20 November 2019

News Flash

मुलाच्या ‘त्या’ अटीनंतर सुंदरतेची परिभाषा बदलली – ताहिरा कश्यप

ताहिरा मोठ्या धीराने या आजाराला सामोरी गेली

अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप-खुरानाला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. मात्र आता या आजारातून ती हळूहळू बरी होत आहे. ताहिरा मोठ्या धीराने या आजाराला सामोरी गेली असून सध्या ती काही कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. यावेळी ती आजारपणाच्या काळातील तिचा अनुभव शेअर करत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तिने आजारपणामध्ये केस कापल्यानंतर आपल्या मुलाची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं आहे.

ताहिराला उपचारादरम्यान तिचे केस गमवावे लागले होते. मात्र या परिस्थितही ती खंबीरपणे न डगमगता उभी राहिली. विशेष म्हणजे केस गमावल्यानंतर तिने कधीही विग वैगरे वापरला नाही. जशी आहे, तशी साऱ्यांना सामोरी गेली. मात्र केस गेल्यानंतर तिचं रुप पाहिल्यानंतर तिच्या मुलाने आपल्या मित्र-मैत्रिणींना न भेटण्याची सक्त ताकीद दिली होती. ताहिराने स्वत: ही माहिती एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

“उपचारादरम्यान मला माझे केस गमवावे लागले होते. माझे संपूर्ण केस गेल्यानंतर जेव्हा माझ्या मुलाने मला पाहिलं त्यावेळी त्याने त्याच्या मित्रांना न भेटण्याची ताकीद मला दिली होती. आतापर्यंत मी पुरुषांना केस कापताना किंवा टकल पडलेलं पाहिलं आहे. मग तू आई असून सुद्धा केस का कापलेस ? अशा रुपात माझ्या मित्रांसमोर येऊ नकोस, असं माझ्या मुलाने मला सांगितलं होतं”, असं ताहिराने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “मुलाने सक्त मनाई केल्यानंतरही मी मुद्दाम त्याच्या मित्रांना भेटले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. वेळ व्यतीत केला. मात्र या साऱ्यानंतर परिस्थिती बदलली. सगळं काही नॉर्मल झालं. माझ्या मुलालाही त्यावेळी वावगं वाटलं नाही. विशेष म्हणजे तेव्हापासून खऱ्या अर्थाने मला सुंदरतेची परिभाषा समजली”.

दरम्यान, ट्रिटमेंटच्या वेळी केस गमवावे लागणार असल्याचं लक्षात आल्यानंतर ताहिराने तिचं हे रुप जगासमोर येऊ नये यासाठी पूर्ण तजवीज केली होती. तिने स्कार्फ, कॅप आणि विगदेखील आणून ठेवलं होतं.

First Published on May 22, 2019 12:38 pm

Web Title: ayushmaan wife tahira kashyap on going bald after cancer treatment my son told me to not meet his friends
Just Now!
X