कंगना बोलायला लागली की, समोरच्याने फक्त ऐकावं असंच काहीसं वातावरण गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक विषयांवर परखडपणे भाष्य केले. यावेळी कंगनाने भारतातील पुरस्कार सोहळ्यांवर निशाणा साधला. भारतात गरजेपेक्षा अधिक पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात. ‘हे सोहळे फारच बोगस असतात. तुम्हीही ते पाहण्यात स्वतःचा वेळ घालवू नका. सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्यांचा स्वतःचा असा ग्रुप असतो. तेच गाण्यांवर परफॉर्म करतात आणि त्याबदल्यात त्यांना पुरस्कार दिले जातात. अशाच प्रकारची सोयीस्कर देवाण-घेवाण या सोहळ्यांमध्ये होत असते,’ असे कंगना म्हणाली.

बॉबी डार्लिंगने केली पती विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

तसेच या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नेहमीच पक्षपात केला जातो. व्यावसायिक पुरस्कार सोहळा सोडा, पण भविष्यात जर मला ऑस्कर पुरस्कार मिळाला तरी, मी त्या सोहळ्याला जाणार नाही, असे कंगनाने स्पष्ट केले. वर्षातून एकदाच पुरस्कार मिळतो पण तो पुरस्कार मिळवण्यासाठी अनेक जण आयोजकांची मनधरणी करताना दिसतात. मला पुरस्कारांसाठी कोणाची मनधरणी करणे पटत नाही. त्यामुळेच मी अशा बोगस पुरस्कार सोहळ्यांपासून लांब राहणेच पसंत करते. तुम्हीही असे बोगस पुरस्कार सोहळे पाहत जाऊ नका असा, सल्लाही तिने प्रेक्षकांना यावेळी दिला.

यावेळी तुझा पुरस्कार सोहळ्यांना विरोध आहे तर राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला हजेरी कशी लावतेस, असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. तेव्हा कंगनाने म्हटले की, ‘राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये टीआरपीचे टेन्शन नसते. तिथे चित्रपट यशस्वी होवो अथवा न होवो तुमच्या कामाकडे पाहिले जाते. तसेच राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांना गेलात किंवा नाही गेलात तरी त्यांना काही फरक पडत नाही. तुम्ही पुरस्कार सोहळ्याला का आलात नाही, असा प्रश्न तुम्हाला विचारला जात नाही,’ असे तिने म्हटले.