सुहास जोशी

अनेकदा चित्रपट किंवा मालिकांना दिलेली नावं त्यातील कथानकाशी साधम्र्य दर्शविणारी असतीलच असे नसते. कधी कधी ही नावं खूपच चांगल्या प्रकारे नाव सार्थ ठरवणारी असतात. ‘द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली’ ही मालिकादेखील नाव सार्थ करणारी आहे. कारण नावाप्रमाणेच या मालिकेतलं सगळंच बिघडलेलं आहे. ना त्या कथेत जीव आहे, ना पटकथेत, ना दिग्दर्शनात, ना अभिनयात. अगदी टिचभर अशी गोष्ट घेऊन त्यावर दहा भाग रचायचे आणि त्याच त्याच टिपिकल घोळात घोळवत प्रेक्षकांना मूर्ख समजत काहीतरी सादर करायचे हेच येथे होताना दिसते. किंबहुना अल्ट बालाजी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अशा मालिकांचा रतीबच सुरू आहे.

ही गोष्ट आहे कापं गेली आणि भोकं राहिली पद्धतीच्या घरावर. सैन्यातून निवृत्त झालेल्या मेजर विक्रम रानौतचे हे घर. त्याची आई, पत्नी, मुलगी आणि एक मुकबधिर मुलगा असे हे कुटुंब. धाकटा भाऊ  आणि त्याची बायको आठ वर्षांपूर्वीच घर सोडून गेलेले. या कुटुंबाच्या जवळच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने ते घरी येतात आणि ही डिसफंक्शनल फॅ मिली खऱ्या अर्थाने दिसू लागते. जिचे लग्न असते ती आणि मेजरची मोठी मुलगी खास मैत्रिणी. लग्नाआधी मेजरच्या मुलीच्या लक्षात येते की ती लेस्बियन आहे आणि जिचे लग्न आहे तिच्यावरच हिचे प्रेम आहे. साहजिकच त्या मुलीचे लग्न मोडते. पाठोपाठ दोन्ही भावांमधील दुरावा आणखीनच एका कारणाने समोर येऊ  लागतो. या दुराव्याचे कारण हाच केवळ या सीरिजचा मुख्य मुद्दा आहे. पण तो सांगितला तर सीरिजमध्ये सांगण्यासारखे काहीच शिल्लक राहत नाही. पण महत्त्वाचे म्हणजे नेहमीच्या टिपिकल पद्धतीने सारे काही सुरळीत होते आणि सारे सुखासमाधानाने, आनंदाने जगू लागतात या धर्तीवरच ही कथा संपते.

मूळात या कथेचा जीव छोटा. त्यात वीस-पंचवीस मिनिटांच्या भागांमध्ये आधीच्या भागाचे स्मरण आणि शेवटाच्या नामफलकांनी ते कथानक आणखीनच छोटे होते. टीव्हीवरच्या मालिका कशामध्ये एखादा भाग चुकल्यावरदेखील फार काही चुकल्यासारखे वाटत नाही तसेच येथेदेखील होत राहते. आणि सरतेशेवटी आपण काही तरी बरं पाहिलंय असेदेखील वाटत नाही.

मनोरंजनात तार्किक गोष्टींना फारसा वाव देण्यात कधी कधी अर्थ नसतो. पण येथे तर तर्काला पूर्णपणे तिलांजलीच देण्यात आली आहे. संपूर्ण मालिकेत गोष्ट कुठेही पकड घेत नाही. इतकेच नाही तर एका टप्प्यानंतर पुढे काय होणार हे प्रेक्षकांना आपसूकच कळू लागते, इतक्या साचेबद्ध पद्धतीने मालिकेचा प्रवास होतो. काही अगदीच मोजक्या जागा चांगल्या आहेत, पण इतर गोंधळात त्या दबून जातात. के. के. मेनन हा एक बरा अभिनेता या मालिकेत निव्वळ वाया घालवला आहे याची जाणीव मात्र सतत होत राहते. बाकी इतरांना अभिनयापेक्षा ते दिसतात कसे यावरच अधिक भर असल्यामुळे त्यांच्याकडून एका ठरावीक टप्प्यानंतर फार काही अपेक्षा करण्यात अर्थच नाही.

हिंदीमध्ये वेबसीरिज येऊ  लागल्या तेव्हा त्यासाठी भक्कम अशा आर्थिक पाठिंब्याची आणि यंत्रणेची गरजदेखील दिसू लागली. अनेक हौशानवश्यांनी स्वत:च्या यंत्रणेपेक्षा यूटय़ूबचा पर्याय निवडून केवळ चित्रीकरण आणि निर्मितीवर भर दिला. अल्ट बालाजीसारखी निर्मिती यंत्रणा वेबसीरिजच्या बाजारपेठेत उतरली तेव्हा त्यांच्याकडे हे सर्वच भक्कम आहे. पण टीव्हीवरील त्याच त्याच रटाळ पद्धतीची रचनाच त्यांनी येथेदेखील अवलंबली. एक घर, एखादी गाडी, एखादे लॉन अशी ठरावीक चित्रीकरणात बांधलेली रटाळ कथा वेबसीरिजमध्ये येऊ  लागली. डिसफंक्शनल फॅमिली हे त्याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे. अर्थातच अशा मालिका पाहण्यापेक्षा न पाहणेच उत्तम.

द ग्रेट डिसफंक्शनल फॅमिली

ऑनलाइन अ‍ॅप – अल्ट बालाजी

सीझन पहिला