News Flash

साडेनव्याण्णववे संमेलन.. नाटककारांचे!

सामान्यपणे कोणालाही न सुचलेल्या गोष्टींचा घाट घालणे हा मुळ्येंचा मूलत: पिंड.

(संग्रहित छायाचित्र)

हृषीकेश जोशी

डिसेंबरच्या ८ तारखेला मुंबईत दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये एक संमेलन भरवण्यात आले होते.. ‘माझे असेही एक संमेलन- नाटककारांचे!’ हे संमेलन ‘साडे नव्याण्णवावे’ म्हणून घोषित केले गेले होते. मुंबईच्या रंगभूमीच्या परीघातल्या साधारणत: सर्व कलावंतांना हमखास खात्री असते की, याचा आयोजक दुसरा-तिसरा कुणी नसून अशोक मुळ्येच असणार! सामान्यपणे कोणालाही न सुचलेल्या गोष्टींचा घाट घालणे हा मुळ्येंचा मूलत: पिंड.

आता लोकांना प्रश्न पडेल की, हे एवढे जेवणावळी घालून सतत कार्यक्रम करणारे मुळ्ये अब्जाधीश असले पाहिजेत. पण यांच्या खिशात दमडीही नसते आणि हे कार्यक्रमाची घोषणा करतात. त्यांचा जनसंपर्क एवढा विपुल आहे की, मंत्री-संत्री, माजी मुख्यमंत्री, प्रसार माध्यमांतील संपादक, व्यावसायिक, उद्योगपती, दुकानदार, नाटय़-निर्माते, कलावंत आणि केवळ त्यांच्या प्रेमापोटी मदत करणारे अनेकजण मुळ्यांनी कार्यक्रम ठरवलाय म्हटलं की स्वत:हून त्यांना फोन करतात. किती आणि काय गरज आहे हे स्वत:हून विचारतात आणि सगळी जबाबदारी आनंदाने स्वत:वर घेत असतात. लोक स्वत:हून एवढी मदत का करतात त्यांना? तर त्यांचं नि:स्पृह असणं आणि निरपेक्षपणे लोकांसाठी सतत काहीतरी सकारात्मकपणे करत राहण्याची त्यांची वृत्ती!

तर.. या नाटककार संमेलनाचं वैशिष्टय़ म्हणजे करोनाकाळाचं दडपण झुगारून तरुण रंगकर्मी मोठय़ा संख्येने त्यास उपस्थित होते. कबूल करूनही जे आले नाहीत त्याबद्दल मुळ्ये यांना मनोमन वाईट वाटत राहतं आणि ते निरागसपणे सात्विक संतापही व्यक्त करतात; तोही त्यांचा प्रथेप्रमाणे यंदा करून झाला. तरीही उपस्थिती उल्लेखनीय म्हणजे शंभरभर होती. मुळ्येंच्या शिरस्त्याप्रमाणे याही समारंभाला कोणतीही ठोस रूपरेषा नसल्याने कार्यक्रमाची सुरुवात पुष्पगुच्छ घेऊन येणारी व्यक्ती वेळेत न आल्याने ऐनवेळी गाण्यांच्या कार्यक्रमापासून झाली. अध्यक्ष व स्वागताध्यक्ष कोण असतील हे ऐन कार्यक्रमात ठरेल, असं आधीच सांगितलं असल्याने मुळ्ये मंचावर बोलायला गेल्यावर प्रेक्षागृहात नजर फिरवून त्यांनी मोहन जोशींची अध्यक्ष म्हणून आणि प्रवीण दवणेंची स्वागताध्यक्ष म्हणून नेमणूक केली.  आपल्या भाषणात मागील वर्षीची झाडाझडती घेताना मुळ्यांनी, ‘हे संमेलन ‘साडेनव्याण्णववे’ असल्याचे जाहीर केल्याने नाटय़ परिषदेच्या कुणा सदस्याने यास आक्षेप घेऊन मुळ्यांना फोन केला होता; (कारण कोरोनामुळे शंभरावे नाटय़संमेलन गेल्या वर्षी होऊ शकले नाही.) त्या व्यक्तीचे नाव न घेता त्यांनी त्यांना फोडून काढले. खरं तर नाटय़ाशी संबंधित कोणत्याही संमेलनावर फक्त नाटय़ परिषदेचाच अधिकार आहे असं काही नाही. कुणीही कुठलंही संमेलन भरवू शकतो. त्या सदस्याने तो आक्षेप का घेतला असेल कुणास ठाऊक! परंतु यंदा नाटय़ परिषद, नव-निर्माता संघ, प्रशांत दामले यांनी करोनाच्या महासंकटात रंगकर्मीना जी मदत केली त्याबद्दल त्यांनी भरभरून कौतुकही केले. रंगभूमीवर काम केलेली पहिली अभिनेत्री हिराबाई पेडणेकर यांचं चरित्र लिहिणाऱ्या शिल्पा सुर्वे यांचा मुळ्येंनी विशेष सत्कार केला. रत्नाकर मतकरींचे सुपुत्र गणेश मतकरी यांनी दोन नवीन नाटके लिहिली आहेत हे कळताच त्यांचा सत्कार हीच रत्नाकर मतकरींना श्रद्धांजली अशी वेगळीच, पण नाटककाराच्या जाणिवेने त्यांनी श्रद्धांजली वाहिली. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी गणेश मतकरींच्या लेखनवैशिष्टय़ांची उत्तम ओळख करून दिली. नाटककारांच्या वतीने ऐनवेळी मला त्यांनी बोलायला सांगितले. रंगभूमीचा कोणताही काळ हा नट, दिग्दर्शकांपेक्षा नाटककाराच्या नावाने ओळखता जातो, याबद्दल दाखल्यादाखल गो. ब. देवल, राम गणेश गडकरी यांच्या काही किश्श्यांमधून जुन्या काळी नाटककारांचं रंगभूमीवर कसं सर्वोत्तम आदराचं स्थान होतं आणि नाटकाच्या जडणघडणीमध्ये नाटककाराच्या मानधनाचा आकडा कसा सर्वाहून मोठा होता, याबद्दल मला थोडक्यात मांडता आलं. मधेच उत्स्फूर्तपणे लेखक आनंद म्हसवेकरांनी, ‘नाटककार संघ पुनरुज्जीवित व्हायला हवा,’ अशी कळकळ व्यक्त केली. ‘पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये अशोक मुळ्ये असायला हवे होते,’ अशी भावना व्यक्त करून नाटककारांना आजच्या निर्मात्यांकडून कशी वागणूक मिळते याबद्दल स्वागताध्यक्ष प्रवीण दवणे यांनी स्वानुभव व्यक्त केले. ‘गतकालीन आयुष्यातल्या माझ्या चुका दाखवून देणारा अशोक मुळ्ये हा कसा एकमेव माणूस आहे, आणि त्याबद्दल त्यांना मी स्वच्छपणे जगण्याची प्रेरणा देणारा स्वामी म्हणून कसे मानतो,’ याची हृदयस्थ कृतज्ञता अध्यक्षीय भाषणात मोहन जोशींनी व्यक्त केली.

संगीतावर प्रचंड प्रेम असल्याने मुळ्यांचा कोणताही कार्यक्रम सुगम संगीत, भावगीतं, चित्रपट गीतांशिवाय कधीच संपन्न होत नाही. गायक-वादक कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वत:हून उपस्थित राहतात आणि मनोभावे आनंदाने कला सादर करतात. श्रीरंग भावे, केतकी भावे-जोशी यांनी अप्रतिम गाणी सादर केली. साईराम हा स्त्री-पुरुष आवाजात गाणारा प्रसिद्ध गायक केवळ मुळ्यांवरच्या प्रेमापोटी न बोलावताही हजर होता.

मुळ्यांच्या प्रेमळ धमकीला मान देत कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी हजर होते. मुळ्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात पडेल ते काम करण्याकरता व मदतीसाठी निर्माते चंद्रकांत लोकरे उपस्थित असतात. त्यांच्यासारखे मुळ्यांचे अनेक सुहृद या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. येत्या फेब्रुवारीमध्ये १३ व्या ‘माझा पुरस्कार’ सोहळ्याची आठवण करून मुळ्यांनी कार्यक्रम अप्रतिम पार पाडला.

केवळ आनंद ही एकमेव भावना निर्माण करण्याचा खटाटोप करणारे अवलिया अशोक मुळ्ये कार्यक्रमानंतर उपस्थितांना श्रीखंड-पुरीवर ताव मारण्यासाठी प्रेमळ धाकदपटशाने जेवणस्थळी घेऊन गेले.

रंगभूमीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या, पण स्वतंत्रपणे कधीच दखल न घेतल्या गेलेल्या केवळ नाटककारांसाठीचे हे संमेलन नाटय़कर्मीच्या कायम स्मरणात राहील यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 12:04 am

Web Title: article on meeting of playwrights abn 97
Next Stories
1 पुनित बालन स्टुडिओजच्या दोन लघुपटांना ‘गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’ पुरस्कार
2 घडतंय बरंच काही..
3 ओटीटीमुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
Just Now!
X