हॉलिवूड प्रेमींची उत्सुकता ताणलेला चित्रपट ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. त्यामुळे येत्या काळात भारतीय बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कोटींचा गल्ला जमवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या चित्रपटाने भारतामध्ये पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या सिरीजमधील ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा शेवटचा चित्रपट असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतामध्ये ५३.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्या कित्येक शोची अॅडव्हान्स बुकिंग देखील झाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत.
#AvengersInfinityWar versus #AvengersEndgame… Day 1 biz…
2018: #AvengersInfinityWar ₹ 31.30 cr / 2000+ screens
2019: #AvengersEndgame ₹ 53.10 cr / 2845 screens#English #Hindi #Tamil #Telugu
Nett BOC. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) April 27, 2019
दरम्यान, या चित्रपटासाठी पहिल्यांदाच भारतामध्ये २४ तास चित्रपटगृह सुरु राहिले. इतकंच नाही तर काही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे ७२ तास सलग प्रयोग सुरु आहेत. ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट जगभरामध्ये २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत ६०१ मिलियन डॉलर म्हणजेच ४२०० कोटी कमावले आहेत. त्यातील १५०० करोड रुपये केवळ चीनमध्येच कमाई केली आहे.
‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा ‘अॅव्हेंजर्स इन्फिनीटी वॉर’चा दुसरा भाग आहे. या चित्रपटात कॅप्टन अमेरिका, थॉर, हल्क, कॅप्टन मार्व्हल, ब्लॅक व्हिडो, रॉकेट, नेब्यूला हे सात सुपरहिरो पुन्हा एकदा थेनॉसवर हल्ला करताना दिसत आहेत. उत्तम मॉडेल्सनिर्मिती, थ्रीडी अॅनिमेशन, लायटिंग, मुद्राभिनय, मोशन ग्राफिक्स,व्हिज्युअल इफेक्ट्स, स्टायलायझेशन आणि सिनेमेटोग्राफी या तांत्रिक बाजूंमुळे चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. तसेच या चित्रपटात एकूण ३२ लोकप्रिय व्यक्तिरेखा आहेत.