कथाकथनाची शैली, व्हीएफएक्स आणि कलाकारांचा दमदार अभिनय या जोरावर एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजले. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरील देशांतही ‘बाहुबली’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. जपानमध्येही हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. चाहत्यांच्या या प्रेमाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आता प्रभास जपानला जाणार आहे.

प्रभासने त्याच्या वाढदिवशी आगामी ‘साहो’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. हा टीझर जपानमध्येही हीट ठरला आणि तिथल्या चाहत्यांनी प्रभास आणि ‘साहो’च्या टीमला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्‍त केली. यानंतर प्रभासनेही त्याला दुजोरा दिला होता. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या माहितीनुसार, जपानमध्ये प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच जपानचे पर्यटक भारतात आल्यानंतर हैद्राबादमधील त्याच्या घरी भेट देत असतात. त्यामुळे ‘साहो’ची टीम ट्रेलर लाँचपूर्वी जपान दौरा करणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रभासची ‘अमरेंद्र बाहुबली’च्या रुपातील एक प्रतिकृती जपानमध्ये तयार करण्यात आली. या प्रतिकृतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

वाचा : दुस-या महायुद्धावेळी दिलीप कुमार यांनी कॅन्टीनध्ये केलेले काम

बॉक्स ऑफीसवर अत्यंत कमी वेळात १०० कोटींचा आकडा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला होता. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाने जपानमध्ये पंधरा आठवड्यात सुमारे ८ कोटी ५० लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. व्हीएफएक्सचे तंत्र ही या चित्रपटामागची खरी जादू आहे. ‘बाहुबली- द कन्क्लूजन’ हा चित्रपट २०१७ मधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. प्रभास, राणा डग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, सत्यराज, तमन्ना भाटीया आणि इतर सहकलाकारांच्या साथीने साकारलेल्या या भव्य चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली.