थरारक स्टंट्स आणि साहसी खेळामुळे ‘खतरों के खिलाडी – फीअर फॅक्टर’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे दहावे पर्व आले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी या कार्यक्रमाचे निवेदन करत असून यात साहसी खेळांचा एकेक टप्पा ओलांडत कोण स्पर्धक विजयी ठरणार याची प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढीस लागली आहे. ‘कलर्स वाहिनी’वर दाखवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी २२ फेब्रुवारीपासून झाली आहे. आगीशी दोन हात करणे, पाण्याच्या आत श्वास रोखून धरणे, हवेत तोल सांभाळत नानविध अडथळे पार करणे, कधीही नाव न ऐकलेले किडे खाणे, साप, सरडा, मगर, वाघ-सिंह यांसारख्या हिंस्र प्राण्यांना हाताळणे यासारखे चित्रविचित्र स्टंट्स आणि साहसी खेळामुळे हा कार्यक्रम स्पर्धकाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहतो.

स्पर्धकांच्या मनातील भीतीचा सामना करून त्यावर विजय मिळवणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून याचा जन्म अमेरिकेत झाला. ‘एनबीसी’ या वाहिनीवर २००१ ते २००६ या सहा वर्षांच्या कालावधीत ‘फीअर फॅक्टर’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या कार्यक्रमाचे स्वरूप नवीन असल्याने जगभरात कार्यक्रमांचे अनेक भाग झाले. त्यापैकी भारतात ‘खतरों के खिलाडी- फीअर फॅक्टर’ नावाने सुरू झाला. यंदा कार्यक्रमाचे दहावे पर्व सुरू आहे. मराठमोळी अमृता खानविलकर, भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी, तेजस्विनी प्रकाश, करण पटेल, आर जे मलिष्का, करिश्मा तन्ना, अदा खान, नृत्य दिग्दर्शक धर्मेश, शिवीन नारंग, विनोदी कलाकार बलरा सयाल हे स्पर्धक सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम बल्गेरियात चित्रित करण्यात आला आहे.  यानिमित्ताने कलाकारांनी प्रत्येक भागामागे किती लाख रुपये मानधन घेतल्याची चर्चाही चित्रपटसृष्टीत रंगत आहे.

यंदा यात अभिनेत्री अमृता खानविलकर ही सहभागी होत आहे. तिची गाडी सध्या जोरात असून ‘चोरीचा मामला’, ‘मलंग’ आणि आता ‘खतरों के खिलाडी’ यामुळे तिचे वेळापत्रक आणखीनच व्यग्र आहे. यामुळे हा ‘खतरों के खिलाडी’ संपल्यावर मी थोडा आराम करणार असल्याचे अमृता सांगते. या कार्यक्रमात सहभागी होण्याआधी तिने शारीरिक आणि मानसिक तयारी केली होती. रोज व्यायाम, ध्यानधारणा आणि झुंबा केला. ‘खतरों के खिलाडी’मध्ये अमृताला पाण्यापासून भीती वाटत होती. एक तरणतलावातील स्टंट असल्याने तो करताना मी घाबरले होते. मात्र, त्यानंतर माझी पाण्याविषयी असणारी भीती गेली असल्याचेही ती आवर्जून नमूद करते.

पाच शो होस्ट करणाऱ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीचे ‘खतरों के खिलाडी’शी जवळचे नाते निर्माण झाले आहे. अ‍ॅक्शन, थरार असल्याने मी हा कार्यक्रम स्वीकारला असल्याचेही त्याने कबूल केले. साहसी दृश्ये आणि थरारक स्टंट्स ही आता त्याच्या चित्रपटांची ओळख बनली आहे. सलग चार भागांनंतर तो आता पाचवा भाग निवेदन करण्यास सज्ज झाला आहे. याविषयी त्या अनुभवाबद्दल सांगताना, ‘स्टंट्स हे माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. या कार्यक्रमाचे दहावे पर्व मला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचे आहे. अनेक वर्षे स्टंट्स करत असल्याने या क्षेत्रातील लोकांशी ओळख आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातून स्टंट्मास्टर, रायडर बोलावण्यात आले आहेत. हे स्टंट करताना सुरक्षेची काळजीही घेणे तितकेच महत्त्वाचे असते, कारण थोडीशीही चूक झाल्यास जिवावर बेतू शकते, असेही त्याने सांगितले. मी १६ व्या वर्षांपासून स्टंट्स करत आलो आहे. स्टंट्स करताना संयम आणि नियोजन गरजेचे आहे. कारण स्टंट्स कोण करते, तसेच त्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता या गोष्टींचा विचार करून स्पर्धकाला मार्गदर्शन करावे लागत असल्याचे, रोहित शेट्टी सांगतो.