‘बाहुबली’ भारतीय चित्रपट इतिहासातील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाच्या फक्त दुसऱ्या भागाने जगभरात १००० कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये केवळ २०० आणि ३०० कोटी क्लबमध्ये जाण्यासाठी चढाओढ असताना ‘बाहुबली २’ने एक हजार कोटींचा गल्ला जमवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आजवर कोणत्याच भारतीय चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींची कमाई केलेली नाही. तसेच, उत्तर अमेरिकेत १०० कोटी रुपयांची कमाई करणाराही तो पहिलाच भारतीय चित्रपट आहे. ‘बाहुबली २’ने शनिवारी २५ कोटी रुपयांची कमाई केली. ३०० कोटींचा गल्ला जलदगतीने कमविण्याचा मानही प्रभास आणि राणा डग्गुबतीच्या या चित्रपटाला मिळाला आहे.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट केलेय की, ‘कधी विचारही केला नाही असं घडलंय. उत्तर अमेरिकेत १०० कोटींचा गल्ला जमविणारा पहिला भारतीय चित्रपट. आतापर्यंतचे सर्व विक्रम ‘बाहुबली २’ने मोडले आहेत. तसेच, या चित्रपटाने कमी दिवसांमध्ये ३०० कोटी क्लबमध्ये पोहोचण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केलाय.’

हिंदी व्हर्जनचा निर्माता असलेल्या करण जोहरनेही ट्विटरवरून चित्रपटाच्या यशाचा आनंद व्यक्त केला. तसेच, प्रभासनेही चाहत्यांसाठी आणि एसएस राजामौली यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ३७ वर्षीय प्रभासने लिहिलंय की, माझ्यावर भरघोस प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानतो. मी सर्वोतम काम करण्याचे प्रयत्न केले होते. माझे हे काम आपणा सर्वांना आवडले, याचा मला आनंद आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम बघून त्यासाठी आभार कसे मानावे, हेच मला कळत नाहीये. ‘बाहुबली’चा संपूर्ण प्रवास दीर्घ होता. या संपूर्ण प्रवासात एक कुठली गोष्ट मी सोबत घेऊन जाणार असेल तर ते तुम्हा सर्वांचे प्रेम आहे. माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली यांचेही आभार. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय भूमिका करण्याची संधी दिली. ‘बाहुबली’चा संपूर्ण प्रवास अतिशय अविस्मरणीय राहिला. ‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रभास केवळ भारतातच नाही तर परदेशातही स्टार बनला आहे. त्याच्या चाहत्यांच्या संख्येत आता दुप्पटीने वाढ झाली आहे.