ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठेकृत नाटककार जयंत पवार यांच्या ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या मर्मभेदी दीर्घकथेच्या अभिवाचन-नाटय़ाचे चार प्रयोग १५ ऑगस्टपासून मुंबईत सलगपणे होणार आहेत. पैकी पहिला प्रयोग १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वा. बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या मिनी थिएटरमध्ये, तर १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वा. खारमधील ‘द हाइव्ह’ येथे, १७ ऑगस्टला संध्याकाळी ७ वा. मुलुंडच्या केळकर-वझे महाविद्यालयात आणि १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वा. गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये होईल. या प्रयोगाची प्रकाशयोजना प्रदीप वैद्य यांची असून, संगीत नरेंद्र भिडे, संजय देशपांडे आणि अतुल पेठे यांचे आहे. अक्षरलेखन कुमार गोखले यांचे, तर रेखाचित्रे तुषार गुंजाळ यांची आहेत. ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या आगळ्या दीर्घकथेत मराठी रहस्यकथामालांची दुनिया, त्यांचे लेखक, या रहस्यकथांचे डिटेक्टिव्ह नायक, खून प्रकरणं हाताळण्याची त्यांची पद्धती, रहस्यकथालेखनाची सूत्रं आणि या कथेच्या आतल्या आणि बाहेरच्या माणसांची वास्तव व आभासी दुनिया अशा एकात एक गुंतलेल्या पदरांतून जगणं आणि कला यांच्यातील परस्पर रहस्यमय संबंधांविषयी ही कथा काही सांगू पाहते.