बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिया मिर्झा. आज ९ डिसेंबर रोजी दियाचा वाढदिवस आहे. दियाने २००० साली मिस आशिया पॅसिफिक इंटरनॅशनल स्पर्धा जिंकली होती. १९ वर्षांची असताना दियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. करिअरच्या सुरुवातीला दियाने अभिनेत्री होण्याचा कधी विचारही केला नव्हता. मात्र बॉलिवूडमध्ये एवढ्या लहान वयात पदार्पण कसे केले याबद्दल दियाने एका मुलाखतीत सांगितले.

नुकताच दियाने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पणबाबत वक्तव्य केले आहे. “२०००साली मी मिस आशिया पॅसिफिक इंटरनॅशनल ही स्पर्धा जिंकली. त्याच्या आधीपासून मला चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. मी त्या सगळ्या ऑफर नाकारल्या होत्या. कारण मी त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत होते” असे दिया म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “अनुपम खेर सर यांनी माझ्या पालकांची भेट घेतली होती आणि माझ्या पालकांची समजूत घातली. ते म्हणाले होते बॉलिवूड तुम्हाला वाटते तितके वाईट जग नाही. तिथे चांगली लोकं देखील आहेत. मला असं वाटत की माझ्या आई-वडीलांना फक्त इतकी चिंता होती की इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या कोणी ओळखीचे नव्हते. त्यामुळे मी इथे एकटी पडेन असा विचार कोणतेही पालक करतील असे मला वाटत. अनुपम सरांनी माझ्या पालकांना खात्री पटवून दिली. २००१ मध्ये मी मुंबईमध्ये आले. ते वर्ष संपेपर्यंत माझे ३ चित्रपट प्रदर्शित झाले होते. ”

दियाने २००१ मध्ये अभिनेता आर माधवनसोबत ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने दियाला ओळख मिळवून दिली. तसेच चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. त्यानंतर दम, दीवानापन, तुमको ना भूल पाएंगे, तुमसा नहीं देखा, परिणिता, लगे रहो मुन्नाभाई, सलाम मुंबई, संजू, थप्पड यासह अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.