झाल्या पाहिजेत. तसे झाले तर त्याच्या चैतन्याने कलाकार आणि रसिक तल्लीन होऊन आनंदात न्हाऊन निघतील. ‘बालगंधर्व’ चित्रपटाने नव्या पिढीला नाटय़संगीत व नाटय़पदांची आवड निर्माण केली आणि आता ‘कटय़ार’ चित्रपटाने ती रुजवली आणि वाढवली असे नक्कीच म्हणता येईल.

First Published on November 22, 2015 1:33 am

Web Title: article on katyar kaljat ghusli