‘मी शिवाजी पार्क ’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते अशोक सराफ, सतीश आळेकर आणि शिवाजी साटम या तीन दिग्गज अभिनेत्यांनी लोकसत्ता कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी मराठी चित्रपट, अभिनय, माध्यमांतर, तंत्रज्ञान, विनोदाचे सादरीकरण अशा वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.

शिवाजी पार्क हे दोनच शब्द मुळात एक मोठा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास पोटात दडवून बसले आहेत. या दोन शब्दांच्या उच्चारानेच त्याचा हा इतिहास पहिल्यांदा लोकांसमोर येतो. त्यामुळे महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट  नेमका काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण होणारच होती. त्याबद्दल बोलताना ‘मी शिवाजी पार्क’ हा वेगळ्या विचारांचा चित्रपट आहे. शिवाजी पार्क म्हटलं की एक व्यासपीठच निर्माण होतं, असं सतीश आळेकर यांनी सांगितलं. शिवाजी पार्क हे विचारांचं आदानप्रदान करण्याचं व्यासपीठ आहे. अनेक थोर वक्त्यांनी तिथे भाषणं केली आहेत. आपली विचारधारा त्यांनी त्या व्यासपीठावरून मांडली आहे. त्याचबरोबर सामान्य माणसांसाठी ते कट्टय़ाचं ठिकाण आहे. अशा कट्टय़ावर रोज भेटणारे निवृत्त ज्येष्ठ नागरिक आहेत. न्यायाधीश, पोलीस, बँक मॅनेजर, प्राध्यापक आणि डॉक्टर अशा या पाच व्यक्तिरेखा आहेत. ते शिवाजी पार्कच्या कट्टय़ावर एकमेकांशी गप्पा मारताना चिंतेतही आहेत. सध्या जे काही घडतंय, त्यावर त्यांचं काही म्हणणं आहे. सर्वच क्षेत्रातली विश्वासार्हता विरघळत चाललेली आहे. न्यायव्यवस्थाही खिळखिळी झाली आहे. पण आपापल्या क्षेत्राशी प्रामाणिक असणारे हे पाचजण एका घटनेमुळे कोणती गोष्ट करायला प्रवृत्त होतात, ते कायदा हातात घेतात का? हे रंगवत असतानाच भविष्यकाळाकडे अंगुलीनिर्देश करणारा थरारपट आहे, असेही त्यांनी सांगितले. हा पाच म्हाताऱ्यांचा चित्रपट आहे. यामध्ये कुणी नायक नाही, नायिका नाही. न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला तर संविधानाचा आदर राखण्यासाठी लोक काय करतील, त्यावरचा हा चित्रपट आहे. याची कथा, पटकथा महेश मांजरेकरने लिहिली तर संवादलेखन अभिराम भडकमकरने केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शिवाजी पार्क या जागेने बरीच स्थित्यंतरं पाहिली आहेत, पण अशी एक घटना जी शिवाजी पार्कला साक्ष ठेवून होते. त्यामुळे ‘मी शिवाजी पार्क’ हे नाव समर्पक  असल्याचं अशोक सराफ यांनी सांगितलं. तर न्यायव्यवस्था आंधळी असते, आम्ही डोळस होतो, या एका वाक्यात सगळा आशय सामावला असल्याचं स्पष्ट करतानाच हा अनुभव प्रत्येकोलाच जोडून घेणारा असेल, असेही सराफ म्हणाले.

good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…
kutuhal writer noam chomsky
कुतूहल : नोम चॉमस्की
Bhavani Talwar
‘भवानी तलवार’ परमारवंशीय गोवेलेकर सावंत घराण्याने दिली 
Uttarakhand UCC Bill polygamy in Rajasthan history
राजपूत समाजातील बहुपत्नीत्त्व विवाह मध्ययुगीन कालखंडात का महत्त्वाचे ठरले?

या चित्रपटाच्या निमित्ताने सगळे रंगभूमीपासून काम केलेले आम्ही मित्र एकत्र आलो होतो. हा सुंदर योग फक्त दिग्दर्शक महेश मांजरेकरच जुळवून आणू शकतो, असे शिवाजी साटम यांनी सांगितले. आमचं एकत्र येणं ही पर्वणी होती पण चित्रीकरण पटकन कधी संपलं ते कळलंही नाही इतका सुंदर काळ होता, असेही ते पुढे म्हणाले. तर अशोक सराफ म्हणाले की आता सध्या चित्रपटात जे चाललंय त्यापेक्षा हा खूप वेगळा चित्रपट आहे. सामान्य परिस्थितीतून वेगळंच वळण घेऊ न कथा पुढे जाते. एका दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी महेश तिथे आला आणि त्याने ‘मी शिवाजी पार्क’चा विषय सांगितला आणि मी लगेचच होकार दिला. पाच निवृत्त झालेल्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांची ही गोष्ट आहे. तेव्हा मी त्याला विचारलं की पाच जणांच्या व्यक्तिरेखा कोण करणार आहे? त्यावर विक्रम गोखले, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर आणि सतीश आळेकर ही नावं सांगितल्यावर क्षणाचाही विलंब न लावता हो मी करतो हा चित्रपट असं सांगून टाकल्याचे अशोक सराफ म्हणाले.

अनुभवी कलाकार म्हणून तंत्रज्ञानाकडे बघताना –

अभिनयाच्या विविध माध्यमांकडे तुम्ही कसं बघता असं विचारल्यावर शिवाजी साटम म्हणाले की ऑनलाइन माध्यमांमध्ये बराचसा बोल्ड आणि अश्लीलतेकडे झुकणारा आशय दाखवला जातोय. त्याची गरज नाही, पण तंत्रज्ञानातले बदल पाहिल्यावर खूप छान वाटतं. चित्रपटासारखंच हे माध्यम आहे, पण पडदा छोटा आहे. वेबसीरिज हे वैयक्तिक मनोरंजनाचं माध्यम झालंय. चित्रपट ही समूहाने बघण्याची कला आहे. आम्ही आमच्या अभिनय क्षेत्रात चित्रीकरणाच्या सेटवर शिस्त पाळतो. अलीकडे ते होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. तर सतीश आळेकर म्हणाले की तरुणाई तंत्रज्ञान आणि कलेची माध्यमं यांचा मेळ साधण्यासाठी प्रयत्न करते आहे. त्यांची दृश्यमाध्यमावर पकड आहे. त्यांना सामाजिक भानही आहे. त्यातल्या काहीना चित्रपटांचं व्याकरण समजतं. माध्यमांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे ही जाण त्यांना आहे. आता समाजाची रचना आपल्याच अवतीभोवतीचं विश्व हेच माझं जग अशी भावना आल्यामुळे तरुणाईवर त्याचा प्रभाव अधिक आहे. समाजमाध्यमाकडे ते आकर्षित होतात. पण तरुणाईविषयी मी आशावादी आहे, असं ते म्हणाले. अभिनयात तुम्ही भाव जेव्हा व्यक्त करता, रागावणं, हसणं ही अभिव्यक्ती सगळीकडे सारखीच आहे, असं अशोक सराफ म्हणाले. भारतीय प्रेक्षक स्वत:ला प्रत्येक कलाकृतीशी जोडायला बघतो, त्याला तंत्रज्ञानात फारसा रस नाही. त्याला कसं मांडता यापेक्षा काय मांडता याकडे त्याचं लक्ष असतं, असं सराफ म्हणाले. तर एसीपी प्रद्युम्नची सीआयडीमधील भूमिका ही प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट अशाच पद्धतीची असल्याने त्यासाठी रंगभूमीवरचं अभिनय तंत्र वापरलं आहे, असं साटम यांनी स्पष्ट केलं. अभिनेत्याने आपापला अभ्यास करून माध्यमांना सामोरं गेलं पाहिजे, यावर तिघांचंही एकमत झालं.

मराठी चित्रपटासमोरची आव्हाने

मराठीला चांगले दिवस आलेत, पण हे असं म्हणणं म्हणजे स्वत:ला फसवणं आहे, असं मत सराफ यांनी व्यक्त केलं. निर्मात्याला नफा मिळाला तरच मराठीला चांगले दिवस आले असं म्हणायला हवं. ९९ ते ९८ टक्के चित्रपट आपटतात. मग मराठी चित्रपट चालला, असं का म्हणता? असा सवालच सराफ यांनी केला.

जुन्या दिग्दर्शकांचं साधं तंत्र होतं, ते सादरीकरणात अडकायचे नाहीत. त्यांचे चित्रपट सिल्व्हर जुबिली व्हायचे. आधी वर्षांला १८ ते २० चित्रपट बनायचे. आता १०० चित्रपट बनतात. त्यामुळे थिएटर मिळण्यापासून ते त्यांना योग्य ती वेळ मिळण्यासाठीही झगडावं लागतं. हिंदी आणि मराठी प्रेक्षकांची मानसिकता वेगळी आहे. मराठी चित्रपट आशयावर चालतो तर हिंदी चित्रपट नायकांच्या नावावर चालतो. त्याचबरोबर चित्रपटाचा तिकीटखर्चही वाढला आहे, हे स्पष्ट करतानाच मराठी चित्रपटांना आलेले चांगले दिवस हा फक्त फु गवटाच असल्याचे स्पष्ट मत या तिघांनीही व्यक्त केले.

विनोदच हरवलाय..

विनोदी भूमिकांमुळे अशोक सराफ यांची वेगळी ओळख आहे. त्यांना आजच्या विनोदी लेखनाविषयी सादरीकरणाविषयी विचारलं असता ते म्हणाले, अलीकडचे विनोदी कार्यक्रम मी बघतो. पण बघितल्यावर विचार करतो की का बघितलं? विनोदाची पूर्ण शैलीच हल्ली बदलली आहे. स्टँड अप कॉमेडी हा प्रकारच होऊ  शकत नाही. नाटय़छटा हा प्रकार होऊ  शकतो, असं ते म्हणतात. स्टँड अप कॉमेडी म्हणजे काय हे मला अजून कळलेलं नाही. एकमेकांची फिरकी घेणं हा विनोद नव्हे. पण साधी फिरकीही नसते असं शिवाजी साटम म्हणाले. त्याला दर्जाच नाही, प्रतिष्ठाही नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. पहिलं विनोदी सादरीकरण आम्ही आमच्या लहानपणी पाहिलं ते राजाभाऊ आणि शरद तळवलकर यांचं. किती सरळ सुंदर थेट कॉमेडी असायची. संवादातून प्रासंगिक विनोद फुलायचा. पण पिढी बदलत गेली. तशी कॉमेडीची शैली बदलत गेली, असं सराफ म्हणाले. मराठी चित्रपटात कॉमेडीची शैली मी बदलली. त्याआधी ती दादा कोंडकेंनीही बदलली होती, असं सांगतानाच त्यांच्यातील सादरीकरणाची उत्स्फूर्तता, हजरजबाबीपणा यामुळे त्यांचे विनोद खुलायचे. मी विनोदी शैलीला वेग दिला. टायमिंग दिलं. संवादातील प्रासंगिक विनोदांना मी अ‍ॅक्शन कॉमेडीत रूपांतर केलं, असं अशोक सराफ यांनी सांगितलं. तुम्ही विनोदी संवाद जेव्हा बोलता त्यावेळी तुमची देहबोलीसुद्धा तशी असायला हवी. प्रेक्षकांना विनोदी देहबोली किळसवाणी वाटता कामा नये.

संकलन – भक्ती परब