गेल्या काही दिवसांपासून कलर्स मराठी वाहिनीवरील जितेंद्र जोशीचा ‘दोन स्पेशल’ हा शो चर्चेत आहे. शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार त्यांच्या आयुष्यातील किस्से सांगत शो आणखी रंजक बनवतात. तसेच त्यांच्या आयुष्यातील गुपितं प्रेक्षकांसमोर आणण्याचा जितेंद्र जोशीचा प्रयत्न सफल ठरत असल्याचे दिसत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘दोन स्पेशल’च्या भागामध्ये अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांनी हजेरी लावली. दरम्यान अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

‘अरे येड्या. लवकर गेलास. तुझ्यासारख्या माणसाची मराठी चित्रपटसृष्टीला आजूनही गरज होती. तुझ्यासारखा मेहनत करणारा माणूस आजही हवा होता. कुठे तरी शुन्यातून विश्व निर्माण करणारा. साहित्य संघात तात्या आमोणकरांच्या मागे बॅग घेऊन फिरणारा, नोकरी करताना मी तुला बघितलय. पण ती ओळख परत कधीच कुणाला तू होऊ दिली नाहीस. साहित्य संघात जेव्हा मी एकांकिका करत होतो तेव्हा मधल्या जागेत मांडी घालून बसणारा तुझ्यातला माणूस मी पाहिला आहे. नट म्हणून मी तुझी कामे पाहिली होती. पण तू या कामात इतका आत घूसशील असे मला कधीच वाटले नव्हते. तू स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केलीस की, मी लक्ष्मीकांत बेर्डे आहे हे लक्षात ठेवा’ असे अशोक सराफ म्हणाले.

पुढे लक्ष्या बद्दल ते म्हणाले, ‘मी बाहेरगावी दौऱ्यावर जातो तेव्हा अनेक लोकं मला विचारतात. अहो काय तुमचे एकएक चित्रपट आहेत. तुमची आणि लक्ष्मीकांतची जोडी काय सुंदर होती. तुझं नाव काढतात अजूनही लोकं. तू ऐकायला हवा होतास पण नाही. पण तू तुझं नाव आजूनही तसच ठेवलस. लोक तुझं नाव आजूनही घेतात या पेक्षा दुसरी कोणतीच मोठी गोष्ट नाही. नट तर त्या करताच व्हायचं असतं, कामं तर त्याचसाठी करायची असतात की कोणी तरी आदराने तुमचं नाव पुढे घ्यावं. छान केलस तू. माझ्या एकांकिकेच्या वेळी सुधीर जोशीला तू म्हणाला होतास की मला अशोक सराफ व्हायचय. हे नंतर मला सुधीरने सांगितले. नोकराची कामे करुन मराठी चित्रपटसृष्टीमध्ये टॉपचा हिरो होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तू साध्य केली. त्याबद्दल तुला खरच सॅल्युट.’