सुपरहिरोचे चाहते ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ या चित्रपटाची अक्षरश: डोळ्यावर तेल घालून वाट पाहात होते. अखेर हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. भारतात या बहुचर्चित चित्रपटाची अॅडव्हान्स तिकीट बुकींग सुरू झाली होती आणि प्रत्येक १८ व्या सेकंदाला एका तिकीटाची बुकींग सुरू झाली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात ११८५ कोटी रूपयांची घसघशीत कमाई केली आहे. या कमाईच्या आकड्यावरूनच सुपरहिरो चाहत्यांचा उत्साह आपल्या ध्यानात येत असेल.

अॅव्हेंजर्स एंडगेम हा खऱ्या अर्थाने मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सने खेळलेला आजवरचा सर्वात मोठा खेळ होय. या चित्रपटाचा आवाका इतका मोठा आहे, की त्याला तीन तासांचा अवधी देखील अपुरा पडतो. या चित्रपटाची कल्पना २००८ साली मार्व्हलचे प्रणेता स्टॅन ली यांनी सर्वात प्रथम मांडली होती. पुढे एक एक करत तब्बल २१ चित्रपट तयार करून एंडगेमची पार्श्वभूमी तयार केली गेली. आणि आज या २१ चित्रपटांचा निष्कर्ष आपल्याला अॅव्हेंजर्स एंडगेममध्ये पाहता येत आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनीटी वॉर’चा दुसरा भाग आहे. या चित्रपटात कॅप्टन अमेरिका, थॉर, हल्क, कॅप्टन मार्व्हल, ब्लॅक व्हिडो, रॉकेट, नेब्यूला हे सात सुपरहिरो पुन्हा एकदा थेनॉसवर हल्ला करताना दिसत आहेत. उत्तम मॉडेल्सनिर्मिती, थ्रीडी अ‍ॅनिमेशन, लायटिंग, मुद्राभिनय, मोशन ग्राफिक्स,व्हिज्युअल इफेक्ट्स, स्टायलायझेशन आणि सिनेमेटोग्राफी या तांत्रिक बाजूंमुळे चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. तसेच या चित्रपटात एकूण ३२ लोकप्रिय व्यक्तिरेखा आहेत.