२०१४ च्या सुरुवातीला लोकांनी अभिनेता सुबोध भावेला ‘लोकमान्यां’च्या भूमिकेत पाहिलं. त्याने पडद्यावर ज्या उत्कटतेने लोकमान्य जिवंत केले त्याला प्रेक्षकांचीही तितकीच मोठी दाद मिळाली.  वर्षभरात पुन्हा सुबोध भावे ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा पडद्यावर आला तेव्हा तो दुहेरी भूमिकेत होता. दिग्दर्शक म्हणून पदार्पणातच त्याने ‘कटय़ार..’ सारखी अभिजात नाटय़कृती चित्रपटरूपात आणली. आज या चित्रपटाने अनेक ट्रेंड सेट केलेत. पण या चित्रपटाच्या यशातून मी कधीच बाहेर पडलो आहे. पुन्हा शून्यापासून नवीन चित्रपटाची सुरुवात केली असल्याचे सुबोधने ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना सांगितले.

नव्या वर्षांबरोबर सुबोध ‘बंध नायलॉनचे’ या चित्रपटातून तरुण देवदत्तच्या भूमिकेतून समोर येतो आहे. सध्या प्रत्येकजण आपल्या स्वप्नपूर्तीत अडकला आहे. स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकजण त्या ससा आणि कासवाच्या शर्यतीत शिरतो आणि आपल्याबरोबर आपल्या नातेवाईकांना, जवळच्यांनाही त्या शर्यतीत फरफटत नेतो. जीवन समृद्ध करत असताना आपले नातेसंबंध आपल्याला समृद्ध करत असतात, हे तो विसरत जातो. त्यामुळे हल्लीच्या नात्यांचे रेशमी बंध जाऊन ते ‘नायलॉन’चे तकलादू बंध उरले आहेत, अशी संकल्पना या चित्रपटात मांडली असल्याचे सुबोधने सांगितले.

दिग्दर्शक म्हणून ‘कटय़ार काळजात घुसली’ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नव्हते, असे त्याने स्पष्ट केले. प्रत्येक चित्रपटातील विषयाचे वेगळेपण असते. ते समजून घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कटय़ार.. प्रेक्षकांना गेली अनेक र्वष माहिती होता. ‘बंध नायलॉनचे’चा विषय पूर्णपणे नवीन आहे. मूळ एकांकिकाही काही जणांनीच पाहिलेली असल्याने प्रेक्षकांना सुरुवातीला चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागले. चित्रपट चांगला असेल तर आपोआप त्याचा प्रेक्षकवर्ग वाढत जातो, असे सुबोध म्हणतो.

सुबोधच्या प्रत्येक चित्रपटात भूमिकेबरहुकूम त्याचा लुक असतो. त्याबद्दल बोलताना आपल्या पिढीतील कलाकार एकूणच लुक आणि फिटनेसबद्दल जागरूक आहेत, असं त्याने सांगितलं. बरेच जण हे अनेक र्वष शिकून याच क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या दृष्टीने उतरले आहेत. आणि आज मराठीबरोबरच हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू अशा अनेक चित्रपटांची स्पर्धा समोर आहे, याची जाणीवही कलाकारांना आहे. आणि शेवटी मोठी इनिंग खेळण्यासाठी फिटनेस आवश्यक असतो. अभिनेत्याकडे त्याचं शरीर हेच भांडवल असतं. ते आमचं रॉ मटेरिअल आहे. त्यामुळे लुक आणि फिटनेसची काळजी घेतलीच पाहिजे, असं तो म्हणतो.

मराठी चित्रपटांना जे यश मिळतं आहे त्यामुळे कलाकार म्हणून आपली जबाबदारी वाढल्याचं सुबोध म्हणतो. हे यश कोणा एकाचं नाही किंवा हा अचानक झालेला बदल नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील बदललेलं वारं म्हणजे लोकांनी तुमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. तुमच्या कलाकृतीतून तो जपला पाहिजे. एक वेगळा विषय पाहण्यासाठी प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे येतात, त्यामुळे त्याची जाणीव आम्हालाही ठेवावी लागते. सातत्याने चांगली कलाकृती घडण्याचा प्रयत्न आम्ही केला तर नक्कीच एखाद्या चित्रपटाला चांगले यश मिळेल, असं सुबोधने सांगितलं. दिग्दर्शक म्हणून सुबोधने सुरुवात केली असली तरी दिग्दर्शन अवघड आहे, असं तो म्हणतो. अभिनय करणं माझ्यासाठी अवघड नाही. तो माझा श्वास आहे. त्यामुळे वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करून अभिनेत्याला जो आनंद मिळतो तो मलाही मिळवायचा आहे. त्यामुळे दिग्दर्शन कधी करेन हे माहीत नाही. अभिनयावरच जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्याने सांगितले.  पण अभिनेता म्हणून आपल्याला जे आवडेल ते करायला मिळावं हेही व्यसन ‘बालगंधर्व’मुळे लागलं आहे.  माझ्या सुदैवाने बालगंधर्व, लोकमान्य आणि कटय़ार काळजात घुसली या तिन्ही कलाकृती त्याच प्रकारे लोकांना आवडलं याचा आनंद आहे. येत्या काळात असे आणखी चित्रपट तुम्हाला पाहायला मिळतील, असं आश्वासनही त्याने दिलं.

गेल्या वर्षां-दोन वर्षांत आपण गंभीर भूमिकांमध्ये अडकलो असल्याचं तो मान्य करतो. मी विनोदी भूमिकाही केल्या आहेत. तरीही गंभीर अभिनयाचा आरोप माझ्यावर करत तशाच पद्धतीच्या भूमिका माझ्याकडे येत आहेत. आता मी स्वत:च माझ्यावरचा हा ठसा पुसायचा ठरवलं आहे. मी आणि स्वप्निल जोशी ‘फुगे’ नावाचा चित्रपट करतो आहोत. यात आम्हाला क धीही पाहिलं नसेल अशा भूमिकांमध्ये तुम्ही पाहणार आहात.  यापुढच्या चित्रपटांमधून मी कधीही न तपासून घेतलेली अंगं नक्की तपासून बघणार आहे, असं त्याने सांगितलं.  ‘कटय़ार काळजात घुसली’च्या माध्यमातून ज्या संगीताने मला आनंद दिला ते लोकांपर्यंत पोहोचलं याचा आनंद आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला हे आमचं वंदन आहे. कटय़ारमुळे ते मला शक्य झालं आहे. मात्र या यशात मला अडकून पडायचं नाही, असं तो स्पष्ट करतो. या चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.पण मला जे झेपेल, माझ्या बुद्धीची कुवत असेल तेवढंच मी करेन. ‘कटय़ार’च्या यशातून बाहेर पडून पुन्हा शून्यापासून मी सुरुवात केली आहे. यश-अपयशाच्या संकल्पनांमध्ये मी फारसा अडकून पडत नाही, असं सांगणाऱ्या सुबोधने नव्या वर्षांच्या चित्रबंधांना जोरदार सुरुवात केली आहे.